मलाही ऊंच उडायचय

Submitted by निशिकांत on 19 April, 2016 - 02:09

क्षितिजा पल्याड जगायचय
मलाही ऊंच उडायचय

वाटेवरती खाचा खळगे
लाख असू दे चालत असतो
सोबत नसता मला कुणाची
माझ्याशी मी बोलत असतो
सभोवताली असोत काटे
तरी कळ्यांना फुलायचय
क्षितिजा पल्याड जगायचय
मलाही ऊंच उडायचय

प्रश्न मनी हा एकच आहे
विरून गेले धुके कशाला?
पडदा डोळ्यावरचा हटता
सत्त्य लागले दिसावयाला
वास्तव दाहक तरी परंतू
जगता जगता हसायचय
क्षितिजा पल्याड जगायचय
मलाही ऊंच उडायचय

काय जगाला ठाउक नाही!
शिकवत नाही शाळेत गुरू
द्रोणाचार्यांचाच अताशा
कोचिंग क्लास जोरात सुरू
महाग झालय शिक्षण म्हणून
हो! एकलव्य बनायचय
क्षितिजा पल्याड जगायचय
मलाही ऊंच उडायचय

कौरव, पांडव, द्यूत खेळणे
तेचतेच का जुने वाचता?
पुन्हा पुन्हा त्या पांचाळीच्या
पदराला का हात घालता?
भ्रष्टाचारी नागवल्याचं
डोळे भरुन बघायचय
क्षितिजा पल्याड जगायचय
मलाही ऊंच उडायचय

काय जाहले निखार्‍यासही
राखेमध्ये हरवुन गेले
धगधगण्याचा धर्म तयांचा
असे कसे ते विसरुन गेले?
स्फुल्लिंगांना फुंकर घालुन
क्रांतीसाठी पेटायचय
क्षितिजा पल्याड जगायचय
मलाही ऊंच उडायचय

निशिकांत देशपांडे मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E Mail-- nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users