गोष्ट अध्यात्माची

Submitted by pkarandikar50 on 26 February, 2016 - 07:48

गोष्ट अध्यात्माची

"भौतिक आणि अध्यात्मिक,
मानवी आणि ईश्वरीय,
यांच्यातल्या सीमारेषा तशा पुसटच.
एकाचा शेवट कुठे होतो,
दुसर्‍याची कुठे होते सुरुवात?
कसे एकमेकात घट्ट गुंतलेले वाटतात.
काही सांगता येइल का हो, महाराज?"
धाडस करून मी विचारलेच बुवांना.

एका छद्मी कटाक्षानेच, बुवांनी
माझ्या प्रश्नाची वासलात लावली.
"अजून बरेच टप्पे करायचे आहेत पार"
म्हणाले, "एव्हढ्यात कसं समजणार?"

माझं मनच उडालं प्रवचनातून.
मधूनच उठलो, चालायला लागलो.
अचानक रिकामा निघालेला वेळ
कुठे घालवावा, विचारात पडलो.
वाटेत एका डॉक्टर मित्राचा दवाखाना लागला.
शिरलो झालं, आत.
"काय? आज इकडे कुठे चुकली वाट?"
मित्राचा खंवचटपणा.
"गेलो होतो अमुक-तमुक बुवांच्या प्रवचनाला,
मधेच कंटाळलो, सोडून निघालो.
वाटेत तुझा दवाखाना दिसला, डोकवावं म्हटलं.
कामात व्यत्यय तर नाही ना,
आणला, तुझ्या?" मी उत्तरलो.

"छे छे.बरं केलंस.
अरे, कसला बोगस तुझा तो बुवा?
परवाच व्हिजिटला जाऊन आलो ना मठात."
तो ठासून म्हणाला.
"बुवांना काय झाले बुवा अचानकपणे?
प्रवचनाला तरी नव्हता खाडा, सप्ताहात?"
माझा अचंबा.
"त्या बुवाला काय भरलीय धाड?
सेवेकरी शिष्येला दिलान महाप्रसाद,
तीचे पोट पाडायचे किती घ्याल,
विचारत होता तुझा पारमार्थिक बुवा."
मित्राने स्वच्छच सांगून टाकले.

दवाखान्यातूनहि उठलो, तिरीमिरीत,
चालायला लागलो, समजावत स्वत:लाच.
"काय विपरीत घडलं होतं असं,
की मी वैतागावं?
जगरहाटीत घडतातच ना असले प्रकार?
भौतिकाचे आणि अध्यात्माचे
असेच पडतात ना विळखे एकमेकांना?"

-बापू.

http://www.maayboli.com/hitguj/messages/119403/113300.html?1153796361

Group content visibility: 
Public - accessible to all site users