प्रतीक्षा .....

Submitted by भुईकमळ on 28 March, 2016 - 10:28

मी पाहतेय वाट ,
त्या ओथंबल्या मेघावलीची
जी निरोप घेणारया माहेरवाशीणीगत
गदगदून रडेल ,माझ्या कुशीत शिरून
त्यावेळी पापणीबंद केलेले
कित्येक एकाकी पावसाळे
झरझरून वाहतील माझ्या गालावरुन.

मी पाहतेय वाट त्या अनुभुतीच्या क्षणाची
ज्याच्या तेजकणिका ठिबकतील
या प्रवाहयामिनीतील मंदावल्या दिपकळ्यांतून
दाह शमवतील त्या अश्वत्थ् मनाचा
शीतल चांदणलेप होऊन ….

मी पाहतेय वाट त्या अमृतदंशाची
जो भिनत जाईल खोलवर गोठत
जाणारया रक्तातून अन सळसळती जीवनेच्छा
तृणपात्यांसम तरारून वर येईल
हा टणक प्रस्तर भेदून
पुन्हा एकवार दुडदूडतील पावसाळी झुळझुळवाटा
शब्दांच्या उजाड मुलखातून

मी पाहतेय वाट ती जादुई छडी गवसण्याची
जी बनवून टाकेल मोरपिसी उत्तरं
सारया काटेरी प्रश्नांची ,
या नि:स्वप्न डोळयांच्या पापण्यांवरून
ती फिरतील तेव्हा फुलपंखी तरल कविता
पुन्हा फडफडत उसळतील त्यातून …

मी पाहतेय वाट त्या साक्षात्कारी क्षणाची
जो देईल एक त्रयस्थ नजर
माझ्यातच आरपार पाहण्याची
कलंडून जाईल तेव्हा
बाहेरच्या निळाईत
देहाकारात तुडूंब भरलेलं निलाकाश
तोपर्यंत 'मी वाट पाहतच राहीन '
स्वप्नस्थ मनाच्या काठावर
जागृतीचे शुभ्र थवे उतरण्याची .
................. माणिक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>मी पाहतेय वाट त्या अमृतदंशाची
जो भिनत जाईल खोलवर
गोठत जाणारया रक्तातून
अन सळसळती जीवनेच्छा
तृणपात्यांसम तरारून वर येईल
हा टणक प्रस्तर भेदून
पुन्हा एकवार दुडदूडतील पावसाळी झुळझुळवाटा
शब्दांच्या उजाड मुलखातून>>>अप्रतिम,अप्प्रतिम...केवळ अप्रतिम!!!

शीतल वाऱ्याच्या मंदावलेल्या लहरींशी संवाद साधणाऱ्या अवखळ झऱ्याचा निनाद आपल्याही कानी पडावा असा काहिसा अनुभव देणारी...नितांत सुंदर कविता!

मनःपूर्वक अभिनंदन माणिकजी!
धन्यवाद!

मी पाहतेय वाट त्या अनुभुतीच्या क्षणाची
ज्याच्या तेजकणिका ठिबकतील
या प्रवाहयामिनीतील मंदावल्या दिपकळ्यांतून
दाह शमवतील त्या अश्वत्थ् मनाचा
शीतल चांदणलेप होऊन …. >> खूपच आवडले हे. तेजाची ही प्रार्थना वेगळ्याच उन्मनीतून झाल्यासारखी वाटते.

सत्यजित … धन्यवाद ! अगदी काव्यात्मक शब्दांतला प्रतिसाद आहे तुमचा .इतका की मीच पुन्हा एकदा हा मुक्तछंद वाचुन त्यातली शब्दप्रचिती अनुभवण्याचा प्रयत्न केला.
भालचंद्र बरोबर जाणलत मनाच्या एका वेगळ्याच उन्मनी अवस्थेतून उमटलेल्या त्या ओळी आहेत.
पहाटकिनारयापासुन दूर ...जीवनप्रवाहातून संथ वाहताना ,दीपकळ्यांच्या प्राणवाती विझु विझू येताना जिवाला लागलेली ती आत्यंतिक आस आहे . 'तेजाची ही प्रार्थना ' हे किती यथार्थसुंदर शब्द वापरलेत तुम्ही त्यासाठी… खूप धन्यवाद !
मनीमोहोर thanks !
चांगल्या कवितेला हमखास मिळणारी तुमच्यासारख्यांची दाद एक नवा हुरूप देते नव्या लिखाणासाठी …
विलासराव … खूप धन्यवाद !

मी पाहतेय वाट त्या साक्षात्कारी क्षणाची
जो देईल एक त्रयस्थ नजर
माझ्यातच आरपार पाहण्याची
कलंडून जाईल तेव्हा
बाहेरच्या निळाईत
देहाकारात तुडूंब भरलेलं निलाकाश >>>>> कसली जबरदस्त उत्कटता आहे या प्रतिक्षेत !!

होय भारती , प्रतीक्षेतल्या काव्याला अध्यात्माची खोली प्राप्त झालीय.जी शेवट्च्या काही ओळीतुन दृश्यमान होते.म्हणजे घट फुटल्यावर आतील घटावकाश बाहेरच्या अवकाशात मिसळून जाते .प्रत्यक्षात देहात व बाहेरही जे चैतन्य भरून राहिलंय त्याच्या अखंडत्वाची प्रचिती येण्यासाठी जन्माच्या स्वप्नावस्थेतुन जाग येण्याची गरज आहे. तुमच्या प्रतिसादाने आनंदून गेलेय नेहमीप्रमाणेच …आता तुमच्या कवितेची वाट पहात आहे. खूप खूप धन्यवाद !

शशांक , तुमच्यासुद्धा प्रतिसादाने ... खुप छान वाटतंय . मनापासून आभारी आहे.

मुग्धमानसी , धन्यवाद ! तुमच्या बहुमोल प्रतिसादासाठी …

...हर्पेन , माबोवरील अगदी पहिल्या दिवसापासून तुमची दाद लेखनासाठी प्रोत्साहीत करत आली आहे खुप धन्यवाद !.

सुंदर शब्दशिल्प !!!! शब्द बापुडे ... शब्द बापुडे न राहता , उत्कटतेची अनुभूती देणारे... वाह

कलंडून जाईल तेव्हा
बाहेरच्या निळाईत
देहाकारात तुडूंब भरलेलं << वाह!

सत्या+१