स्फुट २ - मला एक कळत नाही

Submitted by बेफ़िकीर on 6 April, 2016 - 10:20

भरलेल्या आभाळासारख्या पदरामधूनही
तुझं उतू जाणारं यौवन दिसतं मला
ते दिसावं, दिसू नयेही
बघितलं जावं, बघितलं जाऊ नयेही
त्याकडे नजरा वळाव्यात, वळू नयेतही
ती तुझी ओळख ठरावी, ठरू नयेही
अश्या गोंधळलेल्या मनस्थितीत तू

पण मी स्वच्छ आणि रोखठोक

तुझं किंवा इतर कोणाचंही असंच यौवन बघून
मनातल्या मनात चळणारा
आणि वरवर मात्र
तुझ्या पदराप्रमाणेच
कधी न ढळणारा

मला एक कळत नाही

पुढेमागे पुरुषांमध्ये काही बघण्यासारखे निर्माण झालेच
आणि लागल्याच बघू बायका त्या नजरेने पुरुषांकडे
बिनदिक्कतपणे
करू लागल्या छेडछाड
मारू लागल्या शिट्ट्या
मिचकावू लागल्या डोळे
रोखू लागल्या नजरा
करू लागल्या नको तसे स्पर्श

तर ते कदाचित मला आवडणार नाही, ह्याची

...... मला आज का भीती वाटत आहे?
===============================

-'बेफिकीर'!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users