अर्थान्वयन- कबीर भजन 'हीरना समझ बूझ बन चरना'

Submitted by चैतन्य दीक्षित on 17 April, 2016 - 22:30

हीरना समझ बूझ बन चरना ।।

कुणी तरी अमुक व्यक्ती चूक करणार आहे आणि ती चूक त्याच्या जिवावरच बेतणार आहे हे दुसऱ्या कुणा तमुक व्यक्तीला समजलं तर ती तमुक व्यक्ती अमुक व्यक्तीला सावध करेल. ती चूक करु नकोस म्हणून सांगेल. अमुक आणि तमुक जर खूप जवळचे असतील तर ज्या तळमळीने हे सावध करण्याचं काम होईल तीच तळमळ कबीरांची आहे आणि हे भजन गाणाऱ्या कुमारांचीही.
सुरुवातीचं 'हीरना'च असं काही म्हटलंय की ऐकताना ते आपल्यालाच उद्देशून आहे असं वाटतं.

हरीण हा चंचल प्राणी आहे. एका जागी फार न थांबता हरीण जंगलात विहार करीत राहते. त्या जंगलात कुठे काय आहे याची त्याला जाणीव नाही. तरीही बिनघोरपणे त्याचा संचार चालू आहे. त्याला चारा हवा आहे. एका वनात नाही मिळाला तर दुसऱ्या वनात जाईल. तिथेही न मिळाला तर जाईल तिसऱ्या वनात पण थांबणार नाही.
एक बन चरना, दूजे बन चरना ।
तीजे बन पग नही धरना ।।

कबीर हरिणाचं रूपक वापरून आपल्या चंचल मनाला समजावत आहेत. एक बन चरना...दूजे बन चरना....यातलं पहिलं वन तसं स्वतःच्या घरापासून जवळचं आहे. दुसरं जरासं दूर आहे. या दोनच वनांपर्यंत जात असलास तर ठीक पण तिसऱ्या वनात मात्र जाऊ नकोस.
मनाला सतत कोणत्या न कोणत्या गोष्टीचं आलंबन हवं असतं. त्याशिवाय ते स्वस्थ बसू शकत नाही. हे आलंबन म्हणजेच मनरूपी हरणाचा चारा. मग तो चारा कोणत्या वनातला घ्यावा ते कबीर सांगतात. पहिले वन - भगवंताच्या सगुण रूपाचे. मनाला त्या भगवद्रूपाचे आलंबन असेल तर ते अनावश्यक भरकटणार नाही. भगवंताचे सगुण रूप दिसत असल्याने आलंबन ठेवणेही सोपे.(जवळच्या वनात गेल्यावर घरी लवकर परत येणेही सोपेच).
दुसरे आलंबन भगवंताच्या नामाचे. नाम हे रूपापेक्षा सूक्ष्म असल्याने मन नामात स्थिर होणे ज़रा कठीण असते.
(ही दोन वने म्हणजे रूप आणि नामच कबीरांना अपेक्षित असतील असे नाही. पण जे रूपक वापरले आहे तयासाठी योग्य वाटतात. अजून कुणाला वेगळी कल्पना सुचत असेल तर अवश्य सांगा).
तीजे बन पग नही धरना....पण मना, तू आलंबन म्हणून पंचेंद्रियांच्या विषयांकडे धाव घेऊ नकोस.

तीजे बन में पाँच पारधी ।
उन के नजर नही पड़ना ।।
शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय म्हणजे पारधी आहेत. पारधी छलाने हरीण किंवा तत्सम इतर प्राणी धरतात. हे रूपक या पाच विषयांना लागू होतं.
हरीण सर्वात जास्त ध्वनीकडे आकर्षित होतं असं म्हणतात.ध्वनि हा आकाशाचा गुण आहे आणि म्हणून कानातल्या पोकळीत असलेल्या आकाशतत्वाचा विषय (म्हणून कानांचा विषय). विशेष म्हणजे आपण डोळे, नाक बंद करू शकतो, त्वचा झाकू शकतो, जिभेने स्वाद घ्यायचा नाही असे ठरवू शकतो, पण कान बंद करू शकत नाही. केले तरीही सर्वगत आकाश तत्वामुळे बारिक का होईना आवाज ऐकू येतोच. त्यामुळे शब्द हा विषय (विषय म्हणून अतिसेवन केलं) तर सर्वात जास्त घातक.
कबीर म्हणतात या पारध्यांच्या दृष्टीस पडू नकोस. म्हणजेच 'आपण विषय सेवावेत, विषयांनीच आपले सेवन केले असे होऊ नये'. म्हणजेच 'अति सर्वत्र वर्जयेत्'!
समर्थ म्हणतात- 'गळ गिळितां सुख वाटे । ओढून घेता घसा फाटे । का तें बापुडें मृग आपटें । चारा घेऊन पळता ।। तसे विषय हे आरंभी गोड वाटतात पण 'अंती दुःख नेमस्त आहे'!

पाँच हीरना पच्चीस हीरनी ।
उन में एक चतुर ना ।।

इथे पाच-पंचवीस असा सांख्य मार्गाचा संदर्भ येतो, पण तूर्तास हरीण या उपमेपुरते पाहू या.
हरणांना कितीही समजावले तरी ती ऐकत नाहीत.
अनेक मनुष्यांपैकी खऱ्या अर्थाने या सर्व समजावणीचा अर्थ उमगणारा एखादाच असतो. या अर्थाने 'उन में एक चतुर ना' असं म्हटलंय.

मग अगदी शेवटचा प्रयत्न म्हणून कबीर सांगतात की
तोहे मार तेरो मास बिकावै ।
तेरे खाल का करेंगे बिछौना ।।

बा हरिणा, तुला ते पारधी मारतील रे. तुझं मांस विकतील आणि तुझ्या कातड्याचे अंथरूण करतील. जिवाला मुकशील रे, नको जाऊस त्या तिसऱ्या वनात.
मनाच्या बाबत त्याचं मांस म्हणजे त्याची विचार करण्याची शक्ती. पाच विषयांच्या तावडीत सापडलं की ती शक्ती नाहीशी होणार! आणि मग मन कुठेच स्थिर होऊ शकणार नाही.

कहे कबीरा जी सुनो भई साधो।
गुरू के चरन चित धरना ।।

हरीण म्हणतं की मला कळतं पण वळत नाही, काय करु?
तर ऐक, सद्गुरूचे चरणकमल मनात दृढ़ धरून ठेव. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन होईल.

- चैतन्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर समजाऊन सांगितलंस रे !
म्हणजेच 'आपण विषय सेवावेत, विषयांनीच आपले सेवन केले असे होऊ नये'. म्हणजेच 'अति सर्वत्र वर्जयेत्'!>>>>>>. हे जास्त आवडलं कारण जास्त पटतं ते! विषयांचा त्याग हा कितपत प्रॅक्टिकल विचार आहे हे कळत नाही. पण विषयांचे प्रमाणात सेवन (without being addicted) ही मात्र १००% करता येण्यासारखी गोष्ट वाटते!
फर्माईश करु नये, पण असंच निर्भय निर्गुण वर पण लिहीलास तर खुप आवडेल! स्वरास्वाद मिटींग मध्ये एकदा तु न स्वराने समजाऊन दिले होते पण काही करणांंमुळे ( Wink ) ते अर्धवट राहिले, ते इथे आले तर खुप छान होईल! Happy

वाह... केवळ अप्रतिम, चैतन्य.

कुमार ह्याला अर्धाच दीपचंदी लावतात. म्हणजे त्याचा भरीचा भाग वाजवायचा.
दीपचंदी - धा गे न धा ग ति न ता गे न धा ग धि न
ह्याला 'धा गे न धा ग ति न' एव्हढाच वाजतो. त्यातही ठेका म्हणून - 'धा - ग धा - तिं -' असा संक्षिप्तं वाजवायचा. एकतारीनं ताल धरल्यास असाच ऐकू येईल की नाही?

अनेक निर्गुणी भजनांना असाच ठेका लावलाय.. निरगुण निरभय .. ला सुद्धा.

छान!

छान!

धन्यवाद मंडळी !

कुलू, निर्भय निर्गुणचंही लिहिलं आहे थोडं. देतो पूर्ण झालं की.

दाद,
मी केवळ शब्दांवर भर दिलाय लिहिताना आणि तुम्ही तालाची बा़जू समजावून सांगितलीत.
आता लेख पूर्ण झाला असं म्हणता येईल Happy

मस्त लेख्न. असेच राम निरंजन न्यारा रे वर पण लिहा. त्यात कोणता ताल आहे ? आपसूक पायात घुंगरू बांधून गिरक्या घ्याव्या असे वाट्ते.

गजानन, धन्यवाद! आधीचा लेख मी वाचला नव्हता.
पाच- पच्चीस- बद्दल थोडे अधिक-
पंचीकरण नावाची एक संज्ञा आहे. पंच महाभूतांच्या पंचीकरणातून हे विश्व निर्माण झालं असं म्हटलं जातं.
उदा- पृथ्वी तत्व घेतले तर त्याचे पाच भाग कल्पून, एक भाग पृथ्वी तत्व आणि उर्वरित चार भाग उरलेली तत्वे-
हे झालं पृथ्वी तत्वाचं पंचीकरण. असे पाचही तत्वांचे पंचीकरण होऊन स्थिर-चर सृष्टी तयार झाली असे सांख्यांचे मत आहे.
पाच गुणीले पाच = पंचवीस.
अर्थात, हा संदर्भ 'हीरना समझ बूझ बन चरना' या रचनेला तितकासा चपखल नाही, पण कबीरांच्या अनेक रचनांमधून असे संख्यात्मक संदर्भ येत राहतात.
राग छत्तीस सुनाऊंगा... इथेही छत्तीसच का? इतर कोणती संख्या का नाही? असा प्रश्न पडतो.
निर्भय निर्गुणबद्दल पुन्हा कधी तरी.

-चैतन्य.

वा, खुपच सुरेख निरुपण चैतन्य Happy हे भजन ऐकलेले नाही, कुणी गायलेले आहे का?
कबीर ह्या व्यक्तीबद्दल खुप उत्सुकता आहे. रामदासांप्रमाणेच प्रॅक्टिकल विचार मांडणारे संत एवढीच ओळख आहे, बाकी अधिकचं काहीच वाचलेलं नाही त्यांच्याबद्दल.

फर्माईशी वाचून सगळीच निर्गुणी भजनं मनात वाजायला लागली.
आणि अर्थान्वयन हा किती सुंदर शब्द आहे अरे! Happy

सई- कुमारांनी गायलं आहे अगं. खूपच सुरेख.
आणि अर्थान्वयन हा भारतीताईंचा शब्द आहे. सुरेख असणारच Happy

सुंदर निरुपण.

अशी भजने ऐकताना, मी अगदी तल्लीन होऊन जातो. पूर्ण अर्थ लागतोच असे नाही पण मग शब्द अनावश्यक वाटू लागतात. त्या लयीत दुसरेच काही भासमान होऊ लागते. पण कुणी असे छान समजावून साम्गितले तर त्या भासाला काही आकार येईल..

सुंदर निरुपण केले आहेस.

गजाननच्या धाग्यावर अकुने दिलेले ५-२५ चे स्पष्टीकरण खूप पटले होते.

तीन वने ही त्रिगुणांची द्योतक वाटतात. जगातल्या प्रत्येक गोष्टीवर त्रिगुणांचा पगडा असतो - मनावर तर अधिकच असतो. भौतिक जगात आहोत तर चरावे हे लागणारच (कर्म करावीच लागणार). त्याला पर्याय नाही. सात्विक वनात चरले तर उत्तमच! त्याने आपण फिट राहू (कर्मांचा मळ अंगी लागणार नाही). राजस वनात चरले तरी चालेल. आपण थोडे उपभोगी बनू पण अप्रीमीत हानी होणार नाही. पण तामस वनात मात्र चरायला नको. तामस गुण सद्सद्विवेक झाकोळून टाकतो. Retain करणे हा त्याचा स्थायीभाव. तो जिवाला जखडून टाकतो. मग जिवाची मुक्तीच्या वाटेवरची वाटचाल थंडावते.

तामस वनात ५ पारधी आहेत - पाच ज्ञानेंद्रिये आहेत, जी जीवाला घायळ करतात, त्याला पूर्ण गुंतवून टाकतात. त्या पारध्यांनी पकडलेली पाच हरणे (पाच कर्मेंद्रिये) आणि २५ हरीणी(२५ प्रकारच्या भोगवृत्ती) आहेत. त्यांच्याकडे सद्सद्विवेक नाही (मूर्ख आहेत ती) त्यामुळे ती त्या पारध्यांच्या जाळ्यातून सुटू शकत नाहीत. पुढे त्यांची ससेहोलपट ठरलेली आहे.

हे टाळण्यासाठी तू तिसर्‍या वनात चरू नकोस (तामसी कृत्ये करू नकोस).

सगळ्यांचे माहितीपूर्ण सुंदर प्रतिसाद.

चैतन्य, मी अनेको वेळा ऐकलेलं आहे हे भजन.
सुरूवात केल्याक्षणी आठवलं. कधी कधी शब्द वाचूनही डोकं ओळख देत नाही Sad

किती सुरेख निरुपण केलेस!
निर्गुणी भजने वेड लावतात खरच! "सुनता है गुरु ग्यानी, ग्यानी... ' हे तसच.
सन्त कबीर मला जाणुन घ्यायचेत. त्यान्चे साहित्य वाचायचे राहिलेय.

आर्या, चीजांचे शब्द आणि अर्थ इथे पान २१ वर अरुंधतीने "कोई सुनता है - जर्नी वुईथ कुमार अ‍ॅन्ड कबीर" या डॉक्युमेंटरीची लिंक दिली आहे. ती जरूर बघा. तुम्हाला आवडेल.

'चीजांचे शब्द आणि अर्थ'च्या धाग्यांवर इतरही गायकांच्या चीजांचे चांगले संकलन झाले आहे. त्या त्या धाग्यातल्या मुख्य पानावर आतल्या पानांवरच्या पोस्टींचे दुवे दिलेत. तेही जरूर बघा.

पुनश्च धन्यवाद सर्वांना.
दिनेशदा
पूर्ण अर्थ लागतोच असे नाही पण मग शब्द अनावश्यक वाटू लागतात. त्या लयीत दुसरेच काही भासमान होऊ लागते>>>
अगदी अगदी.
अर्थ लावण्याचा प्रयत्न भजन ऐकून झाल्यावर होतो माझ्या बाबतीत.

माधव, तीन वने त्रिगुणाची द्योतक...हेही सुरेख इंटरप्रिटेशन.

मनापासुन धन्यवाद गजाननजी! खुप सुंदर लिंक दिलीत..." जर्नी वुईथ कुमार अ‍ॅन्ड कबीर! Happy
आधी नाविन्यपुर्ण म्हणुन बघत असतांना त्यात कधी हरवुन गेले समजलेच नाही. काल दिवसभर पुन्हा पुन्हा तेच पाहिले.

'चीजांचे शब्द आणि अर्थ' ... अफ़ाट कलेक्शन आहे हे! हवे ते निवडुन बघत असते मी! Happy

चैतन्य महाराज _/\_
जेथें निरूपणाचे बोल| आणि अनुभवाची ओल |
ते संस्कृतापरी सखोल| अध्यात्मश्रवण || Happy