धूळ

Submitted by जव्हेरगंज on 17 March, 2016 - 11:04

गाव तसं बरं वाटलं. हायवेलाच लागून होतं. गाव कसलं चार घरांची वस्तीच ती. डांबरीवरुन आत गेल्याशिवाय दिसली पण नसती. आडवळणाला एक देऊळपण होतं. तिथं चिटपाखरुपण नव्हतं. गावातल्या घराघरांत मिनमिनतं दिवं तेवढं दिसलं. बाकी सगळा अंधार.

वेळ संध्याकाळची. सुर्य बुडून गेलेला. कानोसा घेत घेत देवळाकडं गेलो. देऊळ दगडी होतं. भरभक्कम. काळा पाषाण. अंधारात न्हाय म्हणलं तरी ते भेसूरच दिसत होतं. बाजूनं मोकळं मैदान आणि त्यापलिकडं घनदाट झाडी. बाकी वाऱ्यानं उडवलेली नुसती धूळ.

गाभाऱ्यात एक पणती जळत होती. देव काय ओळखीचा नव्हता. हात जोडायची इच्छा कधीच मरुन गेलेली. आतल्या अज्ञात गुहेत जायचं काही धाडस झालं नाही.

घटकाभर एका पायरीवर बसून राहिलो. पोटात भूक जाणवत होती. शिध्याच्या नावाखाली मिळालेली कांदाभजी झोळीतून काढली. पहिला घास भूताचा म्हणून लांब झाडीत फेकून द्यायचा होता. पण तो मीच खाल्ला. सोबत आणलेला काळूबाईचा निवद ही पोटभर खाल्ला. पाण्याच्या शोधात देवळाम्हागं गेलो तर तिथे एक हौद होता. पोट तुडुंब भरोस्तोर पाणी पिलो. हातपाय धुऊन डोकंही भिजवलं. मग मोकळ्या मैदानात जाऊन जरावेळ गारठलो.

हिकडं तिकडं करुन पुन्हा पायरीवर येऊन बसलो. माचीस काढून वीडी शिलगावली. मग अंधारातल्या धुळीच्या वावटळी बराच वेळ बघत बसलो. डोळ्यावर झापड आली तसं कोपऱ्यातलं एक गोणपाट हाताला लागलं. मोकळ्या मैदानावर अंधरुन तसाच पडलो.

चंद्र झोपला होता आकाशात. चित्कार करत घुबडे देवळाच्या आत जात होती, तर काही आतून बाहेर येत होती. या चिरेबंदी वाड्यात येतात, गातात ही पाखरे. मधूनच एक कोल्हेकुई ऐकू आली अन झोप अनावर झाली.

सकाळी कसल्याशा आवाजानं जाग आली. चौकीदार बडबड करत होता. त्याची भाषा कळत नव्हती. पण तो तापला होता. मग लगबगीनं झोळी घेऊन बाहेर निघालो तर मध्येच अडवून काहीबाही बोलायला लागला.
" तुज्या बापाचं हाय कारं देवाळ?" मी चिडून बोललो. मग थोडा नरमला. त्याला किती कळलं काय माहीत पण बाजूला सरत पडत्या आवाजात तो अजून काहीबाही बोलतच राहिला.

मग मी काढता पाय घेत हायवेवर आलो. एखादा ट्रक थांबतोय का बघितलं. टपरीवर जाऊन एक वीडीपण शिलगावली. डोकं खाजवत मागं बघितलं तर चौकीदार अजूनही माझ्याकडंच बघत होता.

तेवढ्यात एक ट्रक येऊन थांबला. मी पळतच जाऊन पकडला. डायवरनं हात हलवत विचारलं, कुठं जायचयं?
मी वीस रुपये काढून त्याला दाखवलं. एवढ्यात जिथंवर जाता येईल तिथं सोड.

क्लिनरच्या शिटवर त्यानं मला बसवलं. दरवाचा लावून घेत असताना सहजच देवळाकडं लक्ष गेलं. पाठीमागच्या ओबडधोबड घरांतून बाहेर पडणारा धूरही दिसला. हे गाव काय मानवलं नाही. एक रातीतच सोडावं लागलं. डोकं खाजवत मी अजून एक वीडी शिलगावली अन पुढच्या मुक्कामाच्या दिशेनं आगेकूच केलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर ! अगदी डोळ्यासमोर आली अशी भटकंतीची रात्र. कोण्या जोग्याचं वर्णन केलं आहे हे ? असे भटके म्हणजे गावोगाव उडणारी धूळ असा काही विचार जाणवतो यात. अशी धूळ असते सगळीकडे पण एका जागी फार वेळ थांबत नाही. वारा नेईल तिकडे उडत राहते.

मस्त लिहिलेय जव्हेरगंज !

भन्नाट वातावरण निर्मिती. चपखल शब्द ! परिचछेद गुंतवुन ठेवतात !

लेखन आवडले.

जव्हेरगंज ... तुम्ही लगेच लक्षात येत नाहीत ओ ... प्रतिसाद वाचल्यावर भावना पोहोचल्या.. चित्रण आवडलं

मस्त Happy

"जव्हेरगंज ... तुम्ही लगेच लक्षात येत नाहीत ओ ... प्रतिसाद वाचल्यावर भावना पोहोचल्या.. चित्रण आवडलं" +११११ माझ पण अगदी सेम झाल..

कथा मी तटस्थपणे वाचून बघितली तेव्हा जाणवलं की पहिल्या झटक्यात काहीच कळत नाही. शेवटावर जरा विचार करा नक्कीच कळेल काय सांगायचं आहे.

धनि यांनी अगदी योग्य अर्थ लावला आहे.

सर्व प्रतिसादकांचा आभारी आहे.

पण नेमकं समजल नाही काय सुरुये +१>>>

कथाबीज अस्पष्ट असल्याने फोड करुन सांगितल्यावरही किती पोहोचेल माहीत नाही. तरीही सांगतो.

एक बेघर मनुष्य जो जगण्यासाठी गावागावात भटकत असतो, ज्याचं आयुष्य धुळीसारखं झालयं तो असाच एके दिवशी त्याच्या दृष्टीने बऱ्या अशा गावात येतो. पहिल्याच दिवशी तो तिथल्या देवळात मुक्काम करतो. सकाळी ऊठल्यावर मात्र त्याला चिडचीड करणारा चौकीदार भेटतो. तो मनुष्य देवळात झोपल्याचे चौकीदाराला खपलेले नसते. म्हणून मग तो मनुष्य तेथेच हार मानून गाव न मानवल्याचं दु:ख करत दुसऱ्या एखाद्या मुक्कामाच्या शोधात निघून जातो.

खूप धन्यवाद !

जव्हेरगंज फार भारी लिहीलंय. असं कमी शब्दांत, अस्पष्ट, पण भावना व्यक्त करणारं. बर्‍याच दिवसांनंतर असं मस्त ललीत वाचायला मिळालं. लिहीत रहा Happy

नेहमी प्रमाणेच गुंतवून ठेवणारे वर्णन.

सध्या खूप दिवसांनी माबो वर आल्या नंतर सर्वात आधी वाचायच्या राहून गेलेल्या तुमच्या सर्व कथा वाचल्या. मैथिली सोडता बाकी सगळ्याच आवडल्या. मैथिली नीट कळाली नाही म्हणून जास्त भावली नाही इतकेच.

धन्यवाद रोहिणी निला,

मैथिली आपली अशीच टाइमपास म्हणून लिहीली होती. ( बाकीच्याही तशाच लिहितो म्हणा Wink )
पण मुद्दामच हलकीफुलकी ठेवली होती. म्हणून असेल कदाचित.

सर्वांचा आभारी आहे !