सायकलीशी जडले नाते २४: "चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना

Submitted by मार्गी on 28 March, 2016 - 08:22

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

सायकलीशी जडले नाते १९: उत्साह वाढवणा-या राईडस

सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस

सायकलीशी जडले नाते २१: चढाच्या रस्त्यावर सायकल चालवण्याचा आनंद

सायकलीशी जडले नाते २२: सिंहगड राउंड ३- सिंहगड फत्ते!

सायकलीशी जडले नाते २३: नई हैं मन्जिलें नए हैं रास्ते. . नया नया सफर है तेरे वास्ते. .

"चांदण्यात फिरताना" एप्रिलच्या ऊन्हात परभणी- जालना

मार्च २०१५ मध्ये मस्त सायकलिंग झालं. आता लदाख़ सायकल राईडसाठी ट्रेनचं बूकिंगही केलं आहे. तयारीसाठी अजून दोन महिने आहेत. राईडस सुरू राहिल्या. एक मोठी सेंच्युरी- डबल सेंच्युरी करण्याच्या उद्देशाने ११ एप्रिलला सकाळी निघालो. परभणी- जिंतूर- जालना- औरंगाबाद असं जाणार आहे. साईयल चालवताना मनात एकच विचार आहे- तयारी अजून कशी वाढवली पाहिजे? लदाख़च्या प्रवासासाठी तयारीचे अनेक घटक आहेत. पहिली बाब म्हणजे सायकलिंगचा सराव आणि फिटनेस- स्टॅमिना. त्यासाठीसुद्धा अनेक गोष्टी आहेत जसं सायकलिंगसोबत जंपिंग, पूरक योगा, प्राणायाम आणि स्ट्रेचिंग. मी सायकलिंग व योगा नियमित करतोय, पण स्ट्रेचिंग व वार्म अपसारखे व्यायाम अजून केले नाहीत. आणि काही अनुभवातून कळालेल्या गोष्टी करतोय- जसं संध्याकाळी राईड झाल्यानंतर पाय भिंतीवर टेकवून पडणे, पायांना सायकलिंगच्या विरुद्ध दिशेमध्ये हालचाल होण्यासाठी पाद संचालनासारखे योगासन आणि महत्त्वाची बाब म्हणजे प्राणायाम- श्वासावर काम. पण ह्या दिशेने अजूनही खूप काही करणं बाकी आहे. दुसरी बाब म्हणजे सायकलचं रिपेअरिंग शिकणं. तिथेही खूप तयारी करायची गरज आहे. अर्थात् मनामध्ये सगळ्यात जास्त भिती घाट रस्त्यावर सायकल चालवता येईल ना ही होती आणि त्या दिशेने मी एका टप्प्यापर्यंत पोहचलो आहे. असो.

हळु हळु ऊन वाढत चाललं आहे. पण सूर्योदयापासून बाहेरच असल्यामुळे शरीराला इतकं ऊन जाणवत नाहीय. जर कोणी अचानक एसीमधून ४४ अंश तपमानात बाहेर आला, तर त्याला चटकाच बसेल! निवांत रस्ता आणि सायकलच्या टायर्सचा आवाज! पहिले साडेपाच तास अतिशय सुखद गेले. सुमारे ८० किलोमीटर पूर्ण झाले. आता सकाळचे साडे अकरा वाजत आहेत. थोड्याच वेळात हायवे म्हणजे दोन लेनचा रोड लागेल. पण एक अडचण अशी आहे की, चांगला नाश्ता मिळत नाहीय. ओआरएस व ज्युस घेतोय, पण चांगलं काही खायला मिळत नाहीय. ह्याही गोष्टीवर विचार करावा लागेल.

सहा तास पूर्ण झाल्यानंतर हळु हळु पाय बोलायला लागले. सारखं थांबावसं वाटत आहे. वेगही कमी होतोय. हा रस्ता मस्त आहे. टू बाय टू असल्यामुळे वाहनांची अजिबात भिती नाही. तसंच वाहतुकही कमीच आहे. अशा रस्त्यावर ड्राईव्ह करण्याची मजा वेगळी! हळु हळु जालना शहर जवळ येतं आहे. पण वेग फारच कमी आहे. टायर चेक केल्यावर लक्षात आलं की, पंक्चर आहे! मी खरं तर ह्याचीच वाट बघत होतो. कारण मला ख-याखु-या परिस्थितीत पंक्चर काढण्याचा अनुभव घ्यायचा आहे. सोबत पूर्ण सामान आहे- पंक्चर किट, पंप आणि एक दोन इंच खोलीचं पसरट भांडं. शिवाय पंक्चरसाठी वेगळी पाण्याची बाटलीसुद्धा आहे. पहिल्यांदाच पंक्चर काढेन! एक चूक लगेचच कळाली. पंक्चर काढण्यासाठी आधी ट्युब बाहेर काढावी लागते व त्यावेळेस दोन स्क्रू ड्रायव्हर लागतात. एक स्क्रू‌ ड्रायव्हरने टायरचं टोक थोडं बाहेर काढून ठेवावं लागतं आणि दुस-या स्क्रू ड्रायव्हरने टायर मोकळं करावं लागतं. पण कमी वजन ठेवण्याच्या नादात मी एकच स्क्रू‌ ड्राय्व्हर आणलाय! "ओढून ताणून" कशीबशी ट्युब बाहेर काढली. मग असंच धडपडत पंक्चर काढलं. पहिल्यांदा झालं नाही. मग परत बनवलं. आणि त्याच प्रकारे ट्युब परत टायरमध्ये फिट केली. आता बघूया काय होतं!

थोड्या वेळ सायकल बरी चालली. पण आता पाय बरेच दुखत आहेत. आता कडक ऊन म्हणजे काय हे कळतंय. वेग कमी होत जातोय व ९० किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर येणारा थकवा!. अशा वेळेस गाणी फार उपयोगी पडतात. गाणी अगदी ऐकलीच पाहिजेत असं नाही. मनातल्या मनात आठवलं तरीही ऊर्जा मिळते. अशा कडक ऊन्हामध्ये मनात आठवण्यासाठी साजेसं गाणं म्हणजे "चांदण्यात फिरताना" किंवा "ठण्डी हवाएँ. . " मन लगेच रिफ्रेश होतं! पण शरीर जर तक्रार करत असेल तर हा ताजेपणा टिकत नाही. आणि झालं, परत पंक्चर झालं! कदाचित असं तर नाही, की मी पंक्चर तर बरोबर काढलं असेल, पण ट्युब टायरमध्ये फिट करताना स्क्रू ड्रायव्हरमुळेच नवीन पंक्चर झालं असेल! परत एकदा पंक्चर काढलं. ट्युब आतमध्ये बसवली. पहिल्यांदाच करत असल्यामुळे पाऊण तास एक पंक्चर काढायला लागतोय. थोडं पुढे गेलो. शतक पूर्ण झालं, पण ते लक्षातही आलं नाही. उलट आता मन म्हणतंय पुरे झाला वेडेपणा! लदाख़ झालं इथेच! आता हा नाद सोड! पण मनात हसूही येतं आहे की, वा, खरी मजा आता येते आहे!

हेही पंक्चर फार वेळ टिकलं नाही आणि परत हवा गेली. आता मी पूर्ण वैतागलो आहे. पंक्चर काढण्याऐवजी हवा भरली आणि थोडं पुढे गेलो. एका जागी एक मॅकेनिक मिळाला. त्याने दहा मिनिटात पंक्चर काढून दिलं. एक पंक्चर स्क्रू ड्रायव्हरमुळे झालेलं मिळालं! माझी अवस्था वाईट आहे! पुढे जाणं अवघड होतं आहे. पंक्चर तर ठीक झालं, पण पायांचं काय! आता जालना जेमतेम पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे!‌ ते मला विचारतंय जणू जाल- ना? एका जागी लिफ्ट घेण्याचाही विचार केला, पण इथे बस स्टॉप नव्हता त्यामुळे पुढे गेलो. इंचा इंचाने जालना जवळ येतंय. अजून हातात वेळ खूप आहे, पण ऊर्जा क्षीण होतेय. दुपारी तीन वाजता जालना शहराजवळ आलो. सुमारे १३७ किलोमीटर झाले. इथून औरंगाबादसाठी लिफ्टनेच जाईन. आणि एक टेंपोवाला मिळाला. पण तो मला औरंगाबादला अशा जागी सोडेल जिथून मला माझ्या नातेवाईकांकडे जाण्यासाठी अजून दहा किलोमीटर सायकल चालवावी लागेल! असो


आजचा १३७ किलोमीटरचा मॅप. ११ किलोमीटर औरंगाबादमध्ये. आज फार फोटो घ्यायची इच्छा झाली नाही.

पन्नास किलोमीटर टेंपोमधून गेलो. संध्याकाळ होता होता औरंगाबादच्या चिकलठाण्यामध्ये परत सायकल सुरू केली. शहराच्या वस्तीत व दहाच किलोमीटर जायचं असल्यामुळे बरं आहे. इतकी अडचण आली नाही. पाय बोलत आहेत, पण चालूही आहेत. सायकल थांबवली तेव्हा एकूण १४८ किलोमीटर झाले आणि बॅटरी अगदी थोडी शिल्लक आहे. डोळे आणि चेहरा लाल झालाय. अशा वेळेस लवकर आरामही करता येत नाही. त्यामुळे रात्री उशीराच झोप लागली. नंतर जाणवलं की, चला २०० किलोमीटर नाही, पण १४८ किलोमीटर तर झाले! पंक्चर शिकण्याची पहिली इयत्ता सुरू झाली आणि लॅपटॉपसह सामान घेऊन ही राईड केल्यामुळे चांगला सरावही मिळाला. .

पुढील भाग २५: आठवे शतक

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीर्षक वाचुनच उडालो... तिकडचा उन्हाळा माहिती आहे.... एप्रिलच्या उन्हात एकट्याने फिरत जाणे....
पण "रॅन्डोनिअर" बनण्याच्या दिशेनेच तुमची प्रयत्नांची पराकाष्ठा चालली आहे हे नक्की... Happy
मी पण वाचतोय.... समजुनही घेतोय बर्याच बाबी. Happy
तो परिसर, अन ते अंतराचे बोर्ड वाचुन थोडा नॉस्टॅल्जिक की कायसासाही होतोय.