क्रिकेट शौकीन ग्राहकाचा ग्राहक न्यायालयातील षटकार !

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 27 February, 2016 - 09:43

कसोटी सामन्यात फलंदाजाने एखादा टोलेजंग षटकार लगावल्यावर प्रेक्षक उत्स्फुर्तपणे टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करतात. पण एखादा क्रिकेट शौकीन चक्क ग्राहक न्यायालयात जाऊन षटकार ठोकतो त्यावेळी आपण सर्व ग्राहकांनीही त्याचं असंच भरघोस कौतुक करायला हवं.

त्याचं असं झालं, दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर ३१ जानेवारी २००२ रोजी भारत वि. ऑस्ट्रेलिया असा एक दिवसाचा क्रिकेट सामना होणार होता. हरसिमरनसिंग संधू हा क्रिकेटचा जबरदस्त शौकीन! त्यामुळे त्याने लांबच लांब रांगेत उभं राहून प्रत्येकी दोन हजार रुपयांची चार तिकिटे स्वतः व आपले तीन मित्र यांच्यासाठी खरेदी केली. सामन्याच्या दिवशी प्रवेशद्वारावर प्रेक्षकांची झुंबड उडाली होती. परंतु स्टेडियम पूर्ण भरले आहे या कारणाने संधू व त्याच्या मित्रांना प्रवेश नाकारला गेला. प्रथम आर्जव आणि मग हुज्जत घालूनही दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या मंडळीनी संधू व त्याच्या मित्रांना आत घेतले नाही. सहाजिकच संतप्त संधूने त्यानंतर दिल्ली क्रिकेट असोसिएशनकडे तिकिटाचे पैसे व आपल्या आवडत्या सामन्याला मुकलो म्हणून नुकसानभरपाई यांची मागणी केली. ती असोसिएशनने नाकारल्यामुळे त्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे ग्राहक संरक्षण कायद्याखाली तक्रार दाखल केली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून मंचाने संधू यांची तक्रार ग्राह्य धरली. असोसिएशनने संधू यांना तिकिटाचे रु.८०००/- नऊ टक्के व्याजासह परत द्यावेत तसेच या प्रकरणी झालेल्या मानसिक क्लेशांची भरपाई म्हणून रु.४०,०००/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.१०००/- द्यावेत, असा आदेश जिल्हा मंचाने दिला. पण पैशांच्या बळावर आपण एकट्यादुकट्या ग्राहकाला जेरीस आणू शकतो, या मस्तीत असलेल्या असोसिएशनने या निर्णयाविरुद्ध दिल्ली राज्य आयोगाकडे अपील केले. आयोगाने ते फेटाळले.

एव्हडे होऊनही शहाणपण न आल्याने असोसिएशनने राष्ट्रीय आयोगापुढे सुधारणा अर्ज दाखल केला. हा सुधारणा अर्ज फेटाळताना आयोगाने असोसिएशनच्या वतीने केलेल्या बचावावर ताशेरे ओढले. "तक्रारदारांना सामना बघण्यात खरोखर स्वारस्य असतं तर त्यांनी साडेनऊपूर्वी यावयास हवे होते. ते त्यांच्या सोयीप्रमाणे केव्हाही येऊ शकत नाहीत." हा युक्तिवाद निव्वळ चीड आणणारा आहे असा शेरा मारून, आयोगाने पुढे असेही म्हटले की "खरं तर या प्रकरणात असोसिएशनने माफी मागून तक्रारदार संधू यांचे तिकिटाचे पैसे परत करणे व प्रकरण मिटवणे अपेक्षित होते. परंतु तसे न करता अर्जामागून अर्ज करण्यात असोसिएशनने धन्यता मानलेली दिसते. महागडी तिकिटे काढूनही क्रिकेटचा सामना बघण्यापासून वंचित झाल्यामुळे पदरी पडलेली घोर निराशा व दुःख हे त्यांना दिलेल्या नुकसानभरपाईपेक्षा जास्त असेल." जिल्हा मंच व राज्य आयोग यांच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करीत राष्ट्रीय आयोगाने एक प्रकारे, ग्राहक म्हणून आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध सनदशीरपणे लढून संधूने दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या गोलंदाजीवर षटकार लगावल्याचे घोषित केले आहे.
वाह संधू, तोहरा तो जबाब नही!

संदर्भ : दिल्ली क्रिकेट असोसिएशन विरुद्ध हरसिमरनसिंग संधू आणि अन्य
सुधार अर्ज २५०२/२००३ निकालाची तारीख २७ ऑगस्ट २००३
पूर्वप्रसिद्धी - ग्राहकनामा - लेखक - अॅड. शिरीष देशपांडे

सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असा सामना किंवा एखादा सिनेमा यांच्याबाबतीत एक शंका नेहमी वाटते. त्यांना प्रवेश दिलाच नाही याचा काय पुरवाा म्हणून विचारले तर काय सांगता येते?

Rajesh Kulkarni जी,
जर प्रवेश दिला गेला असेल तर त्याचाही पुरावा द्यावा लागेल ना. तिकीटाची अर्धी बाजू किंवा तिकिटाची अशी प्रवेशाकरीता राखुन ठेवलेली बाजू अशा विवादात सादर करावी लागते ना. जर तिकिटाचे दोन्ही भाग असा सामना किंवा चित्रपटाचा खेळ झाल्यानंतर ग्राहकाकडेच असतील तर ग्राहकाला प्रवेश दिला गेला आहे असे कसे समजावे?

समजा तो ग्राहक स्टेडिय मवर आलाच नाही आणि घरीच झोपून राहिला म्हनजे तिकिटाचे दोन्ही भाग त्याच्याकडेच राहणार . मग त्याने प्रवेशासाठी प्रयत्न केला होता हे कसे सिद्ध करायचे ?

मुंबई ग्राहक पंचायत, धन्यवाद.
माझे म्हणणे इतकेच होते की कोणी ग्राहकही खोडसाळपणा करायचाच झाला तर असे करू शकतो. तुम्ही केवळ काउंटरफॉइल आपल्याकडे राहणे जे म्हणालात ते मी समजू शकतो. अन्यथा मग आणखी पुरावा म्हणून काही ऑडियो/व्हडियो रेकॉर्डिंगची गरज पडेल.