उठती है हर निगाह खरीदार की तरहा.....!

Submitted by सुप्रिया जाधव. on 28 March, 2016 - 03:29

झोपायला रात्रीचे बारा वाजणे हे रोजचेच....त्यामुळे तसे अंगवळणी पडलेले मात्र एखाददिवशी झोपेचे बारा वाजले की तिची खरी किंमत कळते....नाही का ?....तर झाले असे की 4 दिवसांची सुट्टी आल्याने आधीच सगळ वेळापत्रक बदललेल ...दुपारी दोन एक तास मस्त झोप काढून संध्याकाळी फिरायला जायचे हा पायन्डा पडला गेला होता...कोहलीने खिशात घातलेली मॅच व कांगांरूंची पूर्वापार चालत आलेली दहशत त्यावर चर्चा करत करत काल रात्री उशिरानेच झोपी गेलो ...मात्र साधारण 2-2.30 ला भयंकर उकाड्याने जाग आली...पहातो तर सिंगलफेजिंगमुळे ए सी ने मान टाकलेली... गोव्याचा सगळा दमटपणा घरातच घुसला होता जणू ! नुसती चिकचिक आणि वैताग !!

काहीही उपाय न सुचून आहे त्या अवतारात माय लेक साधारण 3 एक वाजता लॉंग ड्राईव्हला निघालो....म्हापसा बस स्टैंण्डपाशी मार्केटमधे चहा घेवून नेहमीच्या वेंगेटोर बिचवर जायचे ठरले...मार्केटपासली अस्वच्छता पाहून बिचवरच काहीतरी जावून खावे असे ठरवत बागा बिचकडे गाड़ी वळवली ...एका चौकात कैफ़े कॉफ़ी डे उघडे दिसलेले पाहून गाड़ी पार्क करताना मुलींचा गलका कानावर पडला म्हणून आश्चर्याने वळून पाहिले तर 3 हुकर्स (वेश्या) मोठमोठ्याने बडबडत उभ्या असलेल्या दिसल्या... भडक मेकअप...अतिशय तोकडे कपडे...आणि विचित्र अंगविक्षेप....मुख्य म्हणजे हे काही वेगळे करतोय आपण हयाचा मागमुसही नसलेले कोरडेठक्क चहरे !

त्यातल्या दोघी ...एक अगदी तरूण, सुन्दर म्हणता येईल अशी बहुधा नवखी आणि दुसरी बरीच थोराड़ पक्की मुरलेली ...चौकाच्या एका बाज़ुला तर दुसरयाबाजुला अगदीच पंचविशितली जराशी अल्लड वाटणारी मुलगी तिच्याहून छोट्या वाटणाऱ्या मित्रासोबत येणाऱ्या जाणार्यांवर नजर ठेवून गप्पा मारत होती. आम्ही ऑर्डर देवून बाहेरच्या खुर्चयांवर वाट पहात बसलो. ऑर्डर यायला लागलेल्या 15-20 मिनिटांच्या अवधित अनाहुतपणे समोरचे निरिक्षण चालू होते. कारवाले, बाईकवाले आणि पायी चालणारे पुरूष अनुक्रमे थांबून काही अंदाज लावत त्यांच्याशी वाटाघाटी करीत होते. ह्यांचा प्रेफरेंस कारवाल्यांकडे होता. ती थोराड़ स्त्री वाटाघाटी करण्यात पुढाकार घेत होती आणि दुसरी इकडे तिकडे कावरीबावरी होत बघत उभी राही. तिसरी जी अगदीच पंचविशीची वाटत होती ती दूर अंधारात एकटीच उभी होती तिला सोबत करणारे तिचे मित्र मात्र बदलत होते.

असे तासभर चालूनही त्यांची कुठेच काही ड़ाळ शिजत नव्हती...लोकं येत होती जात होती ...कोणी सराईतपणे राजरोस नखशिकान्त न्याहाळत होते तर कुणी चोरटया नजरेने....कुणी खऱ्या उद्देशाने बोलणी करत....हातवारे करत हॉटेलचे पत्ते समजावून सांगितले जात होते तर कुणी फ़क्त हा काय प्रकार असावा या उत्सुकतेपोटी बोलणी करत केवळ आपले अनुभवविश्व थोडेसे विस्तारित करीत तिथून हसत हसत निसटत होते. अचानक परिस्थितिला कलाटणी देणारे दोन प्रसंग घडले...

ती जी ठेंगणी ठुसकी एकटीच उभी होती मित्रांसोबत तिला पोलिसांनी हटकले... तसे ते मित्र पांगले आणि ती ही एका आतल्या बाजूच्या गल्लित जावून कोपर्यात उभी राहिली....तितक्यात एका ओपन जिपमधुन 4-5 सुन्दर तरुण मुलींचा घोळका एन्जॉय करत पास व्हायला लागला...तशी ही थोराड़ स्त्री भयानक चिडली...तिने जिपचा पाठलाग करून मोठमोठ्याने आरडाओरडी ...अर्वाच्य शिविगाळ करायला सुरवात केली....तिला त्या मुली सांगत होत्या की आम्ही तश्या नाही आहोत...फॅमिलीसोबत आहोत...मात्र ती चवताळलेल्या वाघिणीसारखी त्यांच्या अंगावर धावून जात ओरडत होती की तासभर आम्ही काय ×××× मारत उभे होतो ? ....वगैरे वगैरे ! सगळा उद्वेग कर्कश्य आवाजात बाहेर पडल्यावर तिरिमिरित तिने कुणालातरी फोन केला...थोड्याचवेळात एक टॅक्सी आली आणि दोघी निघून गेल्या.

पहाट फटफटायला लागलेली आणि वर्दळ पांगायला....तिथे आता कोणीही हुकर्स नसुनही जाणाऱ्या येणाऱ्या पुरुषांचे डोळे त्या चौकात आल्यावर वखवखल्या नजरेने वेध घेत होते की ..काही नाही हाती लागले तरी आज काय नविन माल आलाय बाजारात तो तर पाहू ! चीज उचलायची की नाही हे तर आपल्याच मर्जीवर असेल....नाही का !

हम है मताये कुचाओ बाजार की तरहा
उठती है हर निगाह खरीदार की तरहा !!

सुप्रिया

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह Sad