तरुण पहाट

Submitted by संतोष वाटपाडे on 13 April, 2016 - 00:17

कोवळे चिंब पोपटी तुरे स्वच्छंद जांभळी फ़ुले
गवतात थेंब थांबले धुक्याचा पदर मलमली झुले
मातीत मिसळला गंध उसळला घमघमला मारवा
मंजूळ कुहुक नाजूक झुळुक तन गोठवणारी हवा

या ओल्या बांधावरती
पावले कुणाची पडली
का फ़ुलराणीची काया
लाजून पुन्हा अवघडली

सोवळे नेसली तंग झाकुनी अंग कोण ही तरुणी
घायाळ कुणा करणार पुन्हा शृंगार आगळा करुनी
क्षितिजाच्या उंच गवाक्षातुन पाहतो देखणा रवी
सांडते कधी बेधुंद तिचे तारुण्य मुके एरवी

ही चंचल अल्लड तरुणी
जाहली दवाने ओली
थरथरत्या गालावरती
साकळली थोडी लाली

मोतिहार पाचुची कुंडले टांगली बाभळीवरी
घसरते नजर सारखी कटीच्या रुंद साखळीवरी
पसरुन रुपेरी हात रवी साक्षात प्रकटला रानी
वितळली बिलगली पहाट बघते दवभरल्या डोळ्यांनी

डोईवर पदर उन्हाचा
पैंजणे उन्हाने सजली
कायेवर कृष्ण उमटला
ती पुरती राधा झाली

-- संतोष वाटपाडे (नाशिक)

Group content visibility: 
Public - accessible to all site users