कवीचे गाव

Submitted by विग५० on 12 February, 2016 - 01:19

कवीचे गाव
परवा वर्तमानपत्रामध्ये आलेला एक लेख वाचत होतो. लेखिका दूरदर्शन च्या जुन्या काळातील निर्मात्या. स्मरण रंजनात्मक आठवणी त्या लेखात होत्या. पु लं , चिमणराव, ना घ देशपांडे इत्यादीच्या आठवणी लिहिलेल्या होत्या. लेख वाचून छान वाटले. पण एका वाक्याने मात्र मनात थोडी खळबळ निर्माण केली.
ना.घ. देशपांडे हे गेल्या शतकातील प्रतिभावंत कवी.. “रानारानात गेली बाई शीळ”, “फार नको वाकू जरी उंच बांधा” ई. त्यांची गीते अतिशय लोकप्रिय झालेली. ह्या प्रतिभावंत कवींची ची मुलाखत घ्यायला निर्मात्या (लेखिका) बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर ह्या ना घं च्या गावाला चित्रीकरणाची गाडी घेऊन गेल्या. त्या सर्व आठवणी लेखिकेने लिहिल्या. अतिशय हृद्द अशा त्या आठवणी होत्या. आठवणींची सुरुवात करतांना मात्र त्यांनी मेहेकर ह्या गावाचे वर्णन असे केले.
“ विलक्षण सुंदर गाव ... निसर्गाने नटलेलं...”
हे वर्णन वाचून मात्र मला प्रचंड गंमत वाटली. मेहेकरचे असे वर्णन मात्र माझ्या कल्पनेपलीकडचे होते. ते वर्णन वाचून माझ्या मनात अनेक विचार आले.
माझे गाव मेहेकर. बालपण व शालेय शिक्षणाचा काळ मेहेकर मधेच गेला. ( १९७० पर्यंत ) त्यानंतर मेहेकर सोडले. गेल्या ४०-४५ वर्षात मेहेकरला ८-१० वेळेला गेलो असेल. माझे घर ना.घ. देशपांडे ह्यांच्या घरापासून ५० - १०० पावले दूर असेल. गावातले सर्व रस्ते वेडे वाकडे, ओबड धोबड, खूप जास्त चढ उतार असलेले, त्यामुळे सायकल चालविणे सुद्धा अतिशय कष्टाचे असे व प्रचंड धुळीने भरलेले. दाटीवाटीने वसलेली एक किंवा दोन मजली अनाकर्षक घरे. रस्त्यामध्ये एकही झाड बघितल्याचे मला आठवत नाही. एकमेव झाड आठवते ते मारुतीच्या पाराजवळचे पिंपळाचे. (की वडाचे ते आठवत नाही) अजूनही मेहेकर मध्ये रिक्षा किंवा टांगा मिळत असेल असे वाटत नाही. त्या वेळेला तर नव्हतेच. रस्ते खूप जास्त चढ उतार असलेले आणि प्रत्येक १०० - २०० पावलानंतर मध्येच २-३ पायऱ्या असलेले असल्यामुळे रिक्षा, टांगा चालणे अशक्य. प्रवासाला निघायचे तर घरापासून बस स्थानका पर्यंत सामाना साठी हमाल करायचा. तो हमाल डोक्यावर ३-४ ट्रंका, बिस्तरा ई. घेऊन घरापासून स्थानकापर्यंत दीड दोन किलो मीटर चालत जायचा, आणि लहान मुलांपासून म्हाताऱ्या पर्यंत सर्वांनी तसेच चालत जायचे हाच पर्याय. त्या काळात डोक्यावरून मैला वाहून न्यायला लागणारे, घराच्या मागील भागाला असलेले संडास. काही रस्त्यांवर तर दर्शनी भागात संडास होते. त्यात सतत डुकरांचे वास्तव्य. रस्त्यात असंख्य डुकरे वावरत असायची. अतिशय अस्वच्छता. उन्हाळ्यात व हिवाळ्यात सगळीकडे धूळ व रखरखाट, पावसाळ्यात प्रचंड चिखल. मेहेकर चे हे दृष्य अजून माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. विदर्भातली बहुधा सगळीच गावे अशीच उजाड, अस्वच्छ व रखरखित असावीत. विदर्भातले कुठलेच गाव कोकणातल्या गावाप्रमाणे निसर्गाने नटलेले वगैरे असण्याची शक्यता एक टक्क्यापेक्षाही कमी आहे असे मला वाटते.
ना घं च्या कवितेतला निसर्ग त्यांना (कवीला) कोठे बघायला मिळाला माहित नाही. त्यांची गढी निसर्गसुंदर असावी. कदाचित कल्पनेतून त्यांनी विश्व उभे केले असावे. नाहीतरी कवीला, कलावंतांना आणि क्यामेऱ्यातून बघतांना, जग वेगळे दिसते हे खरेच आहे. कदाचित १०० – १२५ वर्षापूर्वी मेहेकर तसे असेलही. लेखिकेला सुद्धा मेहेकर खरोखरच सुंदर वाटले असेल. आणि मेहेकर आता थोडे बदललेले ही असेल. रस्ते थोडे बरे झालेले असावेत.
पण लेखिकेने वर्णन केलेले गाव आणि माझ्या आठवणीतील गाव ह्याचा कोठेच मेळ जुळत नव्हता. इतर सर्वसामान्य तालुक्याच्या गावासाराखेच ते एक साधे गाव आहे. त्यातले एखादे घर किंवा एखादा मोहल्ला, एखादा रस्ता सुंदर असू शकेल. पण संपूर्ण मेहेकर ह्या गावाचे चे वर्णन “सुंदर गाव” ह्या साध्या विशेषणाने सुद्धा करता येईल असे मला वाटत नाही. खूप सुंदर, अतिशय सुंदर, हे वर्णन तर खूपच अतिशयोक्त वाटेल. “विलक्षण सुंदर गाव” हे वर्णन मात्र विलक्षण विसंगत वाटले. सनी लिओनि ला सोज्वळ किंवा अलका कुबल ला मादक म्हणण्यासारखे ते वर्णन वाटले. (उपमा कणेकरांकडून उधार घेतलेल्या. भयानक विसंगतीचे एव्हढे समर्पक वर्णन दुसरे कोण करू शकेल ?)

लेखिकेच्या आणि माझ्या दृष्टिकोनामध्ये एव्हढा प्रचंड फरक का पडला असावा ह्यावर मन विचार करू लागले. मला जाणवलेली काही कारणे पुढीलप्रमाणे.
सद्ध्याच्या काळात क्लिशे चा अनावर वापर आणि विशेषणांचा सुकाळ झालेला आहे. वचनं कीं दरिद्रता.
स्मरण रंजनात्मक लेखाच्या सुरुवातीलाच, “”कवीचे गाव अगदी रुक्ष, ओबड धोबड आणि रखरखित, किंवा इतर कोणत्याही गावाप्रमाणे सामान्य वाटले”, असे वर्णन करणे विसंगत दिसले असते. त्यामुळे लेखाचा परिणाम उणावला असता.
कोणत्याही गावाचे वर्णन करतांना त्याबद्दल चांगलेच लिहायला हवे, बोलायला हवे असा ही संकेत आहे.
आणि मला वाटते की कवीचे, किंवा लेखकाचे गाव (विशेषतः निसर्ग कवीचे, प्रेम कवीचे ) सुंदर, निसर्गाने नटलेले असायला हवे असा एक अलिखित नियम किंवा संकेत मराठी साहित्यात आहे. अश्या संकेता मुळे किंवा अपेक्षे मुळे कवीच्या, लेखकाच्या गावाचे वर्णन थोडे जास्त स्वप्नाळू पणे केले जाते. त्या शिवाय त्या कवीला, लेखकाला सुंदर निसर्ग वर्णने करणे कसे जमले असते असाही विचार त्यामागे असावा. कवीच्या, लेखकाच्या गावाला खूप लोक श्रद्धेने भेट देतात. शेक्सपिअर चे Stratford upon Avon हे गाव मराठी साहित्यात सुद्धा अतिशय लोकप्रिय आहे. केशवसुत, बोरकर, खांडेकर, पेंडसे ह्यांच्या गावाला भेट दिल्यानंतर अनेकांनी त्या गावाचे वर्णन केले आहे. (अर्थात ती गावे कोकणातील, गोव्यातील असल्यामुळे खरोखरच सुंदर व निसर्गसंपन्न असतील) त्या गावाला भेट देणाऱ्या सर्वांनी गावाच्या निसर्गाचे सुंदर असे वर्णन केलेले वाचल्याचे आठवते. आणि त्यामुळे कवीच्या, लेखकाच्या गावाचे वर्णन करण्याचा तो एक प्रघात (Pattern) झालेला असावा .
कवीचे गाव सुंदरच दिसायला हवे ह्या अपेक्षेला काय म्हणावे ? श्रद्धा की अंधश्रद्धा ?

ता.क.
लेखिका अप्रामाणिक आहेत किंवा त्यांनी असत्य विधान जाणीवपूर्वक केले आहे असे मला मुळीच म्हणायचे नाही. पण माझ्या लिखाणातून तसे ध्वनित होते ह्याचीही मला जाणीव आहे. माझ्या लेखन क्षमतेची ती मर्यादा आहे. त्याबद्दल क्षमस्व. तलवार सिनेमा मध्ये विसंगती दाखविण्याचा हेतू होता. न्यायाधीश अप्रामाणिक होते असा निष्कर्ष काढलेला नव्हता. मलाही जीवनातील / दृष्टिकोनातील विसंगती कडे बोट दाखवायचे आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गृहीत धरलेलं असतं हे सगळं.
ना. घ. देशपांडेंचं कवितेबद्दल एक पुस्तक आहे. त्यात कविता कशी वाचावी, कशी समजून घ्यावी याचं सुंदर विवेचन आहे. ते समजलं की अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील.