“आजाद चेन्नई”

Submitted by Charudutt Ramti... on 21 March, 2016 - 21:47

“आजाद चेन्नई”

चेन्नई च्या कुन्द वातावरणात एकदा का तुमचा प्रवेश झाला की तुम्ही पूर्णपणे 'द्रविड' होऊन जाता. मग भले ही तुम्ही दिसायला अगदी गोरे गोमटे ‘आर्य’ का असेनात. नारळाच्या करवंटी उगवतात तसे जाड केस, स्त्री असो वा पुरूष, नुकताच पॅराशूटओईल ने मसाज केल्या सारखा चेहरा. तुक्तुकित पण आणि चकचकीत पण. रस्त्यावर बर्याचश्या पॅंटी ( हा शब्द मराठी मानून घ्यावा ) पण आधून मधून चारास एक या प्रमाणात लुन्ग्या. भात खाऊन खाऊन देहाच झालेल पोतं. आपल्याकडे कसे गल्लीतल्या नगरसेवकाच्या वाढदिवसाचे फ्लेक्स असतात, अगदी तसेच पण त्याहून साधारण दहा ते वीस पट मोठे. त्यावर रामायण किंवा महाभारतातले वीरपुरूष हातात धरतात तशी पौराणिक अस्त्रे हातात धरून इथल्या पॉलिटिशियन्स चे फ्लेक्स. अशी दृष्य अवतीभवती दिसायला लागली की समजून घ्या, की तुम्ही चेन्नई मधे आलाय.

चेन्नई ही मुंबई सारखीच अजस्त्र आणि तितकीच बेढबही. पुण्या सारखा आटोपशीर पणा हिच्या नशिबी नाही. पण पुण्यातला 'सदाशीवपेठी पणा मात्र' इथल्या पुडी च्या चटणी मधे ठासून भरलेला. ठसका लागला नाही तरच नवल.
हिंदी भाषिकाला इथे शून्य किंमत. काही मोजकीच सेंट्रल गवर्नमेंट ची ओफीसेस असतात तिथे नावाच्या पाट्या हिंदी मधे लिहिलेल्या असतात. पण ते हिंदी इतक वाईट आणि निकृष्ट की पुर्वी दूरदर्शन वरच्या हिंदी बातम्या देणारा 'शम्मी नारंग' ला 'हे हिंदी वाच' म्हणून सांगितले तर तो हे इथल हिंदी वाचण्यापेक्षा उंदीर मारतात ते टिक ट्वेंटी पिऊन आत्म्हत्या करण जास्त पसंत करेल. साध ‘केंद्रीय विद्यालय’ हा शब्द सुद्धा ‘केन्दिरीय विद्ध्याले’ असा लिहितात. फॉण्ट तर कोणता शोधून काढलाय काय माहिती. आपल्या कडे महाराष्ट्रात राज ठाकरे ची हिंदी वर सूड उगवण्याची एक पद्धत तर ह्यांची ही अशी दुसरी पद्धत. गिंडी सर्कल च्या कोपर्यावर असलेल्या 'हाय-एनर्जी मटेरियल रिसर्च लॅबोरेटरी' चे हिंदी भाषांतर आणि त्या हिंदी अक्षरांचे 'तामिळी' लिखाण वाचण्याचे धाडस सुद्धा करवत नाही. आधीच हिंदी वाले 'हाय' च 'हाई' करतात. आणि हे द्रविड त्याची उरली सुरली आई-माई करतात.

एसटी स्टॅंड असो, रेल्वे स्टेशन किंवा एयरपोर्ट. प्रश्न कुठल्याही भाषेत विचारा. उत्तर तमिळ मधेच मिळणार. ह्या लोकांचा स्वत: बद्दल ( आणि आपल्या लोकांचा ह्यांच्या बद्दल ) एक गोड गैरसमज आहे. की इथ कॉनवेंट स्कूल अर्धवट सोडून तन्ग कपड्यात नाचणार्या गोरयापान शा सेक्सी श्रुति हसन पासून ते रस्त्यावर बोंडा विकणार्या रजनीकांत च्या काळ्या कूळकुळीत फॅन्स पर्यंत सगळ्यांना अस्खलित इंग्रजी बोलता येत. सॉरी ! आपल्या कडच्या घरकामाला येणार्या मवशिन्ना जेवढ आणि जस हिंदी बोलता येत तेवढच आणि तसच इंग्रजी इथल्या टॅक्सी वाल्यांना येत. त्यापेक्षा तसू भर ही कमीजास्त नाही.

लेफ्ट राईट, फास्ट स्लो, टुडे जॅम, शॉर्ट कट, अड्रेस, ह्याव्ही ट्रोफीक, आय व्हील टेक फश्ट लेफ्ट, थेन राईट्ट , थेन डेड एण्ड. इत्यादी जुजबी व्हॉक्याब्यूलरी असणार्या ला जर कुणी इंग्रजी येत अस म्हणणार असेल तर रामदास आठवलेंना एकविसाव्या शतकातले एक थोर महाकवी म्हणण्यात काहीच गैर नाही. टॅक्सी चालवताना एकवेळ स्टियरिंग व्हील नसल तरी हरकत नाही, पण रजनीकांत च्या चित्रपटातल गाण बॅकग्राउंडला वाजलच पाहिजे. रजनीकांत ह्यांचा राष्ट्रपुरूष आहे. आणि जयललिता राष्ट्रमाता. जयललिता आणि रजनीकांत ह्या दोघांमुळेच ‘भारत’ देश ह्या जगात टिकून आहे अस ह्यांच प्रांजळ मत आहे. त्याच गाण बंद कर म्हणल की मग यांचा राग अनावर होतो आणि मग हे लोक वाट्टेल तशी टॅक्सी चालवतात. त्यातल्या त्यात मध्यम मार्ग म्हणून मी 'जरा बारीक कर' अस सांगतो. तो दोन मिनिट गाण्याचा आवाज बारीक करतो. मग आरश्यातून आपल लक्ष नाही अस पाहून परत हळूच आवाज मोठा करतो. ह्या वेळी गाण्याचा आवाज पहिल्या पेक्षा किंचित मोठा असतो. आपण परत एकदा 'जरा बारीक कर' अस सांगितल की मग हा रागान टेप बंदच करून टाकतो. तो असा काही रुस्तो जासा काही हा माझा 'जावई'च. आवाज जरा बारीक कर हे इथ जेवढ सहज सोप वाटतय तीतक ते नाही. तुम्ही 'प्लीज़ रेड्युस दि वॉल्यूम' अस तर्खडकरी इंग्रजी पाजळून इथ नाही चालत. 'सौंड-लेस' किंवा 'वोलुम-ड्रॉप' अस चेन्नई मधल ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य आहे.

एवढा सगळा प्रपंच करून रजनीकांत च सुश्राव्य संगीत आइकून, टॅक्सी ड्रायवर कडून, ‘टॅक्सी ड्रायवर’ तो नसून, ‘टॅक्सी ड्रायवर’ आपण च आहोत आणि तो महिषासूर आपल्याला आपण हिंदी भाषिक कसे तुच्छ आहोत ह्याची साक्ष देण्यासाठी आलेला सरकार दरबारतला वकील आहे, अशी ट्रीटमेंट घेत जेंव्हा तुम्ही हॉटेल मधे जाता तेंव्हा नष्त्याला जळजळीत सांबार वाट पाहत असते. इथे राजस्थान सारखे उंट असते तर ते ही पधरा पन्ध्रा दिवसांच सांबार पोटातल्या पिशिवित घेऊन फिरले असते. इतक ह्या लोकांना सांबराच वेड. इथल्या सांबारात तुम्हाला नखशिखांत टॅन करण्याइतकी पूर्ण असिडिटी आहे. आम्ही महाराष्ट्रातल्या शाळेत सॅल्फ्यूरिक, हायड्रोक्लोरिक आणि नाइट्रिक ही तीन आम्ले शिकलो. मात्र इथे आल्यावर 'सांबारम' नावाचे अजुन एक तितकेच चौथे ज्वालाग्रही आम्ल असते हे समजायला फक्त दीड दोन बाऊल सांबार पुरे पडले. सांबार चम चमीत व्हावा म्हणून हे लोक उकळी फुटल्यावर तिच्यात ज्वालाग्रही पिवळा फोस्पोरस घालतात की काय अशी शंका यावी इतके जळजळीत.. इथल चेत्तीनादू (अपप्भ्रौन्श : चेटटीनाड ) जेवण जेवल्यावर तर पुण्यात परत आल्यावर मूळव्याधी ची ट्रीटमेंट करणार्या एखाद्या बी.ए.एम.एस डॉक्टर ला दाखवूनच घ्याव. उगाच पंतजली किंवा बालाजी ताम्बेंच्या नादी लागून दुखण अंगावर काढू नये. मात्र इडली आणि डोस्याचा तुम्हाला कंटाळा असेल तर इथला 'व्हीझा' कॅन्सल करतात आणि तुम्हाला पुण्याला परत डिपोर्ट करतात. तशी तरतूद घटने मधे करून ठेवलिय तत्कालीन उपपंतप्रधान कामराज यांनी. अगदीच झेपला नाही इडली सांबार चा मारा, तर मात्र परोट्टा नावाचा एक रब्बर कोटेड चपाति सदृश पदार्थ खायच धाडस हव. परिणामांची फिकीर न करता.

आजाद काश्मीर मागणारे आणि त्यासाठी एक पिढीच्या पिढी घालवणारे खर तर किती वेडे आहेत हे चेन्नई ला आल्यावारती समजत. चेन्नई कधीच स्वतंत्र झालाय हे इथ यायला लागल्या पासून कळल. किंबहुना तो पारतंत्रात कधी कुणाच्या असु शकतो हेच पटत नाही. जेवण, भाषा, विचार, आवडी निवडी सगळे कसे एखादा स्वतंत्र देश असावेत तसे. चेन्नई ला ड्युटी लागलेला इंग्रज कलेक्टर ही परत मायदेशी जाताना गो-या चा दोन शेड काळा होऊन परत गेला असेल आणि त्याच्या स्कॉटलॅंड च्या रिटायर्ड लाइफ मधे अगदी रोज नाही पण महिन्या भरातून एकदा तरी नक्की ओव्हन मधून बेक केलेली गरम गरम इडली खात असेल - सांबार नई तर नई, केचप बरोबर तर केचप बरोबर.

चारूदत्त रामतीर्थकर.
२२ मार्च २०१६
पुणे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<<<हे हिंदी वाच' म्हणून सांगितले तर तो हे इथल हिंदी वाचण्यापेक्षा मराठवाडा आणि विदर्भातल्या शेतकर्यांसारखी आत्म्हत्या करण जास्त पसंत करेल. >>>>

वाहं वाहं, चान्गल्या उपमा शोधल्यात.....

तुम्हाला रीअल चेन्नई अजून भेटलीच नाहिये!!!!

चेन्नईच्या खाद्यसंस्कृतीबद्दल लिहत असताना बिर्यानीचा उल्लेख नाही. कु फे हे पा!!!

तुम्हाला कोणत्या एका आयटीतील बहुचर्चीत कुंपणीने चेन्नईमध्ये पाठवून बळजबरीने गोबी मांचुरियन खायला घातलं का हो Proud

तुफान लेख !
यातल्या बरयाचश्या गोष्टी अनुभवल्या असल्यामुळे वाक्या वाक्याला हसत होतो.
कोथथु परोटटा ( याचे काय काय धम्माल उचचार आहेत हे ऐकुन हसत बसतो )
शुद्ध मैद्याचा तेलात तळुन कम परतून तव्यावर थोडा भाजुन झाल्यावर बुक्की मारुन चपटा करतात ! हुशश्य !
हा केरळी परोट्टा खायचा माझे अजुन तरी धाडस झाले नाही. इडिय्यप्प्म हा मात्र शेवयाचा लुसलुशीत प्रकार फार आवडला.
लेखात एकसे एक पंचेस टाकल्यामुळे हा ललित लेख अफलातुन झालाय ! सध्या आजाद हा परवलीचा शब्द वापरुन चेन्नाईशी संबंध जोडलाय हा तर कळसाध्याय ! चारुदत्त रॉक्स ! चीयर्स चारुदत्त ! लिखते रहो.

Biggrin भारी लिहिलंय. मात्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येचा उल्लेख काढून टाका कृपया.

छान Happy

चेन्नई खादाडी असा धागा नसल्यामुळे इथेच लिहितेय.
मुलाच्या अॅडमिशनसाठी दोन दिवस चेन्नईला गेलो.
चेन्ने सेंट्रल ला पेरियामेटमध्ये कुरिंची चांगले हॉटेल आहे असे रिक्षावाल्याने सांगितले. दुपारी तिथे गेलो. केळीच्या आडव्या पानावर व्हेज असा की नॉनव्हेज, तीन भाज्या (पालकाची भाजी, अवियल, आणि सुका बटाटा, ढोबळी मिरची मिक्स भाजी होती) मस्ट होत्या. सांबार फारसे जळजळीत नव्हते. सामिष आहारवाल्यांनी फिशकरी खाल्ली व ताजा फिश असल्याचा निर्वाळा दिला. शेवटी अधमुरे दह्याचे मस्त ताक होते. दोनशे रूपये प्रत्येकी झाले. पहिल्यांदा जो भात आला त्यात तिघांनी मिळून दिड प्लेट खाल्ला व परत दुसर्‍या दिवशी सकाळपर्यंत जेवलोच नाही इतका भरपुर झाला. चांगले जेवण होते. हा धागा वाचून गेल्याने पोळी प्रकार न मिळण्याची मनाची तयारी झालीच होती.

चेट्टीनाड जेवण खायचे राहिले ते पुढच्या वेळी.

मेट्रोच्या बांधकामामुळे चेन्ने सेंट्रल भाग अतिशय बकाल केला आहे. एअरपोर्टचा भाग चांगला आहे. मधल्या पेठासदृश तर अतिशय छोट्या आणि पुण्याची आठवण देणार्‍या आहेत.

kurinchi.jpg