फुसके बार – १२ फेब्रुवारी २०१६ - चवीची संवेदना नष्ट करता आली तर, हणमंतप्पा, ग्रॅव्हिटेशनल लहरींचा शोध

Submitted by Rajesh Kulkarni on 11 February, 2016 - 14:24

फुसके बार – १२ फेब्रुवारी २०१६ - चवीची संवेदना नष्ट करता आली तर, हणमंतप्पा, ग्रॅव्हिटेशनल लहरींचा शोध
.

१) पदार्थाची चव कळू नये यासाठी जीभेवर करण्याच्या कोणत्या प्रक्रियेबद्दल कोणी ऐकले आहे का?

शाळेतल्या निबंध लिहिण्याच्या विषयांमध्ये ‘अमुक झाले तर’ किंवा तमुक ‘झाले नाही तर’ या विषयांवरील कल्पनाविस्तार अनेकदा पाहता आला. आजच्या शाळांमध्येही ते मॉडेल फारसे बदललेले नाही.

मात्र ‘आपल्याला चवीचे ज्ञान नसते तर’ हा विषय माझ्या पाहण्यात नाही.
दारूमुळे कुटुंबे उध्वस्त झालेली आपण पाहतो. चवीबद्दलच्या अत्याग्रहामुळे घरची बाई कायम दावणीला धरलेली आपण सभोवताली पाहतो. डोक्यावर कर्जाचा डोंगर असो, तरीही या चवीच्या खुळापायी दर आठवड्याला बाहेर खाण्यावर हजारो रूपये उधळणारेही आपल्या पाहण्यात असतात. तेव्हा या ‘व्यसना’वर किती खर्च होतो हे कोणी उधळपट्टीमध्ये गृहित धरतच नाही.

बाकी खरेच चवीचे ज्ञान होणारी जीभेवरची केंद्रे बंद करता आली, डाएटिंगचा भाग म्हणून किंवा कायमची, तर काय परिणाम होईल? आणि वैद्यकीयदृष्ट्या जीभ न कापावी लागता ते अशक्य आहे असे मला वाटत नाही.

सगळ्यांची खाण्याबाबतीतली आवडनिवड जवळजवळ नष्ट होईल. आताच्या खोडांनी विविध पदार्थांची चव अनुभवलेली आहे म्हणून, त्यांना त्या सवयीतून बाहेर पडणे जड जाईल. पण ज्यांना नव्याने चवींची ओळख होते आहे त्यांना काही फरक पडणार नाही.

अर्थात कधीकधी पदार्थांमधली भेसळ किंवा अन्न खाण्यायोग्य राहिलेले नाही या गोष्टी चवीमुळे कळतात. परंतु तो भाग तूर्त बाजूला ठेवुया.

एकाच कच्च्या मालापासून वेगवेगळे पदार्थ तयार करणे बंद होतील. सुगरण हा शब्द इतिहासजमा होईल, हॉटेल मॅनेजमेंटमधील शेफचा भाग बंद होईल, तरला दलाल – संजीव कपूर यांच्यासारख्यांची पंचाईत होईल, चवीपेक्षा फुड डेकोरेशनला महत्त्व येईल. (तसे ते आताही आहेच.) कार्ल्यासारख्या भाज्यांची आवड-नावड हे प्रकार बंद होतील (शेपुच्या भाजीचा उल्लेख केला नाही, कारण काहींना त्याचा वासही आवडत नाही). हे आणखीही वाढवता येईल.

महात्मा फुलेंनी विद्येच्या अभावामुळे झालेल्या अनर्थांबद्दल जे सांगितले आहे त्याच धर्तीवर चवीच्या अत्याग्रहामुळे झाले त्याबद्दल सांगता येईल, इतका हा विषय गहन वाटतो.
विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।

या ओळींना साजेशा तिन्ही ओळी मला या संदर्भात नाहीत करता येणार, मात्र शेवटची ओळ मात्र अशी काहीशी असू शकेल.

आरोग्याचे वाटोळे झाले । इतके अनर्थ जीभेच्या चोचल्यांनी केले।।

२) हिंदी-मराठी सिनेमांमधील उचलेगिरी

हिंदीतले राकेश रोशन वा आपल्या मराठीतले डॅम इट यांचे सिनेमा सहसा परदेशी चित्रपटांवर आधारित असतात. What Women Want या मेल गिब्सन - हेलेन हंट यांच्या सिनेमावरून मराठीत एक सिनेमाही आला होता. अशी आणखीही उदाहरणे असतील याची खात्री आहे.

आपल्याकडे मूळ चित्रपटाचा श्रेयनामावलीत उल्लेख करण्याची पण पद्धत नाही. अलीकडचा अपवाद ह्रतिक रोशनच्या बॅंग बॅंगचा.

या लोकांच्या मुलाखतीत मूळ गोष्ट चोरल्याचा उल्लेख आपल्याकडून चुकूनही होऊ नये म्हणून प्रयत्न करताना चेह-यावर उसने हसू आणणारे आणि मुलाखतीदरम्यान ते कायम ठेवणारे सिनेपत्रकार किती धन्य. उलट जेव्हा हे लोक ती कथा त्यांना कशी 'सुचली' याची खमंग कहाणी या पत्रकारांना ऐकवतात तेव्हा तर त्यांच्या अभिनयाची खरोखर कमाल वाटते. या पत्रकारांनाही ही गोष्ट कुठल्याशा सिनेमाशी मिळते जुळते असे अप्रत्यक्षपणेही सुचवावेसे वाटत नाही. सारे कसे गुडी-गुडी.

मागे नारबाची वाडी या सिनेमाच्या कथानकाचे मला हिचकॉकने सादर केलेल्या एका लघुपटाशी साम्य वाटले होते, पण नंतर कळले की ते एका बंगाली नाटकावर आधारीत आहे. म्हणजे तर आणखी सस्पेन्स! पण हा विषय वेगळा.

असे वाटते की अशा कलाकारांच्या व अशा सिनेपत्रकारांच्या ऑफस्क्रिन अभिनयासाठीदेखील एखादे पारितोषिक जाहीर करायला हवे.

३) एव्हरेस्ट नावाचा अलीकडेच आलेला (अर्थात) इंग्रजी सिनेमा. १९९६मधील सत्यघटनेवर आधारित. न्यूझीलंडचा एक गिर्यारोहक माउंट एव्हरेस्टवर मोहिमा घेऊन जात असतो. त्याच्याबरोबर एक अमेरिकनही असतो. तेथे अचानक आलेल्या हिमवादळामुळे ती मोहिम फसते व मोहिमेच्या सुत्रधारासह अनेकजण मृत्युमुखी पडतात. वादळामुळे त्यांच्यातल्या काही जणांपर्यंत मदत पोहोचू शकत नाही. त्यांच्यातला हा अमेरिकी हालचाल करण्याचे सामर्थ्य नसलेल्या अवस्थेत बर्फात पालथा पडतो. दुस-या दिवशी परिस्थिती निवळल्यावर स्वत: काही अंतर चालत येऊन आपल्या उर्वरित सहका-यांपर्यंत पोहोचतो. परंतु रात्रभर बर्फाच्या थेट संपर्कात राहिल्यामुळे म्हणजे फ्रॉस्टबाइटमुळे त्याचे नाक शब्दश: कापावे लागते.

ही सत्यकथा असल्यामुळे उल्लेख केला. संदर्भ लान्स नायक हणमंतप्पाचा. सतत पाच-सहा दिवस शरीर उणे चाळीस तापमानात राहिल्यानंतर शरीराचे काय होत असेल? पंचवीस फूट बर्फाची भिंत अंगावर असताना कदाचित हालचाल करणेही शक्य झाले नसेल. श्वास घेणेच अशक्य झाले असेल. कधी हरपली हे कळलेही नसेल. दुसरे कोणी असते तर कदाचित शोधमोहिमही थांबवली असती. परंतु लष्कराच्या दुर्दम्य प्रयत्नांनंतर शोधमोहिम चालू ठेवली गेली व तो सापडला. या शोधमोहिमेला यश मिळो वा न मिळो, पण लष्कराच्या या प्रयत्नांवरच मोठे प्रकरण होऊ शकेल. त्यावेळी तो शुद्धीत असणेही जवळजवळ अशक्य. केवळ धुगधुगी असणार. तेच महत्त्वाचे.

हणमंतप्पा, आपली काही ओळखपाळख नव्हती तरी का कोणास ठाऊक, खूप आशा वाटत होती. एरवी हलकटपणाची, नालायकपणाची परिसीमा गाठलेल्या या देशाने तुझ्यासाठी शक्य ते प्रयत्न केले. तुला कळावे यासाठी लिहितोय. की कदाचित तुमची काळजी घ्यायला तेथे लष्कर होते. अन्यथा आमच्याकडे बहुतेकवेळा रस्त्यावरच्या अपघाताच्यावेळीही रस्त्यावर बघेच अधिक असतात. तुमच्यासाठीच्या शोधमोहिमेत यश मिळणे जवळजवळ शक्य नव्हतेच. म्हणून लष्कराने तुम्हाला आधीच मृत घोषित केले होते.

तुझी दोरी सियाचेनमध्येच तुटायची होती. तुम्हा दहाही जणांची. तुमच्यापैकी कोणी तमीळ, कोणी मराठी, कोणी मल्याळी, तेलगु, तू कानडी. केवळ महिन्याकाठी मिळणा-या पगारापोटी तेथे उभे नव्हता, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.

शंभर मीटर बाय ऐंशी मीटर या आकाराची बर्फाची भिंत तुमच्या दिशेने येत असतानाच तुम्हाला तुमच्यापुढच्या संकटाची जाणीव झाली असेल. कदाचित तेथेच तुम्ही यातून बाहेर पडू शकणार नाही याचीही जाणीव झाली असेल. तुम्ही या आसमानी संकटाचा सामना कसा केला असेल हे कळणेही आता शक्य नाही. कदाचित तो पाकिस्तानी शत्रू परवडला परंतु हे संकट नको असे तुम्हाला व तुमच्या जीवित सहका-यांना नेहमीच वाटत आले असेल.

तरीही आता युद्ध चालू नसतानाही आम्ही तेथे का जावे असे प्रश्न तुम्ही कोणी विचारत नाही आणि हेच तुमच्या धैर्याचे लक्षण आहे. त्या धैर्याला सलाम.

बाकी आज उद्या तुमच्या शवपेट्या तुमच्या गावांना रवाना होतील. गावे शोकाकूल होतील, पण तुम्ही नक्की कोणासाठी व कशासाठी प्राणत्याग केलात हे या देशवासियांना कळेल का? तुम्ही तुमचे कर्तव्य बजावलेत, आता आम्हीही आमची नागरी कर्तव्ये बजावू ही भावना आमच्यात जागी होईल का, हा प्रश्न पडतो.

आजवर तरी हे झालेले दिसलेले नाही. दुर्दैवाने.

४) ग्रॅव्हिटेशनल वेव्हज – क्रांतिकारक शोधाची आज झालेली घोषणा

मागे हिग्ज बोजॉन उर्फ गॉड्स पार्टिकलचा शोध लागल्यानंतर आपल्याकडच्या माठ टीव्ही माध्यमांनी विविध धर्मांच्या प्रतिनिधींना बोलावून काथ्याकूट केला. यांना कशासाठी? तर या कणांना गॉड पार्टिकल असे नाव दिले गेले. या धर्मांच्या प्रतिनिधींनी जणू आजवर माहित नसलेला देवाचा अंशच सापडला अशा थाटात बडबड केली.

आपल्याकडे नारायणगावजवळ खोडद येथे प्रचंड मोठ्या रेडियो दुर्बिणी आहेत. काहीजण मोठ्या उत्साहाने तेथे जातात आणि दुर्बिणींच्याऐवजी तेथे मोठमोठ्या डिश आहेत हे पाहिल्यावर त्यांचा अपेक्षाभंग होतो. आपल्याकडची शास्त्रीय जाणीव इतकी मागासलेली आहे.

आताचा हा शोध म्हणजे आइनस्टाइननी जवळजवळ शंभर वर्षांपूर्वी ग्रॅव्हिटेशनल लहरींच्या अस्तित्वाबद्दल जे भाकित केले होते त्याची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली आहे. त्याचे पुरावे मिळाले आहेत. या ग्रॅव्हिटेशनल लहरी या प्रकाशापेक्षा अधिक किंवा तेवढ्याच वेगाने प्रवास करतात हेही कळले आहे. आइनस्टाइन कोठे चुकलाच असेल, तर या लहरी फारच क्षीण असल्यामुळे त्यांचे अस्तित्व मोजता येणार नाही, असे त्याने सांगितले होते. प्रत्यक्षात या लहरीचे अस्तित्व शोधता आले.

हा विषय मुळात क्लिष्ट आहे. त्यांचा कृष्णविवरांशी संबंध आहे, त्यामुळे बिग बॅंगचे भाकित कमकुवत होऊ शकेल इतका हा शोध महत्त्वाचा आहे. विश्वाच्या उत्पत्तीबद्दलचे, ब्रह्मांडाचे ज्ञान मिळण्यासाठी नव्याने कवाडे उघडतील, अशा शक्यता यामुळे निर्माण झाल्या आहेत.

हा शोध म्हणजे यात सहभागी असणा-यांचे नोबेल पारितोषिक निश्चित आहे असेही म्हटले जात आहे.

हा विषय सोप्यात सोप्या पद्धतीने समजावा यासाठी मी युट्युबवरील दोन व्हिडियोची लिंक दिलेली आहे. ते जरूर पहा. आगामी काळात हा विषय आणखी सोपा होऊन जनसामान्यांपर्यंत येईल व शालेय अभ्यासक्रमातही समाविष्ट होईल. आपल्या दोनवेळच्या जेवणावर याने काही फरक पडणार आहे का असा जर कोणाचा प्रश्न असेल, तर तूर्त तरी त्याचे उत्तर ‘नाही’ असे आहे.

https://www.youtube.com/watch?v=4GbWfNHtHRg

https://www.youtube.com/watch?v=PCxOEyyzmvQ

#फुसके_बार

#Phusake_bar

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलेय.

बाकी आज उद्या तुमच्या शवपेट्या तुमच्या गावांना रवाना होतील. गावे शोकाकूल होतील, पण तुम्ही नक्की कोणासाठी व कशासाठी प्राणत्याग केलात हे या देशवासियांना कळेल का? तुम्ही तुमचे कर्तव्य बजावलेत, आता आम्हीही आमची नागरी कर्तव्ये बजावू ही भावना आमच्यात जागी होईल का, हा प्रश्न पडतो. +१०००

शंभर मीटर बाय ऐंशी मीटर या आकाराची बर्फाची भिंत तुमच्या दिशेने येत असतानाच तुम्हाला तुमच्यापुढच्या संकटाची जाणीव झाली असेल. कदाचित तेथेच तुम्ही यातून बाहेर पडू शकणार नाही याचीही जाणीव झाली असेल. तुम्ही या आसमानी संकटाचा सामना कसा केला असेल हे कळणेही आता शक्य नाही. कदाचित तो पाकिस्तानी शत्रू परवडला परंतु हे संकट नको असे तुम्हाला व तुमच्या जीवित सहका-यांना नेहमीच वाटत आले असेल.

तरीही आता युद्ध चालू नसतानाही आम्ही तेथे का जावे असे प्रश्न तुम्ही कोणी विचारत नाही आणि हेच तुमच्या धैर्याचे लक्षण आहे. त्या धैर्याला सलाम.

बाकी आज उद्या तुमच्या शवपेट्या तुमच्या गावांना रवाना होतील. गावे शोकाकूल होतील, पण तुम्ही नक्की कोणासाठी व कशासाठी प्राणत्याग केलात हे या देशवासियांना कळेल का? तुम्ही तुमचे कर्तव्य बजावलेत, आता आम्हीही आमची नागरी कर्तव्ये बजावू ही भावना आमच्यात जागी होईल का, हा प्रश्न पडतो.

>>> अगदी खरय. संपूर्ण पॅरा +११११

हणमंतप्पा तुम्हाला मानवंदना !

पुष्पचक्रे वाहुन तुमच्या कुटुंबियांवर आलेले संकट दुर होणार नाही. सरकार तुमच्या कुटुंबियासाठी कदाचित ऑउट ऑफ द वे जाऊन काही करेल.

या दोन दिवसात समजले की सारे देशवासीय तुम्ही जगाल अशी आशा धरुन होते.

तुमच्या हॉस्पीटलच्या बाहेर काही माणसे आपली किडनी/ लिव्हर जीवंतपणी द्यायला तयार होते.

कारण देशाच्या रक्षणासाठी तुम्ही मरण पत्करायला तयार होतात.

ही भारतीय माणसे नक्की तुमच्या कुटुंबियांना आधार आणि सन्मान देतील.

मरताना तुमची हीच अपेक्षा असेल ना ?

हो ! तुमची आणखीही अपेक्षा असेल. भारताच्या सीमा अखंड रहाव्यात. जे एन यु मध्ये घोषणा देणार्‍या वाट चुकलेल्या मुलांना समजाव. आजादी इथेच आहे. भारता सोबत रहाण्यातच आजादी आहे.

हणमन्त अप्पाना श्रद्धान्जली. काय लिहावे हेच कळत नव्हते, पण राकुनी योग्य शब्दात भावन्या मान्डल्या. आता त्यान्च्या कुटुम्बीयान्ची काळजी घेणे हीच खरी मानवन्दना ठरेल. नाहीतर सैनिकान्च्या कुटुम्बाना पण बरेच वेळा लाल फितीमुळे बरेच काही सोसावे लागते.

राकु अफ़्रिकेत काही बेरी मिळतात अस ऐकल आहे. ज्या खाल्ल्या नंतर सगळ्या पदार्थांची चव गोड लागते. खर खोट माहित नाही.

(हे फ़ॅंटम च्या कॉमिक मधे वाचलेल नाही , नाहीतर ओल्ड जंगल सेइंग वाटेल तुम्हा.ला)