निराशा केवढी झाली तुझी

Submitted by जयदीप. on 10 February, 2016 - 13:23

किती आहोत आपण वाकलो
कुठे आहोत नक्की चाललो

बरे झाले नकाशा हरवला
इथे नसतोच बहुधा पोचलो

किती हा डाव होता रंगला
कमी वेळात असतो जिंकलो

मला तारीख नाही आठवत
कधी होतो मला मी भेटलो

कसे होते मला बोलायचे
कशाला वाटले ते बोललो

निराशा केवढी झाली तुझी
तुला मी कोण होतो वाटलो

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users