आत्म्यासोबत शरीर होते झगडत नुसते !

Submitted by सुप्रिया जाधव. on 9 March, 2016 - 11:32

दुनियादारी फाट्यावरती मारत जगते
माझ्याशीहीे देणे घेणे ठेवत नसते

वास्तवात आहेत तश्या स्वीकारत नाही
कल्पनेतल्या व्यक्तींना साकारत फसते

त्यानंतरही अगणितवेळा भेटलो जरी
पहिली-वहिली भेट कुणी का विसरत असते ?

जागोजागी सुरुंग पेरत मतभेदांचे
विस्फोटाच्या वाटेवरती धावत सुटते

नाविन्याच्या गावी जाणे टाळत आले
आठवणींच्या विश्वामध्ये भटकत थकते

झाल्यानंतर विभक्त त्यांची मैत्री जमली
आत्म्यासोबत शरीर होते झगडत नुसते !

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>वास्तवात आहेत तश्या स्वीकारत नाही
कल्पनेतल्या व्यक्तींना साकारत फसते>>>व्वा!

छान गझल!

नाविन्याच्या गावी जाणे टाळत आले
आठवणींच्या विश्वामध्ये भटकत थकते>>> अगदी

झाल्यानंतर विभक्त त्यांची मैत्री जमली
आत्म्यासोबत शरीर होते झगडत नुसते >>> जान ए गझल झाल्यात ओळी.