शेवंड्/लॉब्स्टर कढई

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 9 March, 2016 - 01:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

७-८ शेवंड मासे

२ चिरलेले कांदे
१-२ चिरलेले टोमॅटो
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
२ चमचे मसाला किंवा १ चमचा तिखट
अर्धा लिंबाचा रस
थोडी चिरलेली कोथिंबीर
चविनुसार मिठ
फोडणीसाठी तेल
दोन चमचे आल-लसुण पेस्ट
१ चमचा कसुरी मेथी

कढई मसाला
धणे, जिरे, ओवा प्रत्येकी १ चमचा
५-६ काळे मिरे
२ लाल सुक्या मिरच्या
२ वेलची

क्रमवार पाककृती: 

शेवंड साफ करण हे खुपच कटकटीच म्हणण्यापेक्षा आपल्याच हाताला काटे टोचण्याच काम असत. शेवंडीच्या डोक्याला काटे असतात. म्हणून शक्यतो कोळ्णींकडूनच शेवंडी साफ करून घ्याव्यात. काटे क्लियर दिसण्यासाठी हा फोटो. फोटोतल्या शेवंडी लहान आहेत. मी साफ केल्या त्या ह्याहून दिसाय ला डेंजर (राक्षसा सारख्या :हाहा:) आणि मोठ्या होत्या.

ह्यावेळी शेवंडी घरी भेट आल्या होत्या. काहीतरी वेगळे करावे म्हणून टिव्हीवर पाहीलेली झिंगा कढईचे रुपांतर आपण शेवंड कढाईत करू ह्या उत्साहात होते. पण अशी डिश केली म्हणजे मुलिंना खाताना सहज खाता आल पाहीजे ह्या हेतूने मी शेवंडी पुर्ण सोलायचा मनसुबा केला आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतात त्याप्रमाणे स्वतःच्या हाताला काटे टोचून घेतले. कारण हे पकडतानाच आधी त्याची लांब शेपटाची टोक आणि डोक्याचे काटे हाताला टोचत होते. शिवाय हा शेवंड प्रकार असा असतो की त्यात कवच जास्त आणि मांस फारच कमी असते. हिच्या डोक्यातही मांस असते ते डोक्याला चिकटून असते आणि मी ते काढण्याची धडपड करत होते आणि त्यात यशस्वी झाले. एक एक शेवंड सोलताना अजुन सोप्या प्रकारे कशी सोलता येईल हे स्वतःच स्वतःच शिकत गेले. पण किती तो वेळ. पुन्हा कधी असा सोलण्याचा उपद्व्याप करणार नाही असे सोलून झाल्यावर ठामपणे स्वतःला बजावले. पण मेहनतीचे फ़ळ मांसल निघाल. म्हणजे मुलांना आणि सगळ्यांनाच खाण्यास सुलभ झाल.

बर आता पुरे झाल हे स्वच्छता शेवंड अभियान. आता रेसिपी पाहू.

साफ केलेल्या शेवंडला आल-लसुण पेस्ट चोळून त्यातच हिंग, हळद, मसाला लावून थोडावेळ मुरवत ठेवले.

कढाई मसाल्याचे सगळे जिन्नस तव्यात थोडे गरम केले आणि थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घेतले.

कढईत तेल तापवून त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होई पर्यंत शिजवला. मग त्यावर टोमॅटो शिजवून घेतला.

आता ह्या मिश्रणावर मसाला लावलेले शेवंडीचे तुकडे टाकून परतून घेतले. थोडा वेळ शिजल्यावर त्यावर बारीक केलेला कढई मसाला घातला.

ह्यानंतर राहीलेल बाकी जिन्नस म्हणजे मिठ, कसुरी मेथी, लिंबूरस घालून परतवून शेवंड पुर्ण शिजू द्या. पाणि घालण्याची तशी गरज नसते. शेवंडीला पाणी सुटते. पण जर तुम्हाला पातळ ग्रेव्ही हवी असेल तर घालू शकता. शेवंड शिजली की त्यावर कोथिंबीर पेरा.

तयार आहे शेवंड कढाई.

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जणांसाठी
अधिक टिपा: 

ह्या रेसिपीतून काही शेवंडीबद्दल शिकायला मिळाले ते म्हणजे शेवंड कवचासकट्च करतात कारण मी सोलली पण शिजवल्यावर मांस सुटले. कोलंबीचे असे होत नाही. शिवाय साफ करताना होणारा त्रासही जास्त होतो.

मसाल्यातली वेलची मला खटकली. म्हणजे ह्या रेसिपीला मला तिचा वास नाही आवडला. इतर मसाले नो प्रॉब्लेम.

बाकी शेवंडीचे मास मात्र टेस्टी लागत होते.

लिंबूरसाने वईसपणा म्हणजे येणारा विशिष्ट वास जातो.

घाबरू नका माझ्या ह्या अशा कटकटीच्या वर्णनाच्या रेसिपी वरून. शेवंड सरळ बाजारातून साफ करून आणा.

माहितीचा स्रोत: 
टिव्ही वरील प्रोग्राम.
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेसिपी मस्तच.

शेवंडीचे काटे खुप वाईट असतात. टोचले तर जखम बरी व्हायला वेळ लागतो. जागू, परत एकदा बोटे बघून घे बरं तूझी.
शेवंड महागही असते ना खुप ?

नाही तेवढी काही जखमी वगरे नाही झाले. उलट त्यांचीच जास्त चिरफाड केली. Lol

शेवंड खुपच महाग असतात. ४-५ शेवंडी ५०० ला मिळतात. पण महाग असली तरी त्यात तसे काही मांस नसते भरपूर. मी स्वतःहून आणतच नाही शेवंड. आयती भेट आली तरच करते. Lol

आमच्याकडे सध्या भरपूर शेवंड येतात. ८-१०ची किंमत १००० रु. त्यात ३-४ मोठी असतात. त्यापेक्षा १००० रु ची कोळंबी मालाडच्या बाजारातुन आणली तर प्रचंड येईल.

मस्तच. लॉबस्टर एकदाच आणलेय घरी. पण साफ करुनच.

ह्यात खेकडे पण घात्लेत का? हळद मसाला चोळुन ठेवलेल्या फोटोत कायतरी खेकड्यासारखं दिसतंय Happy

सस्मित ते खेकडे नाहीत शेवंडींच डोक साफ केलय ते. डोक्याला चिकटूनच जास्त मांस असत.

हा प्रकार मी एकदाच खाल्लाय. मला ह्याचे मांस चवीला खेकड्यासारखे लागले. माझ्या मासेवालीने एक भलामोठा शेवंड २०० का ३०० रुपयांना दिलेला. खाल्ल्यावर भ्रमरासारखेच मत झाले. उगीच हाइप्ड केलीत शेवंडे. माझे मत कोलंबीलाच.

सस्मित, शेवंड उलटे करुन पाहिले ना तर वरची बाजु थेट खेकड्यासारखी असते आणि खालची बाजु कोलंबीसारखी. हा काहीतरी मिक्स झालेला प्राणि आहे, जो चवीवर थेट खेकड्यावर गेलाय.

आहाहा! तोंपासु.

जो चवीवर थेट खेकड्यावर गेलाय. >> हो का? बरे झाले आता झालेली जळजळ खेकडे खाऊन क्षमवते कारण एव्हढे महाग, १००-१५० रुपयाचा एक शेवंड माझ्याकडुन तरी घेणे होणार नाही. किंवा कोणी भेट देतय का ते बघावं लागेल Proud

हा प्रकार हॉटेलातच जास्त करुन हादड्लाय.
आयती डीश मिळाली समोर तर जास्त चांगली.

एवढे कष्ट उपसण्यापेक्षा मला टायगर प्रॉन्स आवडतात. माझ्या मासेवालीने एकदा फुकट लॉबस्टर (एकच ) दिला होता, तो ही साफ करुनच घेतला होता.

साष्टांग __________/\__________
एंड प्रोड्क्ट यम्मी दिसतय. Happy

wow !!.. तोंपासु..... मस्तचं जागू... आम्ही शेवंड घरी केली नाहीत परन्तु बाहेर खाल्लेली आहेत. खुप चविष्ट असतात.
आम्ही आता घरी करून बघतो.

माझे एक suggestion होते की आपण शेवंड किंवा चिम्बोरी साफ करताना hand gloves घातले तर त्रास कमी होईल.

तू ज्या (fish) माशांच्या रेसेपी सांगते ते मासे बहुतेक करून
माझ्या घरा शेजारील फिश मार्केट मधे मिळतात. (नवी मुंबई)
उदा. जिताडा, घोळ, बोईट आम्ही बोईस बोलतो. मोदकं, जिवंत निवट्या, कालेटं, भाकस,
चिवनी (आता नाही मिळत पावसाळ्याच्या सुरवातीला)
भाकस, तसेच चिम्बोरी तर बारा महीने मिळते (बाजूला खाड़ी आहे म्हणुन) ,
कोलिम, माखली, तिसर्‍या, खुबे, कालवं, करंदी, वडा, शिंगाळे, शिंगाळ्याची अंडी, घोये, हेकरू, तांब.
मोठया शिंगाळ्याची आणि घोळीची मुंडी पण छान होते.
उरण वरुन एक मासेवाले येते आमच्या येथे खरबी कोलंबि आणि माखल्या घेऊन येते. एकदम ताज्या.
कधी कधी तर जिवंत असतात. त्यामुळे खुपस लवकर मार्केट मधे जावे लागते कारण अर्ध्या तासात तीची सर्व मासळी संपून जाते.

वाम्ब (वाव) ची रेसेपी अजुन तू टाकली नाहीस का? खूपच छान रस्सा होतो त्याचा.

Thank you.... जागू...

तयार कडाई मस्त दिसते आहे.

कवच कठिण असतं का? इथे अमेरिकेत लॉबस्टरचं कवच फोडायची छोटी हत्यारं (?) मिळतात, रेस्टॉरंटमध्ये पण आख्खा लॉबस्टर ऑर्डर केला तर देतात. त्यात एक अडकित्त्यासारखा प्रकार असतो. त्या अडकित्त्यानं कवच फोडून मग बाकीचे प्रकार वापरून आतलं मीट (?) काढायचं अशी सर्कस बघितली आहे Wink

http://www.amazon.com/Wolf-Moon%C2%AE-Stainless-Individual-Condiment/dp/...

भारतातही मिळत असतील पण सीफुडशी तिथे संबंध फारसा आला नाही त्यामुळे कल्पना नाही.

बापरे नितीन, किती नावे पाठ आहेत तुम्हाला.नव्या मुंबईच्या कुठल्या मासळीमार्केटात जाता? बेलापूर दिवाळे गावात?

मस्त फोटो आणि रेसिपी , जागु आता हाटेल काढच.
शेवंड उर्फ लॉब्स्टर भरपुर खाल्लेत पण मजा नाही येत त्यात. जागुच्या रेसिपीने केले तरच मजा येईल.

सिंडरेला, ते अडकित्त्यानं मीट काढणं सोपं असतं. बरेच वेळा ते मधोमध एक कट मारून काम आणखीन सोपं करतात. ताजा लॉबस्टर छान लागतो.

ओ एम जी....... लॉब्स्टर चक्क भारतीय मसाल्यात.. वॉव.. तोंपासु... ट्राय करावं लागेल.
बाली त असताना मी ही हे उद्योग केलेत घरी........ पण फक्त रोस्टेड, भरपूर चीज चं फिलिंग भरून..
टू मच काम.. पण खाताना मस्तं वाटतं.. Happy

पण ते लॉब्स्टर दिसायला वेगळे होते.. पांढरट ,लालसर.. आणी साईझ ही बराच मोठा होता.

Pages