फुसके बार – ०४ मार्च २०१६ . महिषासुर व दुर्गा - दोन संस्कृतीतील फरक व संभाव्य संघर्ष

Submitted by Rajesh Kulkarni on 3 March, 2016 - 15:13

फुसके बार – ०४ मार्च २०१६
.

महिषासुर व दुर्गा - दोन संस्कृतीतील फरक व संभाव्य संघर्ष
.

जेएनयुमधील आंदोलनाच्या निमित्ताने महिषासुराचा मुद्दा पुढे आला. तेथील विद्यार्थी संघटनांनी महिषासुर पूजनाचा मुद्दा काढताना दुर्गेबद्दल काही अवमानकारक मजकूर लिहिला हे खचितच योग्य नव्हते.

मात्र आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की यावेळी महिषासुर येथे मुक्काम करायला आलेला आहे. यावेळी तो फारसा विस्मृतीत जायचा नाही. विस्मृतीत जाणार नाही एवढेच नव्हे, तर तो चक्क पुजनीय होऊन येईल.

आजवर ठळकपणे नाराजीचे उदाहरण दिसत असे ते बळीराजाचे. अगदी शाळेत असतानाही बळी हा खूप चांगला, दानशूर राजा होता अशी पहिली ओळ असे. मात्र त्यानंतर पुढचे सारे त्याच्याविरूद्ध कट रचणारेच होते याची जाणीव होत होती. नक्की काय ते कळत नसे, पण त्याच्यावर अन्याय झाला अशी भावना असे.

मग मोठे झाल्यावर याबाबत विचारले तेव्हा सांगितले गेले की बळी हा स्वत: वाईट नव्हता, पण वाईट लोकांच्या संगतीत होता, म्हणून त्याला शिक्षा दिली गेली. हे कोण वाईट लोक होते, वगैरे काही सांगायचे नाही. पण त्या भल्या माणसाला ‘शिक्षा’ देणारे हे कोण याबाबत कधी बोलले जात नाही. बरे, या वामनावताराने इतर काही चांगले केल्याचे दाखले दिले जात नाहीत. भल्या बळीचा नाश करण्यासाठी वामनाचा अवतार? आणि त्याला एकदम दशावतारांमध्ये स्थान? काहीच तर्क लागत नाही.

पूर्ण मानव अवतारांपैकी परशुरामाबद्दलही अनेक वाद आहेत. त्याने पृथ्वी अमुक अमुक वेळा नि:क्षत्रिय केली असे आजही काही जण अभिमानाने मिरवतात. त्याच्याबद्दल इतरही काही वादाच्या गोष्टी आहेत. परंतु मुद्दा पुन्हा तोच. आजच्या जगात या क्षत्रिय म्हणवल्या जाणा-या समाजातील लोक आहेत. पृथ्वी इतक्या वेळा नि:क्षत्रिय केली तर ते कसे तगले? मग म्हणायचे, त्याने फक्त दुष्ट क्षत्रियांना मारले. फक्त क्षत्रियांपैकीच काही जण दुष्ट होते का? इतर कोणी दुष्ट नव्हते का? तेव्हा या दशावतारातल्या परशुरामाबद्दल त्यांची काय भावना असेल? बरे, त्यातही सांगितले जाते की त्याने केवळ दुष्ट क्षत्रियांचेच निर्दालन केले. तसे असेल, तर मग त्याने दुष्टांचे निर्दालन केले असे का म्हणू नये?

थोडक्यात या दशावतारांची मांडणी आता नव्याने करण्याची आवश्यकता आहे.

दशावतारातील नरसिंहाबद्दल काही वावगे बोलले जाताना दिसत नाही, परंतु पुढे मागे हिरण्यकश्यपुही पुण्यात्मा होता असे कोणी म्हटले तर आश्चर्य वाटायला नको.

महिषासुराबद्दलची नवीन तथ्ये पुढे येत आहेत. बंगालमधील काही खेड्यांमध्ये नवरात्रीच्या काळात सुतकासारखे वातावरण असते, कारण तेथील लोक आजही महिषासुराला पुजतात. मग त्याला मारल्याचा सण ते कसा साजरा करणार?

हे झाले दूर बंगालमध्ये. अगदी आपल्या महाराष्ट्रातही म्हसोबाची मंदिरे कित्येक दशकांपासून पाहिली जातात. ती सहसा गावाच्या बाहेर असतात हाही ‘योगायोग’ मानायचा का? तेव्हा या देशामध्ये कधीकाळी म्हसोबाला पुजण्याची प्रथा होती हे दिसते. मग अचानक त्याला म्हणजे महिषासुराला दुष्ट कसे ठरवले गेले? कोणी ठरवले? बरे, असेही सांगितले जाते की त्याला मारणारी दुर्गा ही काही रूढार्थाने लढाऊ देवता नाही. मागे टीव्हीवरील चर्चेतही ऐकले होते की जेव्हा बांग्लादेशमुक्तीच्यावेळी वाजपेयींनी संसदेत इंदिरा गांधींचे कौतुक करताना त्यांना दुर्गा असे संबोधले, तेव्हाच डांगेंनी त्यांना म्हटले होते, की तुम्ही अशी चुकीची उपमा का देत आहात?

तेव्हा याबाबतीतील संघर्ष यापुढे वाढतच जाणार आहे.

कम्युनिस्ट लोक भलेही देवदेव करणे मानत नाहीत. पण अशा मुद्द्यांवरून ते रान माजवायला कमी करणार नाहीत. तिकडे तो कम्युनिस्ट कन्हैयाही डॉ. आंबेडकरांच्या नावाने संघटना स्थापणा-या 'दलित' रोहित वेमुलाला साथी रोहित म्हणून आपल्या कवेत घ्यायला पाहतो. तर दुसरीकडे माऔवाद्यांच्या रूपाने हिंसाचाराच्या शिकवणीला पाठिंबा देणारी ही कम्युनिस्ट विचारसरणी देशातील फुटीरतावादी चळवळींचे रूप घेतना दिसते; तर कधी दलितांचा कैवार घेताना दिसते.

त्यांचा कावा यशस्वी होऊ द्यायचा नसेल तर हिंदू समाजाला दुर्गा – महिषासूर प्रकरण स्वत:च निस्तरावे लागणार आहे. जोपर्यंत देवीच्या आरतीमध्ये ‘जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी’ असे ऐकू येईल, तोपर्यंत हे होणार नाही. याबाबतीत सामोपचाराची भूमिका घेत सुवर्णमध्य कसा काढला जाईल हे पहावे लागेल. कम्युनिस्टांचे जाउ दे, पण बहुजन समाजातली अशा बाबतीतली संवेदनशीलता यापुढे वाढतच जाणार आहे. त्यामुळे अशा मुद्द्यांना भविष्यात वारंवार सामोरे जावे लागणार आहे. त्यांना कसे सामोरे जायचे याची तयारी आधीच करायला हवी.

परंतु हिंदू समाजाची स्थिती अशी आहे की कोणी कोणाला विचारणारे नाही. धर्माचे प्रतिनिधी म्हणवणा-या शंकराचार्यांना समाजातील या बदलत्या वारे पोहोचले तरी असतील का नाही याबाबतीतही शंका आहे.

पुराणांमधल्या या कथांमध्ये कोणी कोणाला का मारले हे नेहमीच वादाचे असू शकते. एकतर या कथांना कसलेही पुरावे नसतात. अगदी अलीकडच्या सत्य घटनाही दोन पूर्णपणे विरूद्ध बाजूंनी लढवल्या जाताना आपण पाहतो. या सगळ्या तर पुराणातल्या गोष्टी. शिवाय धर्माशी संबंधित. म्हणजे ब-याच संवेदनशील. त्यामुळे याबाबतीत आपण जितके लवकर जागे होऊ तेवढे उत्तम.

अशा परस्परविरोधी मतांच्या धार्मिक प्रकरणांच्या बाबतीत कोणता मार्ग निघू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users