स्फुट ८ - बाबासाहेब

Submitted by बेफ़िकीर on 15 April, 2016 - 10:28

बाबासाहेब
कृपया
परत जन्म घेऊ नका

तुम्ही चहूकडून हायजॅक होता
तुम्ही एकटेच असल्यामुळे

तुमच्या मिरवणूका निघतात
पुतळे सजतात
भाषणे झडतात
संघटना उभ्या राहतात
सगळे केवळ....
कोणी तुमच्यासारखे होऊच न शकल्यामुळे
तुम्ही एकटेच असल्यामुळे

कोणासाठी आणि कश्यासाठी झगडलो
हे नाही समजणार तुम्हाला
परत आलात तर
फक्त....
इतके समजेल की असे का झाले
उत्तर....
तुम्ही एकटेच असल्यामुळे

देश चालवत आहेत
आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रवाह
नीतीमूल्ये
अठ्ठेचाळीस साली मारली गेली

तेव्हापासून भरडला जात आहे भारत
एका एककल्ली विचारसरणीच्या जात्यात
जी विचारसरणी
भारताबाहेरची आहे
जी करत आहे भारताला लाचार, मिंधा

सरकारे येतात, सरकारे जातात
पुतळे सजतात, पुतळे कुजतात
कर्जे वाढतात, उधारी वाढते
मूल्ये नष्ट होतात, शरमिंदगी बोकाळते

अहो बाबासाहेब
चांगले असणे वाईट आहे

तुम्हाला हे तेव्हाही कळले असेल
पण ऐकणार कोण तुमचे
कळूनही दुर्लक्षच केले गेले असेल
तुम्ही एकटे असल्यामुळे

पुन्हा जन्म घेऊ नका
पस्तावाल बाबासाहेब
चांगल्यासाठी कोणालाच
काहीच करायचे नव्हते

पुन्हा नका जन्म घेऊ
=================

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy