बरसात भोवताली

Submitted by निशिकांत on 5 April, 2016 - 00:49

सुकल्याच आसवांची बरसात भोवताली
समजावतो मनाला "मी मस्त भाग्यशाली"

मी धुंद फुंद जगलो हिरवळ, वसंत नसुनी
ऋतुराजची हरवली गर्विष्ठ मस्तवाली

मुर्दाड लोक असता क्रांती कशी घडावी?
गेले कुठे निखारे? विझल्या कशा मशाली?

रेंगाळलेत खटले, न्यायालयांस सांगा
प्रतिमाह वाद इतके, काढायचे निकाली

बाळास खुष कराया, खोटीच फोनवरती
दु:खी, तरी कळवतो नसतेच जी खुशाली

पाहून अंधश्रध्दा, सारे तुझे पुजारी
नावे तुझ्याच देवा! करतात रे दलाली

जातात वाममार्गे श्रीमंत ते यशस्वी
करतात सत्त्यवादी आयुष्यभर हमाली

रुजतेय संस्कृती का लोकात मुखवट्यांची?
सभ्यात, प्रश्न पडतो, दडलेत का मवाली?

"निशिकांत" गोठलेले अश्रू कसे वितळले?
जपल्यात आठवांच्या उबदारशा दुशाली

निश्कांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२३
E mail--nishides1944@yahoo.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळास खुष कराया, खोटीच फोनवरती
दु:खी, तरी कळवतो नसतेच जी खुशाली >>> .....
.............इतक्या सगळ्या सामाजिक वगैरेआशय असलेल्या कड्व्याच्या उग्रस कडव्यांच्या ढिगारयाखाली जणु या दोन ओळीत दडलेलं आर्त, गहिरे काव्य गुदमरून गेलय.

>>>रुजतेय संस्कृती का लोकात मुखवट्यांची?
सभ्भ्यात, प्रश्न पडतो, दडलेत का मवाली?>>>वाव्वा...क्या बात!