सांधीकोपरं

Submitted by जव्हेरगंज on 15 April, 2016 - 01:24

बाई मरुन गेली. अन घराचं सांधीकोपरं काळवंडलं. मधल्या वाश्याच्या खोबणीत एका भुंग्यानं साम्राज्य थाटलं. लाकडाची भुकटी करुन मग आत खोलवर पसरवलं. खालच्या आड्याला काळ्या कातळाचं गठळं साचलं.

सुर्य सकाळी उगवायचा अन पारुश्या घरात येऊन तापायचा. त्याच्या रोगट उन्हाचा सडा छपरा-भिंतीवर पडायचा. म्हातारी आपलं भुंडं केस विचरत ओट्यावर बसून राहायची. खुडूक कोंबडी सारखी.

उघड्या दरवाज्यातनं गांधीलमाशी आत यायची अन वळचणीला जाऊन भिरभिरायची. दिवळीच्या आत तिनं पण भोकं भोकं करुन ठेवलेली. त्यात जाऊन लपायची. एकदा कोळ्याच्या जाळ्यात सापडली अन मरुन गेली. मागे भोकाभोकातली अंडीपिल्ली ठेवून तशीच गेली. तिचं पार्थिव शरीर जाळ्यात कधीकधी थरथरतं. एके दिवशी तेही नाहिसं झालं.

म्हातारीला उठवणी यायचं. घरात येऊन मग ती कपभर चहा करुन प्यायची. खरकटी भांडी खंगाळताना मग एकटीच हातवारे करून बोलत बसायची. देवपूजा तिच्याच्यानं होत नव्हती. पण जपमाळ ओढत उन्हात जाऊन बसायची.

भुंगा रोजच यायचा. लाकूड भरडून आतला भुसा बाहेर टाकायचा. त्याचा किरकीट आवाज रात्री बेरात्री ऐकू यायचा. कुणी एक सुतारपक्षी दुपारचं गोठ्यातल्या बांबूवर आपली चोच अशीच आपटायचा.

म्हातारीला आताशा जास्त करणं होत नाही. कसलसं निदान झालं अन एके दिवशी तीही मरुन गेली.

घरामागच्या झेंडूच्या फुलांनीही माना टाकल्या. गोठ्यावर शेकारलेलं पाचूट उडून गेलं. लिंबूनीचं एक रोप लावलेलं ते कधी उगवलंच नाही. घरामागची बाभळ मात्र ताडमाड उभी होती.

परवा वादळी वाऱ्यात ते घर म्हणे पडून गेलं. अन बाईची एकमेव अस्तित्वखूण पुसून गेली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलय तरी कस म्हणायच.. बाई मुळेच घराला घरपण असत हे फार सुचक शब्दात मांडल आहे......:)

जव्हेरगंज, तुम्ही खुप सुंदर लिहिता.तपशील, समर्पक शब्द आणि लिहिण्यात असलेली लय यामुळे तुमचे लिखाण नेहमीच वाचनीय असते. आणि प्रत्येक कथेत काहितरी नविन विषय-आशय असतो, एकसुरी पणा नसतो हे विशेष.

भरपूर लिहा! Happy

जव्हेरगंज, तुम्ही खुप सुंदर लिहिता.तपशील, समर्पक शब्द आणि लिहिण्यात असलेली लय यामुळे तुमचे लिखाण नेहमीच वाचनीय असते. आणि प्रत्येक कथेत काहितरी नविन विषय-आशय असतो, एकसुरी पणा नसतो हे विशेष.>>> +१ मला जे म्हणायच होते, तेच.. लिहीत रहा असेच.. Happy

जव्हेरगंज, तुम्ही खुप सुंदर लिहिता.तपशील, समर्पक शब्द आणि लिहिण्यात असलेली लय यामुळे तुमचे लिखाण नेहमीच वाचनीय असते. आणि प्रत्येक कथेत काहितरी नविन विषय-आशय असतो, एकसुरी पणा नसतो हे विशेष.>>> +१

काही शब्द खासच!! उठवणी म्हणजे काय?

जव्हेरगंज, तुम्ही खुप सुंदर लिहिता.तपशील, समर्पक शब्द आणि लिहिण्यात असलेली लय यामुळे तुमचे लिखाण नेहमीच वाचनीय असते. आणि प्रत्येक कथेत काहितरी नविन विषय-आशय असतो, एकसुरी पणा नसतो हे विशेष.>>> +१00