फुसके बार – २८ फेब्रुवारी २०१६ चित्रपटात अंधश्रद्धाविरोधी संदेश, आणखी एक जागतिक मराठी दिन, पंजाबी नागमंडल

Submitted by Rajesh Kulkarni on 27 February, 2016 - 13:06

फुसके बार – २८ फेब्रुवारी २०१६ चित्रपटात अंधश्रद्धाविरोधी संदेश, आणखी एक जागतिक मराठी दिन, पंजाबी नागमंडल
.

१) २६ फेब्रुवारीच्या लोकसत्तामध्ये ‘चित्रविचित्र नमुन्यांचे भन्नाट पुणे’ या श्रीरंग गोडबोले यांच्या लेखात अस्सल पुणेकरांचे म्हणावेत असे नमुने दाखवले आहेत. हा लेख पुणे आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्तच्या पुरवणीमध्ये आहे. लोकसत्तेच्या वेबसाईटवर त्याची लिंक दिसत नाही. पण अगदी अवर्जून वाचण्यासारखे हे नमुने आहेत.

२) भूतनाथ या सिनेमात अमिताभ बच्चन, जुही चावला व शाहरूख खान यांच्यामध्ये एक संवाद आहे. ते रहात असलेल्या घरात काहीतरी अमानवी घडत असते. यावर उपाय म्हणून एक महाशय त्यांना पितरांचे श्राद्ध घालण्यास सांगतात. कल्पना म्हणून भूत वगैरे गोष्टी सिनेमात दाखवायला हरकत नाही, पण त्याला जोडून मनोरंजनाच्या नावाखाली वाटेल त्या गोष्टी सहजपणे दाखवल्या जातात. तेव्हा जसे अलीकडे धुम्रपानाच्या किंवा दारू पिण्याच्या प्रसंगाच्यावेळी सिनेमामध्ये ते आरोग्याला घातक आहे अशी पट्टी दिसते, त्याच प्रकारे अशा प्रसंगांच्यावेळी ‘हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे, त्यामुळे आपली विचारशक्ती नाहीशी होण्याचा धोका आहे. हे खरे नसते किंवा याची गरज नसते’ असा किंवा तत्सम संदेश यायला हवा.

नुकतेच एका जाहिरातीमध्ये मुलाने तक्रार न करता दूध प्यावे यासाठी मी तर देवाला नवस बोलायलाही तयार आहे असे मूर्खासारखे विधानही सर्रास दाखवले जात आहे. अशा जाहिरातींनाही हा नियम लागू व्हावा.

टीव्हीवरील अनेक मालिकांमध्येही संस्कृतीच्या नावाखाली असे प्रकार दाखवले जातात. अशा प्रकारांविरूद्ध जागृती करण्यासाठी हा उपाय प्रभावी ठरावा.

३) आणखी एक जागतिक मराठी दिन – आला न गेला

जागतिक मराठीदिनाच्या शुभेच्छा द्यायच्या म्हणजे नक्की काय करायचे हे माहित नसल्यामुळे तसे करत नाही.

मराठीच्या नावाने काही तरी करायचे, म्हणून एक दिवस निवडलेला आहे, एवढेच माझ्यासाठी या दिवसाचे महत्त्व आहे. किंवा खरे म्हणजे महत्त्व नाहीच.

गेल्या दशकापासून इंग्रजी भाषेचे महत्त्व इतके अवास्तवपणे वाढले आहे की मराठी हा केवळ एक जोडविषय राहिलेला आहे हे वास्तव आहे. अगदी ठरवून मुलांना मराठी माध्यमाच्याच शाळेत घालण्याचे प्रमाण अगदी नगण्य राहिलेले आहे. यापुढे ते आणखी कमी होत जाणार आहे. हे वास्तव आहे. तेव्हा मराठीबद्दलची कळकळ व अभिमान हा केवळ ती अजूनही बोलीभाषा आहे एवढ्यापुरता संकुचित असणार असला तर हरकत नाही.

मराठी माध्यमात शिकतानाही इंग्रजीचा भाषा म्हणून अभ्यास करणे, व इच्छा असल्यास अभ्यासक्रमाव्यतिरिक्तही त्यात प्राविण्य मिळवणे अगदी शक्य आहे. मागच्या पिढीत हेच स्वेच्छेने होत आलेले आहे. आताच्या जागतिकीकरणामुळे या परिस्थितीत बदल झालेला आहे असा कोणाचा दावा आहे का? दुसरीकडे इंग्रजी माध्यमातून शिकताना भाषा म्हणून मुलांना इंग्रजीवर हवे तेवढे प्रभुत्व मिळालेले दिसते का? एकीकडे तेही होत नाही आणि दुसरीकडे त्यांची मराठी भाषेशी असलेली उरलीसुरली नाळही तुटते. शिवाय बहुतेकांच्या घरात इंग्रजीला पोषक वातावरण नसल्यामुळे या मुलांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी होते. ही स्थिती थोड्याफार प्रमाणात शहरी, निमशहरी, ग्रामीण भागात सर्वत्र सारखीच आहे.

सध्या मी वर म्हणले तसे, ठरवून आपल्या मुलांना मराठी माध्यमांमधून शिकवणा-यांशिवाय ज्यांचा केवळ नाईलाज आहे म्हणून तेथे शिकणारेच आज उरलेले आहेत व तेच मराठीचा ध्वज उद्या खांद्यावर वाहणार आहेत. व आपल्या व मराठीच्या नशिबात असेल तर तेच मराठी वर्तमानपत्रे, ललित, कादंब-या, पुस्तके वाचणार आहेत. मराठी संस्कृतीची खरी जोपासना तेच करणार आहेत.

मराठीचे भवितव्य हे असे असताना जागतिक दिन असो, साहित्य संमलने असोत, यादृष्टीने काहीही भरीव होताना दिसत नाही. भाषेसाठी हा एवढा मोठा दिवस आहे तर तिच्या संवर्धनासाठी काही शाश्वतपणे प्रभावी राहणारे उपक्रम होताना दिसत नाहीत. केवळ दिखाऊपणाच दिसतो.

समाजशास्त्राचे अभ्यासक मराठीचा भाषा म्हणून विकास पूर्णपणे थांबण्यास किती वर्षे देतात? आजापसून वीस वर्षांनी जे मराठीतील नवोदीत लेखक असतील, ते कोणत्या वर्गासाठी लिहितील असा त्यांचा कयास आहे. गद्याची अशी वाईट अवस्था अपेक्षित असेल, तर कवितेचे काय हाल होतील असे वाटते? मराठी अमर आहे वगैरे वल्गना नकोत.

४) नागमंडल - विनोद दोशी स्मृति नाट्यमहोत्सव

या नाट्यमहोत्सवात नागमंडल या गिरिश कार्नाडलिखित नाटकाचा प्रयोग पंजाबीमध्ये प्रख्यात नाट्यदिग्दर्शक मानसी मानसिग यांनी सादर केला. त्यांच्या नाटकातील कलाकार अगदी ठरवून शहर व ग्रामीण भागातून घेण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो.

सहसा पंजाबी भाषेचे ज्ञान हे हिंदी सिनेमामध्ये एखाद-दुसरे पंजाबीतले वाक्य वापरले जाते त्यापुरतेच मर्यादित असते. मात्र पूर्ण नाटकच पंजाबीत असल्यामुळे भाषेचा प्रश्न आलाच आला. येथे सारेच समोरासमोर होत असल्यामुळे सिनेमासारखी सबटायटल्सची ऐष नसते. नाटकाचे कथानक आधीच माहित असल्यामुळे समोर काय चालले आहे याचा अंदाज येत होता, तरीही संवाद समजणे अवघड जात होते.

नाटकात राणी नावाच्या मुख्य पात्राची भूमिका अगदी कल्पकरित्या दिग्दर्शकाने दोन पात्रांमध्ये विभागली होती. हे सुरूवातीला नाही तरी नंतर लक्षात आले. हे दिग्दर्शकाने घेतलेले स्वातंत्र्य. सादरीकरण भन्नाट होते.

हे सगळे कलाकार तिकडे चालू असलेल्या जाट आंदोलनामुळे पुण्यात पोहोचू शकतील की नाही याबाबत साशंकता होती. चंदीगड-दिल्ली हा एरवीचा सहा तासाचा प्रवास बारा तासात करून ते दिल्लीला पोहोचले, तर तेथून पुण्याला येणारी ट्रेन रद्द झालेली. अखेर ऐनवेळी हे दहा-बारा कलाकार त्यांच्या भरपूर सामानासह विमानाने पुण्यात पोहोचले. ठरलेला प्रयोग अशा नाटकबाह्य कारणांमुळे रद्द होऊ नये म्हणून नीरजा यांची कळकळ खरोखर वाखाणण्यासारखी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्रजी माध्यमाची मुले सुदैवी आहेत. हे असले फुसके बार त्यांना मराठी वाचता न आल्याने त्यांची मनोप्रदूषणातून सुटका होते