किनारा

Submitted by जयदीप. on 29 February, 2016 - 10:20

कधी गाठू शकू आपण किनारा
दिशा ठरवेल जर बेभान वारा

इथे चोरायला काहीच नाही
कशाला पाहिजे आहे पहारा

जवळ जाता प्रकाशाच्या समजले
मला वाटायचा लांबून तारा

किती काढून बसतो खेळणी मी
किती झाला मनामध्ये पसारा

जवळ आहोत आपण पोचलेलो
नकाशा राहुद्या, पत्ता विचारा!

दखल साधी कुणीही घेत नाही
किती आधी तुझा होता दरारा

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users