बेस्ट उपमा कसा जमवावा

Submitted by सायो on 22 February, 2016 - 08:32
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ वाटी भाजलेला बारीक रवा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेले आल्याचे तुकडे,कढिपत्ता, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, सुकी लाल मिरची एखाददोन, तूप- बर्‍यापैकी सढळ हाताने, कोथिंबीर, ओलं खोबरं, फोडणीचं साहित्य- तेल, मोहरी, हिंग, रव्याच्या दुप्पट उकळीचं पाणी. लिंबाची फोड हवी असल्यास, बारीक शेवही आवडत असल्यास.
ऑप्शनल जिन्नस- भिजवलेली चणा डाळ, बारीक चिरलेला कोबी.

क्रमवार पाककृती: 

बारीक गॅसवर रवा छान भाजून घ्यावा. अगदी लालसर रंग नसला तरी चालेल. भाजताना त्यात चमचाभर तूप घालावं. एकीकडे रव्याच्या दुपटीपेक्षा किंचित जास्त पाणी उकळत ठेवावं. (१ वाटी रव्याला सव्वा दोन वाट्या)
चिरलेल्या कांद्याचं प्रमाण टोमॅटोच्या तुलनेत कमी असावं. बाकीचे जिन्नसही बारीक चिरून घ्यावेत. तेलाची मोहरी, हिंग घालून फोडणी करून घ्यावी. त्यात चणा डाळ घ्यायची असल्यास पाणी काढून परतून घ्यावी. त्यातच हि. मिरच्या, लाल मिरच्या, कढिपत्ता घालावा. त्यात आलं, कांदा, टोमॅटो घालून परतून एक वाफ काढावी. मग त्यात उकळीचं पाणी मोजून घालून पुन्हा एक उकळी काढावी. मग त्यातच मीठ घालून रवा वरून पेरत घालावा. पुन्हा झाकण घालून गॅस बारीक करून वाफ काढावी. हे सगळं मिश्रण ओलं असतानाच वरून सढळ हाताने तूप, ओलं खोबरं, कोथिंबीर घालावी. मस्त मऊसूत उपमा तयार.

वाढणी/प्रमाण: 
१ वाटी रव्याचा दोन मोठ्यांना दोनदा पुरतो.
अधिक टिपा: 

टिपा काहीच नाहीत. दिसायला साधा प्रकार वाटत असला तरी मनासारखा जमतोच असं नाही म्हणून इथे रेसिपी द्याविशी वाटली.

माहितीचा स्रोत: 
माहित नाही.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी उपम्यात फ्लॉवर बटाटा गाजर कांदा टोमॅटो मटार अशा सर्व भाज्या किंवा घरात असतील त्या घालत असते. कोबी नाही घातला कधी. बाकी दाणे/ काजू/उडिद दाळ पण घालते.
पुढच्या वेळेस तुझ्या रेस्पीने करून पाहीन सायो..

सायो, या रेसीपीनी आताच उपमा केला. खाताखाताच लिहितेय कारण अप्रतिम झाला आहे. फक्त मी रवा कच्चाच वापरला. मस्त लागतेय चव.

मी या बीबीवर अगोदर लिहिलंय का, आठवत नाही.
सध्या घरच्या ज्येनांना आवडणारा मऊसूत, लुसलुशीत व अडगळ विरहित उपमा (किंवा त्याला तिखटा-मिठाचा रवा म्हणूया हवंतर!) मी असा करते -

किंचित जास्त तेलाची फोडणी करून (किंवा तेल + तूप समप्रमाणात फोडणीसाठी घेऊन) त्यात जिरे, ते तडतडले की हिंग, तिखट (अथवा सुकी लाल मिरची), चमचाभर उडीद डाळ व कढीपत्ता घालून परतते. आल्याचे २-३ छोटे तुकडे घालते. भाजलेला रवा फोडणीत घालून मंद आंचेवर मस्त परतून घेते. त्यातच अनेकदा किसलेले सुके खोबरे घालून परतते. मग जवळपास चौपट पाचपट गरम पाणी घालून रवा चांगला शिजू देते. मिश्रण दाटसर होऊ लागले की चवीनुसार (किंचित सढळ हाताने) मीठ व साखर घालते. आता हे मिश्रण खिरीसारखे दिसू लागते. त्याला धीराने मधूनमधून ढवळायचे. नंतर चमचाभर साजूक तूप वरून घालायचे व झाकण ठेवून एक वाफ आणायची. झाकण काढल्यावर उपमा घट्ट झालेला दिसेल. लगेच उपमा सर्व्ह करायचा. काहीवेळा आंबटसर चव हवी असेल तर मी रव्यात पाणी + थोडे आंबट ताक असे मिश्रण घालते, किंवा मग पाण्यात लिंबू पिळते.
हा उपमा अगदी लहान मुलांपासून ते बोळकं झालेल्या आजीआजोबांपर्यंत कोणालाही विनासायास खाता येतो. मिरची, कढीपत्ता सहज काढून टाकता येतो.

मला करताना तसं करवत नाही समहाऊ. >>> बाहेर हाटेलवाले रवा भाजून बिजून घेण्याच्या भानगडीत थोडीच पडतात? कच्च्याचाही (किंवा जास्तच) मस्त होतो. एकदा खास करून बघ.

मामी, हे मस्त सांगितलंस, न भाजता रवा घालण्याचं. रवा भाजणे कंटाळवाणं काम वाटते. आता नक्की करून पहाते.

रवा भाजून ठेवला की त्याला जाळी पडत नाही म्हणे! त्यामुळे घरी आणल्यावर रवा भाजायचे पुण्यकर्म केले जाते.

आम्ही ऊपमा खालील प्रकारे करतो..

भरपुर कांदा बारीक चिरलेला, ८-१० मिरच्या, कढीपत्ता, जिरे, तुप, तेल आणी रवा

एका भांड्यात पाणी तापवत ठेवायचे, तर दुसर्या शेगडी/गॅस वर कढईत थोडे तुप आणी तेल तापवायचे त्यात प्रथम मिरच्या घालुन परतवायच्या, मग कांदा व जिरे घालुन परतायचे. कांदा थोडा लालसर झाला की त्यात रवा घालुन व्यवस्थीत भाजुन घ्यायचा, नंतर त्यात मिठ आणी कोथींबीर घालुन ते एकजीव करुन घ्यावे.
सर्व निट हलवुन मग कढईत गरजेनुसार ऊकळलेले पाणी सोडावे आणी थोडे-थोडे तुप पण टाकावे नंतर मंद आचेवर झाकुन ठेवुन थोड्या वेळाने रवा ऊलटवुन गॅस बंद करा

मस्त मोकळा आणी मऊ ऊपमा तयार.

.

८-१० मिरच्या,>>>>>>>> बापरे! खुप तिखटजाळ नाही का होत. साधारण किती रव्यासाठी घेता इतक्या मिरच्या?

८-१० मिरच्या म्हणजे झणझणीतच उपमा होत असेल. Happy एवढ्या मिरच्या मी उपम्याच्या कढईला जरी दाखवल्या तरी घरच्यांना तिखटाचे ठसके लागतील. एक मिरचीही खूऽप होते (म्हणे!). मी सरळ लाल तिखटाचा पर्याय निवडते. तेवढीच अडगळद्वेष्ट्यांना प्लेटमध्ये अडगळ कमी!

मी माझ्याकडच्या मोठ्या वाटीभर रव्यासाठी, साधारण पाव किलो भरत असेल, दोनच हि मिरच्या घेते. त्याही कधी मोठ्या असतील तर दीडच. मी तिखट वाल्या हि मि आणते. लवंगी.

८-१० तिखट मिरच्या, वाटीभर रव्याला म्हणजे उपमा-चटणी होईल की!

उपमा सौम्य चवीचाच मस्त लागतो. त्यात कुरकुरीत चणा डाळ, उडीद डाळ, मधूनच तिखटाकरता लाल सुकी मिरची बहार आणते. वर बारीक चिरलेली कोथिंबीर, खोबरं, शेव ही आवडतं.

वर अकुनी म्हणलंय तसल्या उपम्याला सौदिडिंअन चटणी सांबार असेल तर भारी! Happy

८-१० तिखट मिरच्या, वाटीभर रव्याला म्हणजे उपमा-चटणी होईल की!>> अरे पण त्यांनी लिहिलंय ना की ८-१० मिरच्या त्या अर्धा किलो रव्यासाठी घेतात.

मलाही रवा न भाजताही उपमा छान होतो हल्लिच समजले. आणि घरी आवडतो.
मी तेलात थोडी मोहरी, थोडे जीरे, हिंग, लाल सुक्या मिरच्या, उडीद डाळ आणि भरपूर कढीपत्ता घालते. त्यात रव्याच्या ४-५ पट पाणी घालते. मीठ, साखर घालते. चांगलं उकळलं की हळूहळू रवा घालते. थोडा पळीवाढा असतानाच गॅस बंद करून झाकण ठेवते. गरम गरम मऊ उपमा वाढते. एकदम बाहेरच्यासारखा होतो. Happy

~साक्षी

योकु, लिंबाची चंद्रकोर जाणून बुजून विसरलास? कु फे हे पा? Lol
नुकतेच काही लोकांकडून कळाले की त्यांना पोहे-उपम्यासोबत लिंबाची फोड देतात ते अजिबात आवडत नाही, का तर म्हणे लिंबू पिळताना बोटे चिकट होतात. (पण मग बोटाला लागलेले लिंबाचे आंबट चवीचे तंतुकण तोंडाने मटाक्क आवाज करत लुप्त करण्यातली मजा कळणार कशी?) Wink

मी केला आणि छानही झाला. इथे जाळी पडली नाही सहसा म्हणुन चालुन गेले आजवर. पण टोमॅटो घातलेला आवडत नाही. चव बिघडते. म्हणुन आतापासुन नाही घालणार.

वाह...मस्तच...मीही जवळपास असाच करते... टोमॅटो चना डाळ ताक कोबी गाजर घालत नाही..फोडणीत उडीद डाळ घालते...रवा तुपावर मंदसा परतते.. साखर आणि आलं मस्ट... कोथिंबीर आणि खोबरं, लिंबू मस्ट... कधी कधी हिरवी कॅप्सीकम पण घालते.. बटाटा अगदी लहर आली तर...

Pages