मा . सुरेश भट यांना विनम्र अभिवादन !...

Submitted by बाळ पाटील on 14 March, 2016 - 09:01

मा . सुरेश भट यांना विनम्र अभिवादन !......

हा सूर- ईश त्याच्या मधु बासरीस होता
मृदगंध या धरेचा त्या वैखरीस होता

एल्गारही असा की कल्लोळ भावनांचा
भक्तीत भाव भोळा त्या पंढरीस होता

रंगात वेगळा तो, ढंगात वेगळा तो
हर एक रंग त्याच्या श्रावणसरीस होता

शब्दास तोलण्याची जादूच काय न्यारी
ठरवून शब्द येथे जणु चाकरीस होता

माझा प्रणाम येथे त्या अवलियास आहे
मी एक गारगोटी तो तर परीस होता

--- बाळ पाटील (उस्मानाबाद )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकच शब्द. व्वा!! Happy

हे वाचून माझी या विषयावरची ग़ज़ल पोस्ट करायचा मोह आवरत नाही म्हणून पोस्ट करत आहे. पण तुमची अत्यंत सुंदर आहे. Happy

अभिनंदन बाळ पाटिलजी!

रचनेमागील भावनिकता नक्कीच पोहोचते आहे!

पण एक (जिव्हाळ्याची) गझल म्हणून काही बदल सुचवावेसे वाटत आहेत...

१.मतल्यात...'सूर ईश्वरी त्याच्या'
२.तिसऱ्या शेरात...'हर रंग-ढंग त्याच्या श्रावणसरीस होता!'
३.चवथ्या शेरात...'हर एक शब्द त्याच्या तर चाकरीस होता!'
(कृ.गै.न.)

शेवटचा शेर खासच झाला आहे!

हे वाचून माझी या विषयावरची ग़ज़ल पोस्ट करायचा मोह आवरत नाही म्हणून पोस्ट करत आहे. पण तुमची अत्यंत सुंदर आहे. >>>>>
........... शरद्जी, आपली प्रतिक्रीया मोलाची , धन्यवाद !

विलासरावोजी , धन्यवाद !

रचनेमागील भावनिकता नक्कीच पोहोचते आहे!

पण एक (जिव्हाळ्याची) गझल म्हणून काही बदल सुचवावेसे वाटत आहेत...>>>>>

......... सत्यजीतजी, आपली भावना मी समजू शकतो.धन्यवाद ! एका दमात लिहीली गेली ती! आणि कोण जाणे पण आपण सुचवलेले बदल करायला मन धजावत नाही.कृपया मला समजून घ्याल..... बाळ पाटील

<< शब्दास तोलण्याची जादूच काय न्यारी
ठरवून शब्द येथे जणु चाकरीस होता >> सुरेश भटांच्या प्रतिभेचं सारच जणूं !

वाह! मस्त गझल!

शब्दास तोलण्याची जादूच काय न्यारी
ठरवून शब्द येथे जणु चाकरीस होता...> मस्त!