ट्राफिक पोलिस

Submitted by विद्या भुतकर on 8 March, 2016 - 22:54

रोज सकाळी सानूला सोडायला जाते तेव्हा शाळेजवळ एक पोलीस उभा असतो. त्याचं काम काय तर सकाळ- संध्याकाळी मुलांना सोडायला आणि घ्यायला येणाऱ्या गाड्यांना मार्गी लावणे. रस्त्यावरून जाणाऱ्या मुलांना लोकांना नीट रस्ता क्रॉस करायला मदत करणे. तिथे पोचले की तो कधी कधी थांबायला लावतो लोकांना किंवा गोल फिरून यायला लावतो आधीची गर्दी कमी करायला. कधी कधी वैताग येतो गोल फिरून यायचा. मधेच एखादा मुलगा रस्ता क्रॉस करताना दिसला की सगळ्या गाड्या एकदम थांबवतो दोन्ही हात जमतील तितके बाहेर काढून. तो मुलगा पलीकडे पोचला की मग एकेका गाडीला जायला सांगतो. मी जशी त्याच्या शेजारी येते, गाडीतूनच मान हलवून थोडसं हसते, तोही मस्त हसतो. मागून मुलांनी हात हलवला की जोरात हात हलवतो. सानूला सोडून मी माझ्या ऑफिसच्या रस्त्याला लागते.

रोजचा हा छोटासा किस्सा पण तरीही मनात राहतो. का? कारण म्हणजे सध्या इथे शुन्याहून कमी तापमान असते. कधी बर्फ तर कधी जोरात वारा तर कधी पाऊस पडत असतो. आम्हाला जिथे पाच मिनिटही बाहेर उभे राहता येणार नाही तिथे हा माणूस एका तासाहून जास्त वेळ काढतो. आणि कधीही हात हलवणाऱ्या मुलाला त्याने उत्तर दिले नाही असे होत नाही. त्याचा तो उत्साह अशा वातावरणात रोज टिकून राहतो हेही विशेषच. प्रत्येकालाच हे जमते असे नाही. नाही का? मला शिकले पाहिजे त्याच्याकडून. एक दिवस उतरून त्याला सांगायचे आहे, पण त्यासाठी त्याने मला उतरू दिले तर ना?
Happy

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

विद्या तुम्हाला उतरायला मिळेल की नाही हे माहीत नाही पण तुम्हाला त्या माणसाच्या कार्याची जाणीव झाली हे काही कमी नाही.

अरेच्चा, बर्फ वगैरे म्हणजे भारतातला किस्सा नाही हा.
तेच म्हटलं स्वप्न वगैरे होतं असा शेवट करताय काय !

<<<< एक दिवस उतरून त्याला सांगायचे आहे, पण त्यासाठी त्याने मला उतरू दिले तर ना? >>>>

विद्या छानच आहे हे ! ते लोक हे एक कर्तव्य म्हणुनच पार पाडत असतात, त्यात तुम्ही जर कौतुक केल तर का
कश्याच कौतुक असा प्रश्न त्यांना पडत असतो.

यु एस मध्ये पोलिसांना देशी, मुसलमान, हिंदु घरात शिरताना काय काळजी घ्यावी , कस वागाव,
त्या समाजाचे समज, प्रथा, चाली रिती वैगेरे काय काय असतात हे सर्व शिकवल जात, आणि मेन म्हणजे ते पाळलही जात !!

विद्या हो गं या पोलिसांचे काम रोज पाहिले आहे. मुलीला शाळेत सोडता आणताना चालत जायचे त्यामुळे तेव्हा रोज त्या ट्रॅफि़क पोलिसाला (महिला) थँक्यू म्हणून बरे वाटायचे.
आपल्या भारतातले पोलिस पण बिचारे उन्हातान्हात उभे असतातच. त्यांची पण दया येते.

तुम्ही छोटे छोटे पण छान लेख लिहिता.

कापोचे, आपले पोलीस पण उन्हातान्हात आणि पोल्युशनमधे अखंड काम करत असतात.