मला तो सगळीकडे दिसतो

Submitted by विद्या भुतकर on 15 February, 2016 - 21:19

अजूनही मला तो सगळीकडे दिसतो
बोलतो एक आणि वेगळेच करतो.
घर दोघांचं असलं तरी दाराच्या पाटीवर
पहिला त्याचाच मान असतो.

बायकोच्या मैत्रीणी आल्यावर
आत जाऊन बसतो.
त्याचे आल्यावर मात्र
चहाची अपेक्षा करतो.

शाळेच्या रांगेत उभे राहून
अडमिशनला धडपडतो.
पोर आजारी पडल्यावर
बायकोलाच रजा घ्यायला सांगतो.

भाज्या, सामान आणून देतो
घर लावतो आणि केरही काढतो.
घराचे हफ्ते आठवणीने भरतो.
भांडी घासायला मात्र अजूनही कचरतो.

सासू-सासऱ्याशी बोलायचे टाळतो
'अहो जावो' केल्यास ऐकून घेतो
आईबाबांच्या आदराचा हट्ट करतो
गोतावळाही तिलाच सांभाळावा लागतो.

स्त्रीने कितीही बरोबरीने शिकले
आणि सारखेच झटले तरी
त्याच्या मनात एक पुरुष असतो
अजूनही मला तो सगळीकडे दिसतो.

विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. आवडली.
... पण ही तक्रार आहे की कौतूक?