फुसके बार – १९ फेब्रुवारी २०१६ रविशकुमार महात्म्य, धन्य हरीश व नेहमीचे बघे, खैय्याम यांची समाजऋणाची परतफेड

Submitted by Rajesh Kulkarni on 18 February, 2016 - 15:01

फुसके बार – १९ फेब्रुवारी २०१६ रविशकुमार महात्म्य, धन्य हरीश व नेहमीचे बघे, खैय्याम यांची समाजऋणाची परतफेड
.

१) रविशकुमारसारखे खोडसाळ पत्रकार आणि आपले दुर्दैव

एनडीटीव्ही – हिन्दीचा मुख्य अँकर रविशकुमार याचा अलीकडे अनेकांना पुळका आलेला दिसतो. युट्युबवरील त्याचा एक प्रातिनिधिक व्हिडियो खाली दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=lnfRMfk4Eac

अलीकडे सियाचेनमध्ये मृत्युमुखी पडलेले जवान आणि ‘वन रॅंक, वन पेंशन’ वरून केलेल्या आंदोलन व त्यावरून आताच्या सरकारला सैनिकांच्या प्रश्नाबद्दल खरोखर वाटणारी काळजी यांचा संबंध लावणे म्हणजे तर अकलेची दिवाळखोरी आहे.

तीच गोष्ट पीडीपीबरोबरच्या काश्मिरमधल्या युतीची. काश्मीरमधली राजकीय कम्पल्शन्स, मग ती कॉंग्रेस वा भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांची असोत, त्याचे विश्लेषण करण्याची या रवीशकुमारची योग्यता नाही व त्यावरून जादवपूर विद्यापीठातली अफजल गुरूचे समर्थन करणा-या घोषणा देणा-या मुलीच्या या प्रतिवादावरून येथे आताच्या सरकारला झोडपण्याचीच त्याची वृत्ती येथे दिसते. तेव्हा पीडीपीशी असलेली युती व इतरत्र अफझलच्या समर्थनार्थ केलेल्या घोषणांवरुन आताच्या सरकारला दुटप्पी म्हणणा-यांना खरे तर रवीशसारख्या निष्पक्ष म्हणवणा-या पत्रकाराकडूनच परस्पर उत्तर दिले जायला हवे. त्याऐवजी तो याचे भांडवल त्याचा मुद्दा एकांगीपणे रेटण्यासाठी करत आहे.

तेथे जर पीडीपीशी आजच्या भाजपऐवजी कॉंग्रेसची युती असती व केन्द्रातही कॉंग्रेसचे सरकार असते व अशी देशविरोधी घोषणाबाजी झाली असती व केन्द्रातील कॉंग्रेस सरकारने त्याविरूद्ध काही कारवाई केली नसती तर याच रवीशकुमारने त्याविरुद्ध आवाज उठवला नसता का? तर मग याची नक्की अडचण काय आहे? राष्ट्रवादाच्या नावावरून आताच्या सरकारच्या विरूद्ध लोकांच्या मनात गोंधळ उडवून देण्याचा त्याचा उद्योग यातून स्पष्ट दिसतो. जगभरच्या अन्यायांची यादी त्याला दिसते, पण कन्नूरमधल्या हत्येसारख्या एखाद्या उदाहरणाचा उल्लेख केला की आपण कसे निष्पक्ष हे दाखवायला तो मोकळा. त्याला बिहार, बंगाल, उ.प्र.मधल्या राजकारण्यांनी घातलेला नंगा नाच दिसत नाही. ना त्याला मालदामध्ये काय झाले त्याचा उल्लेख गुंडगिरीच्या वा देशद्रोहाच्या घटनांच्या संदर्भात करावेसे वाटते.

स्कॉटलंड ब्रिटनपासून वेगळा होऊ पाहतोय, त्यांच्या नेत्यांना तेथे देशद्रोही समजले जात नाही असे रवीशकुमार म्हणतो. हाच न्याय लावायचा तर मग आपल्याकडे अगदी उद्या देशाचे किती तुकडे होतील याची गणती करता येईल काय? तेव्हा तो अतिशय धोकादायक पद्धतीने त्यांचा निष्पक्षपणाचा अजेंडा राबवत आहेत. तो धोकादायक आहे.

राष्ट्रवादाच्या संदर्भात केवळ हिटलरसारख्याची उदाहरणे दिली जातात. भारताच्याच संदर्भात राष्ट्रवाद जागवणारे टिळक, गांधी व स्वातंत्र्यानंतरचे शास्त्री, जेपी, अगदी अलीकडचे अण्णा हजारे यांची उदाहरणे त्यांना दिसत नाहीत काय? तेव्हा राष्ट्रवादाच्या नावाखाली जगभरात काय झाले याची उदाहरणे देताना भारतातही तसेच करण्याचा उद्योग चालू आहे हे दाखवताना केवळ लोकांच्या मनात भयगंड निर्माण करणे हाच याचा प्रयत्न दिसतो.

हे अर्ध्या हळकुंडाने पवित्र झालेले पत्रकार की यांना सगळे माहित असूनही ठरवून खोडसाळपणा करण्याचे ठरवलेल्या पत्रकार परदेशातल्या घटनांचा जसाच्या तसा संदर्भ येथे देतात आणि आपल्या डोक्यातले विष येथे ओकतात. शिवाय यांची पद्धतही आरडाओरडा न करता शांतपणे हे सगळे करण्याची.

जेठमलानींसारखे विविध प्रकारच्या गुन्ह्याचे आरोप असलेल्यांचे वकीलपत्र घेणारेही कधी आताच्या सरकारचा हिस्सा होते हे दाखवणारे हे रवीशमहाशय सिब्बल, चिदंबरम यांच्यासारख्यांनीही वेळोवेळी कोणाची वकीलपत्रे घेतली याचा उल्लेख करत नाहीत, तेव्हा हे धुरळा उठवणा-या पत्रकारांपेक्षा वेगळे नाहीत हेदेखील स्पष्ट होते.

त्याच्या म्हणण्यामध्ये एकच मुद्दा योग्य वाटतो, तो म्हणजे आता जेएनयुमधल्या या घटनांविरूद्ध हे वकील ज्या पद्धतीने हाणामारीवर आले आहेत, ते भ्रष्टाचाराच्या किंवा एरवी होणा-या अन्यायाच्या मुद्द्यांवरून आक्रमक होताना कधी दिसतात का? पण मग ही सिलेक्टिव्ह मुद्द्यांवरून आंदोलने करण्याची वृत्ती सगळीकडेच आहे व केवळ त्याचा उल्लेख केवळ आताच्या संदर्भात करणे हे यांच्या निष्पक्षपणाचे उदाहरण समजायचे का? शिवाय ते या वकिलांनी केलेल्या मारहाणीचा उल्लेख करतात, पण आजवर जे भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आले त्यांच्याविरूद्ध कन्हैयाकुमारसारख्यांनी तेवढ्याच तीव्रतेने आंदोलने केली का हो? त्यावरून विद्यापीठ बंद ठेवले का हो? तेथे सीताराम येचुरी उघडपणे सांगत आहेत की जेएनयुमध्ये सर्व विरोधांना डावलून त्यांच्या पक्षाचा विजय झाला आहे. हे विधान या रवीशकुमारांच्या डोळ्यात भरले का?

जेएनयुमध्ये ८५० प्राध्यापक आहेत. काहींच्या मते त्यातले केवळ ५० प्राध्यापक आताच्या आंदोलनावरून विद्यापीठात संप करण्याच्या मताचे आहेत. हा आकडा थोडाफार बदलूही शकेल, पण बहुतेकांना क्लासेस घ्यायचे आहेत, अभ्यासक्रम पूर्ण करायचे आहेत, असे ते सांगत आहेत. हा कन्हैयाकुमारही स्वत: अतिशय गरीब पार्श्वभूमीतून आलेला आहे. तरीही त्याला काय करायचे ते करू दे, पण तिथल्या बहुसंख्य अशा गरीब विद्यार्थ्यांना ही विद्यापीठात संप करण्याची ‘चैन’ परवडण्यासारखी नाही. त्यांना त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून रोजीरोटी कमवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत.

रोहित वेमुलाच्या आत्महत्येपूर्वी त्याच्या संघटनेने केलेले उद्योग पूर्णपणे राजकीय स्वरूपाचे होते. हा कन्हैयाकुमारही जे करतो आहे, आताच्या देशविरोधी घोषणाप्रकरणात त्याचा हात असो किंवा नसो, ते पूर्णपणे राजकीय स्वरूपाचे आहे. आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये त्याचा सविस्तार लेख प्रसिद्ध झाला आहे, त्यात त्याने व्यक्त केलेल्या मतांवरून हे लक्षात यावे. असेच करायचे तर मग अशा आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आम्ही गरीबीतून आलेलो आहोत, आम्ही दलित आहोत याचे भांडवल करता कामा नये. असे म्हटले तर मात्र अशी आंदोलने करणे हा आमचा हक्कच आहे, असा यांचा आग्रह दिसतो. शिवाय अशी आंदोलने करायची तरी हे सारे विद्यापीठाच्या आवारात नको, कारण त्याने इतरांचे नुकसान होते, हेही यांना मान्य होत नाही. त्यामुळे यांच्या आंदोलनाच्या नावाखाली विद्यापीठ बंद राहिले, त्यातून इतर विद्यार्थ्यांचे ज्यांचा या आंदोलनांशी काही संबंध नसतो नुकसान होते, याचेही अशा गोष्टींचे समर्थन करणा-यांना घेणेदेणे नसते.

तेव्हा रवीशकुमार हे महाशय हे जगभरची उदाहरणे देऊन त्याच्या नावाखाली येथे भयगंड निर्माण करण्याचा उद्योग करत आहेत. ज्या प्रकरणात वकिलांनी किंवा लोकांनी प्रकारांना व जेएनयुमधील विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा उद्योग केला त्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच, पण राष्ट्रवाद हा त्यांना अभिप्रेत असलेल्या अर्थाने वाईटच असतो अशी पट्टी पढवणा-या व आपल्या निवडक व हेतुने प्रेरित उदाहरणांवरून लोकांमध्ये भयगंड निर्माण करणा-या रवीशकुमारसारख्या पत्रकारांपासून सावध रहायला पाहिजे. भारताचे नागरिक म्हणून आपण सर्वसाधारणपणे पुचाट आहोतच, रवीशकुमारसारखे खोडसाळपणा करणारे पत्रकार त्या पुचाटपणात भर घालण्याचे काम करत आहेत. एरवी जे काही चालले आहे ते जणू सारे आलबेल आहे आणि सरकारच ते सगळे विसकटून सर्वांवर अत्याचार करण्यात अग्रेसर आहे असा आभास निर्माण करण्याचे काम करत आहेत.

टाइम्सनाऊचा अर्णब त्याच्या आक्रस्ताळेपणाबद्दल प्रसिद्ध आहे. मात्र आपल्याकडच्या देशविरोधी घोषणांच्या संदर्भात स्कॉटलंडमध्ये काय चालले आहे याची मुर्खासारखी उदाहरणे देत न बसता तो अशा देशविरोधी प्रवृत्तींविरूद्ध रोखठोक भूमिका घेतो आणि दुसरीकडे तो पत्रकार, जेएनयुचे विद्यार्थी यांच्यावर झालेल्या हल्ल्यांबद्दलही त्याविरूद्ध रोखठोकपणाची भूमिका घेतो, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. जसे अर्णवही प्रत्येकवेळी ज्या भूमिका घेतो त्या सगळ्या बरोबर असतातच असे समजण्याची गरज नाही, तीच गोष्ट या रवीशकुमार महाशयांचीही आहे. दूध का दूध करण्याइतपत आपली समज आहे का की आपण वाहवत जातो ते हे पाहण्याची गरज आहे, मग तो अर्णब असो की रवीश कुमार असो. त्यामुळे या निमित्ताने रवीश कुमारने जे केले आहे ते डोळ्यात अंजन घालण्याचे नव्हे आपल्याला आंधळे करण्याचे उद्योग आहेत हे वेगळ्या सांगायची गरज नसावी.

२) एक भला माणूस आणि सगळीकडेच दिसणारे किडे-मकौडे

नुकतीच बंगळुरूमध्ये काळजाला पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना घडली.
बंगळुरुत २३ वर्षीय हरीश नंजाप्पा हा त्याच्या बाइकवरून जात असताना एका भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यामुळे हरीशचं बाईकवरील नियंत्रण सुटलं आणि तो ट्रकच्या खाली आला. हा अपघात एवढा भयंकर होता की या अपघातात त्याच्या शरीराचे दोन तुकडे झाले. कमरेच्या खालचा भाग भागापासून जवळजवळ आठ-दहा फूट अंतरावर पडला.

पण

पुढची १५-२० मिनिटे हरीश रस्त्यावर नुसता तडफडत होता आणि या वर्दळीच्या रस्त्यावरून जाणारे लोक केवळ त्याला बघत राहिले. अलीकडे जवलजवळ प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन असल्यामुळे अनेकांनी त्याचे फोटो काढले, परंतु याला मदत केली नाही. अखेर इतक्या वेळानंतर अॅम्ब्युलन्स आली, तेव्हाही हरीश जिवंत होता. कदाचित झालेल्या प्रचंड रक्तस्त्रावामुळे तो जगणे अशक्यही आहे. पण अॅब्युलन्समधल्या लोकांना त्याने सांगितले की त्याचा मृत्यु आता अटळ आहे, पण त्याची अवयवदान करण्याची इच्छा आहे. अखेर त्याला जिवंत ठेवणे शक्य न झाल्यामुळे त्याचे इतर अवयव वापरता आले नाहीत. त्यामुळे केवळ त्याचे दोन डोळेच उपयोगात आणता येणार आहेत.

हरीशने हेल्मेट घातल्याने त्याच्या डोक्याला कोणतीही दुखापत झाली नव्हती. मृत्यु समोर दिसत असतानाही आपल्यामुळे कोणाचे तरी भले व्हावे अशी इच्छा बाळगणारा हा धन्य हरीश. बाकी बघ्यांच्या स्वरूपातले किडे आपल्या सभोवताली दिसतातच.

३) हिंसाचार आणि आत्महत्या

मुंबईतील लोकलमध्ये मोबाईल फोन चोरल्याच्या आरोपावरून काही जणांनी दोघांना आधी लोकलच्या डब्यात व नंतर प्लॅटफॉर्मवर पूर्णपणे निर्वस्त्र करून मारहाण केली गेली. टीव्हीवरील आजच्या चर्चेत मुळात ही घटना कशामुळे घडली हे कळत नसल्यापासून ते रेल्वेशी संबंधित सुरक्षिततेपर्यंत विविध मुद्दे मांडले गेले. मात्र सर्वात चित्तवेधक मुद्दा मांडला तो डॉ. हरीश शेट्टी या मानसोपचारतज्ज्ञांनी.

एकाच वेळी देशात आत्महत्या आणि हिंसाचार या दोन्ही प्रकारांनी थेमान घातले आहे. जेव्हा एखादा विचार मनात फार प्रबळ होतो त्यावेळी सारासार विचार करण्याची आपली शक्तीच संपते. त्यातूनच मग लातुरमध्ये झालेल्या भुकंपानंतरही जवळ मृतदेह पडलेले असताना पडक्या घरांमध्ये चोरी करण्याची इच्छा होणे, गुजरात दंगलींच्यावेळी झालेल्या दुकानफोडीतून भल्याभल्यांनाही टीव्ही वगैरे वस्तु चोरून नेण्याची इच्छा होणे य गोष्टी कारणमीमांसेच्या पलीकडच्या असतात. परिस्थिती इतकी वेगळी असते की एकीकडे सामान्य माणूसही आजुबाजुच्या व रोजच्या कटकटींमुळे हिंसाचाराला प्रवृत्त होतो, तर दुसरीकडे कित्येक शेतकरीही टोकापर्यंत खेचले गेल्यामुळे आत्महत्या करताना दिसतात.

त्यांच्या मते प्रत्येक राज्यामध्ये मानसोपचाराची बाजू सांभाळण्यासाठी वेगळे मंत्रालय हवे. परिस्थिती आताच गंभीर आहे. हे केले गेले नाही, तर आणखी गंभीर होणार आहे. आताच त्याबद्दल काहीतरी केले पाहिजे.

आपल्याकडे नैसर्गिकदृष्ट्याच एकाच वेळी कोठे तरी कोरडा दुष्काळ असतो, त्याचवेळी दुसरीकडे नद्या दुथडी भरून वाहत असतात आणि यामुळे कित्येक भागांमध्ये पुराचे थैमान असते. आपलीही वृत्तीही अशीच रामभरोसे चालणारी आहे. जोपर्यंत आपल्याला त्यामुळे जोपर्यंत काही बाधा पोहोचत नाही, तोपर्यंत आपला कशाशीच संबंध नसतो.

४) प्रसिद्ध चित्रपट संगीतकार खैय्याम यांनी त्यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जवळजवळ दहा कोटी रूपयांची रक्कम एका ट्रस्टद्वारे चित्रपटक्षेत्रातील गरजूंसाठी वापरण्यासाठी दान केली.

त्यांचे हे दातृत्व वाखाणण्यासारखे अहेच, पण नव्वदाव्या वर्षातही त्यांची तब्येत अगदी ठणठणीत दिसली. त्याचे रहस्यही खय्याम यांनी इतरांच्या फायद्यासाठी शेअर करावे.

५) एबीपीमाझावरील माझा कट्टा या कार्यक्रमात आज महेश काळे व राहूल देशपांडे या दोघांची मुलाखत घेतली गेली.

शास्त्रीय संगीताशिवाय त्यांनी नवी हिन्दी चित्रपट गीते व त्याचबरोबर पाश्चिमात्य गाणीही लीलया सादर केली. अर्थात हे केवळ शब्दात सांगून भागणारे नाही. तुम्ही हा कार्यक्रम पाहिला नसेल तर जरूर पहा. असेच दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याचा विचार असेल तर एबीपीमाझाने ‘कला कट्टा’ हा वेगळा कट्टा निर्माण करावा. अर्थात त्यावर बहुतेक भुक्कड मराठी चित्रपटांचे प्रमोशन करण्याचा हेतु नसावा.

या कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडियो आतातरी उपलब्ध नाही. परंतु एबीपीमाझाच्या वेबसाइटवर या कार्यक्रमात गायलेली गाणी उपलब्ध अहेत.
वेबसाइटची लिंक: http://abpmajha.abplive.in/videos

#फुसके_बार

#Phusake_Bar

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असेच करायचे तर मग अशा आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आम्ही गरीबीतून आलेलो आहोत, आम्ही दलित आहोत याचे भांडवल करता कामा नये. असे म्हटले तर मात्र अशी आंदोलने करणे हा आमचा हक्कच आहे, असा यांचा आग्रह दिसतो<<<<<<<<<<

कन्हैया कुमार भुमिहार ब्राम्हण आहे.

<दूध का दूध करण्याइतपत आपली समज आहे का की आपण वाहवत जातो ते हे पाहण्याची गरज आहे, मग तो अर्णब असो की रवीश कुमार असो>

बरोबर. दूध का दूध करण्याइतपत आपली समज आहे का की आपण वाहवत जातो ते हे पाहण्याची गरज आहे, मग तो अर्णब असो की रवीश कुमार असो की राजेश कुलकर्णी असोत (की भरत मयेकर असो, हे तुम्ही लिहायच्या आधी मीच लिहून टाकतो)

ज्यांनी आपल्या सर्व आर्थिक , प्रापंचिक, नोकरीविषयक जबाबदार्‍या पूर्ण केल्यात फक्त त्यांनीच आंदोलने करावीत ही थिअरी तर खूप आवडली.

>तीच गोष्ट पीडीपीबरोबरच्या काश्मिरमधल्या युतीची. काश्मीरमधली राजकीय कम्पल्शन्स, मग ती कॉंग्रेस वा भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांची असोत, त्याचे विश्लेषण करण्याची या रवीशकुमारची योग्यता नाही व त्यावरून जादवपूर विद्यापीठातली अफजल गुरूचे समर्थन करणा-या घोषणा देणा-या मुलीच्या या प्रतिवादावरून येथे आताच्या सरकारला झोडपण्याचीच त्याची वृत्ती येथे दिसते..

ही योग्यता कुठे मिळते ? बाकी हा योग्यतेचा युक्तीवाद बिनतोड आहे. अडचणीत आणाणारे प्रश्न कुणी विचारले की "विश्लेषण करण्याची तुमची योग्यता नाही" असे म्हणून मोकळे व्हायचे हा का ना का.

काळ्या पैशाच्या पंधरा लाखाचे काय झाले ?
"योग्यता नाही"
मनमोहन सिंगांच्या वयाबरोबर स्पर्धा करणारा डॉलर आता सत्तरीकडे का जातोय ?
"योग्यता नाही"

अफझल गुरुला फाशी द्यायला नको होती असे अनेकांचे मत आहे. त्यत काही विद्यार्थीही आले. आणी ते व्यक्त करण्यात काहीही चूक नाही. असे मत असणारे सरसकट सर्वजण अफझल समर्थक व म्हणून राष्ट्रद्रोही ठरवणे चुकीचे आहे. एखद्या माणसाचे भारतावर प्रेम आहे कि नाही हे ठरवण्याची लिटमस टेस्ट म्हणजे अफझलच्या फाशीला पाठिंबा असणे ? भारतावर प्रेम आहे पण फाशी ची शिक्षा असू नये असे मानणारे लोक नसतातच ?

खरे तर रवीश कुमार हा एक शांत आणी सेन्सीबल अँकर आहे. या जे एन यू प्रकरणात आर्णब व इतर टी आर पी लोलूप अँकर्सच्या बटबटीत "राष्ट्रवादा" च्या पार्श्वभूमीवर अधिकच. आपण राष्ट्रवादी आहोत हे सिद्ध करण्यासाठी जे एन यू ला शिव्या घातलया की झाले !

विकु,
छान लिहलेत.
जमल्यास जे एन यू च्या एका मराठी विद्यार्थिनीने लिहिलेला हा लेख वाचा.
जे एन यू क्या चीज है हे समजायला मस्तं आहे तो लेख!

<<मनमोहन सिंग यांच्या वया बरोअबर स्पर्धा करणारा डॉलर सत्तरी कडे का जातो आहे? >>

हे समजलं नाही

रुपयाच्या विनिमय दराची अत्ताची पध्द्त आणि युपीए च्या काळात असलेली पध्द्त बराच फ़रक आहे.

<<हे अर्ध्या हळकुंडाने पवित्र झालेले पत्रकार की यांना सगळे माहित असूनही ठरवून खोडसाळपणा करण्याचे ठरवलेल्या पत्रकार परदेशातल्या घटनांचा जसाच्या तसा संदर्भ येथे देतात आणि आपल्या डोक्यातले विष येथे ओकतात.>>

कन्हैयाने आपल्या भाषणात आजादी मागितली, आजादीच्या घोषणा दिल्या असा व्हिडियो काही वृत्तवाहिन्यांनी दाखवला. याच त्या देशद्रोही घोषणा म्हणून आपला निकालही देऊन टाकला. दिल्लीचे पोलिस कमीशनरही याच व्हिडियोच्या आधारावर कन्हैयाविरुद्ध आमच्याकडे पुरावे आहेत असं म्हणत असल्याचं दिसतं.

काल दुसर्‍या काही चॅनेल्सनी ती चित्रफीत एडिटेड असल्याचं दाखवायचा प्रयत्न केला. त्या घोषणा "भूखमरी से आजादी, संघवाद से आजादी, सामंतवाद से आजादी, पुंजीवाद से आजादी, ब्राह्मणवाद से आजादी, मनुवाद से आजादी...... अशा असल्याचं दाखवलं.

त्या एडिटेड चित्रफितीमुळेच कन्हैयाला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालं असं मानायला वाव आहे.

तर ही चित्रफीत दाखवणार्‍या आणि पोलिसांपर्यंत पोचवणार्‍या पत्रकारांना व वृत्तवाहिन्यांना खोडसाळपणा करणारे व आपल्या डोक्यात विष ओतणारे म्हणायचे की नाही?

-----

राष्ट्रवाद नक्की कशाशी खातात याबद्दल प्रबोधन करून घेण्यासही मी उत्सुक आहे.

vijaykulkarni,
आपली अर्थव्यवस्था निर्यातीपेक्षा कितीतरी आयातप्रधान आहे हे माहित असूनही ठरवून रूपयाचे अवमूल्यन केल्याचे तुम्हाला स्मरत असेलच. स्वत: अमेरिका व जपानसह बहुतेक सर्व प्रगत योरपीय देशही कर्जाच्या प्रचंड बोज्याखाली असूनही आपण केवळ डॉलरआधारित व्यापार करतो या कारणामुळे रूपया घसरतो आहे. ही पद्धत कितीही अन्यायकारक असली तरी तिला आव्हान देण्याची धमक कोणामध्येच नाही.
काळ्या पैशाबद्दल. प्रत्येकाला पंधरा लाख मिळतील असे म्हणले की त्यावरून काळ्या पैशाची समस्या किती गंभीर आहे हे कळायला हवे. त्याचा शब्दश: वापर राजकारण्यांनी केला तर समजू सकतो. तुम्हीही तेच करावे? एवढेच न्वहे तर या प्रकरणांची चौकशी करण्याबाबत कॉंग्रेस सरकारने पाटतपुरावा करण्याऐवजी उलटीच भूमिका घेतली हे तरी तुम्हाला स्मरते का?
येथे अफझलच्या फाशीला विरोध असण्याचा प्रश्नच नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकालातही त्याबाबतच्या संदिग्धतेचा उल्लेख आहे, तरीही सारे पुरावे तपासूनच हा निकाल दिला गेला होता. त्याबद्दल बोलायलाही हरकत नाही, पण त्यावरून देशविरोधी घोषणा देण्याचे काय कारण? या घोषणा काय तुमच्या कानावर पडल्याच नाहित की काय? शिवाय काय झाले म्हणजे कारवाई करावी असे तुम्हाला वाटते?
एकूण रविश जे काही एकांगी बोलतो, ते शांतपणे. त्यावरून तो सांगतो हेच बरोबर ासे समजायचे तर जरूर समजा.
अर्णबबद्दल मला काही विशेष प्रेम नाही हे तर मी संगितलेलेच आहे. राष्ट्रवाद वगैरे मोठे शब्द सोडा, देशविरोधी घोषणांचे समर्थन नको हे तरी पटते का पहा.

मयेकरसाहेब.
तो अपप्रचार आहे असे समजणारे तुम्हीच त्याला बळी पडत अाहात असे दिसते. आता तर केंद्रीय विद्यापीठांमध्ये तिरंगा लावण्यालाही विरोध होत आहे. तेव्हा तुम्ही या लोकांच्या हातचे बाहुले बनताय हे तुमच्या जेवढे लवकर लक्षात येईल तितके बरे. देशद्रोह, राष्ट्रवाद वगैरे मोठमोठे शब्द सोडून द्या, पण या गोष्टी चुकीच्या आहेत हे तुम्हाला वाटत नसेल तरी आणखी काही बोलण्याचे कारण नाही.

बरं. देशविरोधी घोषणांचं समर्थन नेमकं कोण करतंय ते कळू द्या.

राष्ट्रवाद म्हणजे नक्की काय हे समजवून सांगा अशी आग्रहाची विनंती.

देशविरोधी घोषणा देण्याचे काय कारण? या घोषणा काय तुमच्या कानावर पडल्याच नाहित की काय? शिवाय काय झाले म्हणजे कारवाई करावी असे तुम्हाला वाटते?

देशविरोधी घोषणा कुणी दिल्या? कन्हैय्यने त्या दिल्या असे निदान सकृतदर्शनी वाटावे असा काही पुरावा आहे का? एका टी व्ही चॅनेल वर दाखवलेल्या व्हिडिओ क्लिप ( जर ती खरी आहे असे मानले तर) च्या जोरावर देशविरोधी घोषणा दिल्या म्हणून थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार? तेही त्या क्लिप मध्ये नसलेल्या मुलावर?

आपल्या अशा आक्रस्ताळ्या उरबडवे पणामुळळेमुलांचे किती नुकसान होउ शकेल याचा विचार हे गुलाबजामुनाप्रमाणे देशप्रेमात बुडवून काढलेले अँकर्स करतात काय?

>आता तर केंद्रीय विद्यापीठांमध्ये तिरंगा लावण्यालाही विरोध होत आहे

This is ridiculous ! आता तर हसुही येइनासे झालेय. कोणत्या केंद्रिय विद्यापीठाने तिरंगा लावायला विरोध केला बरे ?

विजय कुलकर्णी,
तुम्ही जे चालले आहे त्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीसे दिसते.
कुलगुरूच्या बैठकीत झेंडा लावन्याबाबत एकमताने निर्णय झाला. त्याला काही विचारवंत विरोध करत आहेत. हे तुमच्यापर्यंत आले नसेल तर हरकत नाही. पण हसुही येत नाही ही अवस्था होऊ देऊ नका.
कन्हैयाने देशविरोधी घोषणा दिल्या असे मी कोठे म्हणले? उलट त्याला काल कोर्टात जाताना झालेल्या मारहाणीचा निषेधच केलेला आहे.
आधी तर अभाविपवाल्यांनीच या घोषणांचा कट रचला वगैरेवरून अनेकांनी आनंद व्यक्त केला हे तुम्ही विसरलात वाटते. एवढेच काय, त्यांच्याप्रमाणेच जादवपूर विद्यापीठामध्येच देशविरोधी घोषणांचे आयोजन अभाविपनेच केले असे तुम्हालाही म्हणायचे अाहे काय?
पोलिसांनी कन्हैयला जामीन मिळायला त्यांची हरकत नसल्याचे सांगितलेले आहे. अाज त्याला कदाचित जामीन मिळेलही. पण देशविरोधी घोषणांना विरोध करणा-यांनाच येथे उलटी पट्टी पढवली जात अाहे. त्याबद्दल तर तुम्ही काही म्हणताना दिसत नाही. देशविरोधी घोषणांना तुमचा पाठिंबा आहे का किंवा त्यामुळे काही फरक पडत नाही व अशा घोषणा देणा-यांवर काही कारवाई करायला नको असे तुमचे म्हणणे हे एकदा स्पष्ट करा,म्हणजे ब-याचश गोष्टी समजायला सोप्या होतील.

अरेरे रवीशकुमारवर टीका? ह्या रवीशकुमारच्या संदर्भांवर तर, जणू ते अंतिम सत्य आहे असे भासवून 'तिकड'चे एक जपानी दुकान अव्याहत चालू असते. त्याचे कसे होणार ?

राजेशजी ,
समर्थ आणी एक (यूनाइटेड) भारत ही भावना केवळ झेंडा फडकवुन येईल असे तुम्हांला वाटते का ?
हे म्हणजे सैन्याला काहीही सुविधा न देता सीमेवर शंकराचे देऊळ बांधून आता सैन्य जास्त चांगले लढेल असे मानने झाले.
किंवा महाराष्ट्रातल्या जर्जर किल्ल्यांवर २००फूटी भगवा फडकवल्यने किल्ल्यांची परिस्थिती सुधारेल आणी शिवशाही येईल अशी अपेक्षा करने झाले.
झेंडा लावायला कोणाचाच विरोध नाही.पण ते उद्दिष्ट्य साध्य करण्याचे दूसरे ठोस उपाय करायची आवश्यकता असताना हा कोस्मेटिक उपाय पुढे रेटने मूर्खपणा वाटतो इतकेच

सिंबा,
विद्यापीठांमध्ये राष्ट्रध्वज लावणे किंवा तो स्पष्टपणे दिसेल असा लावणे (२०० फूट उंच, वगैरे) याचा तात्कालिक अर्थ लावण्याची आवश्यकता नाही. जरी तो निर्णय आताच्या वातावरणात घेतला गेला असल्याने तसे वाटले तरी.
आज भाजपचे सरकार आहे, उद्या नसले तरी तो ध्वज सर्वांना दिसत राहणारच आहे. पण मुळात झेंडा लावण्याच्या या निर्णयालाच काही जणांनी विरोध केला याचे आश्चर्य वाटले.
मुळात ध्वज ही कल्पनाच प्रतिकात्मक अाहे त्याला काय करणार. त्याचा काय उपयोग असे काहींना वाटणार, व काहींना त्यातून स्फूर्ती मिळत राहणार.

रोहीथ प्रकरणानंतर १५-२० दिवसांनी स्मृतिबाईंनी एक v C ची बैठक बोलावली होती.मागासवर्गीय मुलांना समान वागणूक मिळावी म्हणून, यूनाइटेड इंडिया चे उद्दिष्ट्य साध्य करायला त्या झेंडा निर्णयापेक्षा ,त्या बैठकीचे फलित जास्त रेलवेंट होते असे तुम्हाला नाही वाटत का?
त्या बैठकी बद्दल काहीच वाचनात आले नाही,
त्यात काही निर्णय झाला नाही की दुष्ट मीडिया ने त्याला प्रसिध्दी दिली नाही ?
आणी जर निर्णय झाला नसेल तर या कोस्मेटिक निर्णयावर टीका होने क्रमप्राप्त आहे.

लोकांचा विरोध ध्वज संकल्पनेला आहे की त्यातील निष्फळतेला आहे.
?.
नवीमुम्बै पालिकेच्या आवारात, खालापूर येथे एका कम्पनीच्या आवारात असाच मोठा झेंडा लावला आहे , रात्री देखील तो फडकत असतो. त्याने किती लोकांना स्फूर्ती मिळाली हा वेगळा विषय आहे. थोर व्यक्तींचे पुतळे स्फूर्ती मिळावी म्हणून उभे करतात, संसदच्या आवारात २ डझन पुतळे असतील, एका तरी mp ने घेतली का त्यांच्याकडून स्फूर्ती ?

राष्ट्रभक्ति कोमोदिटि बनवू नका.

सिंबा,
त्या बैठकीत विद्यापीठांमध्ये भेदाभेद होऊ नयेत यासाठी काही पावलेही उचललेली आहेत. Anti-discriminatory.
सगळेच प्रतिकात्मक असले तरी त्याचीही आवश्यकता असतेच. पुतळे मर्यादित प्रमाणात असावेत. आता कोणाचेही पुतळे उभारले जातात. अगदी मायावतीपासून सर्वांचे. काय स्फूर्ती घेणार कोणी?
मात्र राष्ट्रध्वजाचे पुतळ्यासारखे नाही. त्याला न जुमानण्याचीही व्ृत्ती तयार होण्यास अजून काही अवधी आहे. सध्या जे चालू आहे, ते पाहता तीदेखील नक्की तयारहोईलच. तसे होउु नये ही अपेक्षा.

Anti-discriminatory.
सगळेच प्रतिकात्मक असले तरी त्याचीही आवश्यकता असतेच>>>>>>>>>
सरकार प्रतीकात्मक गोष्टी करण्यात आणी त्याना प्रसिध्दी देण्यात इतके वाहवत जाते, की रचनात्मक गोष्टी करण्यात त्याना वेळ आणी पैसे रहात नाहीत. (उदा - स्वच्छ भारत,मोदिंनि प्रतीकात्मक झाडू मारला, मागोमाग लोकानी फक्त प्रतीकात्मक स्वच्छता केली, बाकी प्रॉब्लेम होता तसाच)
जर या बैठकीत काही निर्णय झाले असतील तर ते तितक्याच परिणामकारक पद्धतीने डिक्लेर का झाले नाहीत? ( कल प्तेरत्येक चॅनेल वर bJp नेते फक्त याच विषयावर बोलत होते ) हे रचनात्मक काम दुर्लक्षीत ठेऊन , या प्रतीकात्मक निर्णयाचे सरकार इतके मार्केटींग का करते आहे?
मलातरी हा निर्णय लोकांचे मूळ प्रॉब्लेम वरून लक्ष हटवण्यासाठी घेतलेला निर्णय वाटतो.

सिंबा, छान पोस्ट.

सरकारकडे भरीव अथवा ठोस असे काहीच दाखवण्यासाठी नसते तेव्हा लोकभावना चेतवण्याचे उद्योग केले जातात. दुर्दैवाने मोदी सरकारला अशा प्रकारच्या उद्योगांची कास बरेचदा घ्यावी लागली आहे. राष्ट्रभक्ती हा प्रत्येकाच्या मनातला एक जाज्वल्ल्य कोपरा असतोच, त्यामुळे त्यावर फुंकर घालण्याचे काम या सरकारमार्फत्/त्यांच्या मातृसंघट्नेमार्फत केले जात आहे.

आजच फेबु वर एक पोस्ट आली की JNU चे नाव बदलुन चंद्रशेखर आझाद युनि. करा , त्यामुळे तिथल्या विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभावना जागृत होईल. हसावं की रडावं??

जिथे तिथे झेंडा लावायला माझा विरोध आहे. कारण त्यात राष्ट्रभक्ती आहे असे नाही. मुख्य म्हणजे सध्या आपल्या भावना फारच नाजुक झाल्या आहेत. जरा काही झाले की त्या दुखावतात. आता झेंडा उंच लावायचा तर त्याची निगराणे हवी. तो वार्‍याने फाटता कामा नये. पावसाने विटता कामा नये. वरचे वर बदलला गेला पाहिजे.
शिवाय इमारतीवरील झेंड्याकडे कुणाचे मोठेसे लक्ष्य जात असते? इमारतीसमोरच्या जागेत स्तंभ लावला तरी तेच. कोणाचे लक्ष्य जाणार? मुले-मुली तेथे भेळ किंवा तत्सम खात बसणार. मग कुणाला तरी 'विटंबना' अपमान वगैरे सुचणार. कोणालाही देशभक्ती वगैरे सुचत नसते अश्या प्रतीकांपासून. सचिवालयावर सतत झेंडा असतो. पार्लमेंटवरही झेंडा असतो. आत काय घडते?
शक्यतो अशी 'पवित्र' स्थाने सार्वजनिक ठिकाणी निर्माणच करू नयेत. पुतळ्यांची हालत झालीय ती पुरेशी नाहीय का?

भगतसिंह रस्ता, नेताजी सुभाष नगर, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर/मैदान/चौक इथे वावरणारे, राहाणारे, उठणारे बसणारे लोक देशभक्तीने धगधगत असतात की काय?

लिटल जिमी
राकुंनी लेख लिहीला. लोकांनी वाचला. पण वाचन कसं करायचं हे कळालं नाही.

https://youtu.be/9XH7pI9Vws0
अस्सं वाचायचं. आत्ता ऐका फक्त

येतो जिमी

19 February, 2016 - 21:29 >>>>> हीरा, तुमची ही पोस्ट एकदम पटली. हो, हेच वाटतेय आता की फक्त १५ ऑगस्ट आणी २६ जानेवारी आला म्हणून तुफान झेन्डे विक्री होते आणी कळत-नकळत हे छोटे झेन्डे पायदळी पण तुडवले जातात, हा देशाचा अपमान नाही का? मी तर म्हणते पुतळे पण बसवु नका. रात्री-बेरात्री कोणी पेताड उठतो आणी पुतळ्याला चपलाचा हार काय, थुन्कणे काय काहीही करतो. त्यातुन जातीय तेढ निर्माण होते. त्यापेक्षा तेवढेच पैसे सरकारने अनाथ मुलान्साठी किन्वा झोपडपट्टीतील मुलान्च्या शिक्षणासाठी वापरावे.

आजकाल प्रत्येक ठिकाणी नवीन मन्दिर-मशीद बनवण्याची पण फॅशन बनत चाललीय. ते पण बन्द झाले तर बरे. वात आणलाय दन्गलीनी.

Pages