चिरंतन भेट

Submitted by चैतन्य दीक्षित on 19 April, 2016 - 09:19

तिच्या मिठीचा गर्भरेशमी पोत छळे ।
नकळत कंठी मौनाचा अन् सूर जुळे ।।
तिचे मौनही पल्याड देशी दरवळते ।
अल्याड देशी एकांताचे निळे तळे ।।
दिशा भिन्न जरि, उरी असोशी पाझरते ।
ओझरती दिसतात डोळियांतील जळे ।।
कुणा न कळते मौनाचे तारुण्य असे ।
क्वचित् कधितरी गाण्याचा त्या सूर गळे ।।
तिच्या नि माझ्या मौनाला व्यापेल असा ।
तानपुरा होऊन सारखा चंद्र जळे ।।
चिरंजीव ती मिठी, चिरंतन भेट तिची
अंशात्मक ती अंशात्मक मज, पूर्ण मिळे ।।

-चैतन्य

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है चैतन्य! कसला रम्य विरह आहे हा Happy
मौनाचं सौंदर्य अप्रतिम रेखाटलंयस.. अपूर्णतेतलं पूर्णत्वही. सुरेख.

हे वाचून 'गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा
स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नका केव्हा!' हे आठवलं..

मात्र ह्या रचनेत औदासिन्य आहे, तर तुझ्या कवितेत प्रसन्न आनंद आहे. विरह म्हणजे जनरली करूणरस ह्या कल्पनेला तू सुंदर छेद दिलास.

थॅंक यू सई...
मी एरवी मराठीत धन्यवाद म्हणतो पण तुझा प्रतिसाद वाचून थॅंक यू म्हटलं:-)
विरहात खरी भेट होते (आपली स्वतःशीही)
म्हणून तर 'चिरंतन भेट' असं शीर्षक (कवितेतल्याच शब्दांतून) आलंय.
~चैतन्य

सई+१

पहिल्यांदा कविता वाचली तेंव्हा नेमके शब्दच सापडत नव्हते प्रतिसाद लिहिण्यासाठी!
सईंनी अगदी अप्रतिम टिपल्या आहेत कवितेतील भावना!

अभिनंदन!