लेट इट स्नो

Submitted by विद्या भुतकर on 5 February, 2016 - 16:06

आज बाहेर मस्त स्नो पडतोय मी आणि संदीप घरून काम करत आहे आणि सानूला शाळेला सुट्टी आहे. शिकागोला पहिल्यांदा मी स्नो पाहिला तेव्हा खूप हरकले होते आणि काकडलेही. कापसासारखा अलगद जमिनीवर येणारा स्नो बघण्याचा अनुभव वेगळाच. गेल्या १० वर्षात कित्येक वेळा तो असा पडणारा बर्फ पाहिलाय पण प्रत्येक वेळी नव्याने दिसतो. जसं प्रत्येक वर्षी पहिल्या पावसात होतं ना तसं. थोडा थोडा करत बर्फ जमा होतो आणि मग सर्व दृश्य पालटते. रस्ता शुभ्र होतो. वाळलेल्या झाडांच्या फांद्या बर्फ जमा करू लागतात आणि बर्फाची फुलंच जणू झाडाला आलीत असं वाटायला लागतं.

आपल्या पावसासारखा तो बरसत नाही आणि आवाजही करत नाही. पडत राहतो शांतपणे आणि अगदी जोरात असला तरीही आवाज होत नाही जरासाही. दिवसभर घरात बसावं आणि त्याच्याकडे पाहावं खिडकीमधून. काहीतरी गरम गरम खावं आणि एखादं पुस्तकही वाचावं. असे बरेच साधर्म्य वाटतं पाऊस आणि बर्फात पण तेव्हढेच परकेपणही. कितीही छान वाटलं तरी बाहेर पडावसं वाटत नाही त्या सुंदर बर्फात. वाटत नाही की चिंब भिजावं आणि कुणालातरी आठवावं. मुलांना बर्फात खेळायला मजा येते, ते जातात दोघेही बर्फाच्या ढिगात खेळायला. मी मात्र घरातूनच पाहत राहते परक्यासारखं.

शिकागो मध्ये असताना ही कविता केली होती गम्मत म्हणून. आज इथे पोस्ट करतेय.

सूर्य !!

चारीबाजूला बर्फच बर्फ
आणि मनावर त्याचा थंडपणा
एकटं असल्याची जाणीव करून देतात
या परदेशात..उगाचच...
पूर्ण बंद होऊन चाललेले लोक,
आपल्यातले असले तरी
ओळख देत नाहीत...

तू ही पहिल्यासारखा येत नाहीस
ऊब द्यायला,
माझ्या गालावर टिचकी देऊन उठवायला...
आणि आलास तरी थांबतोस कुठे
मी घरी येईपर्यंत?

वाटतं आज नाही आलास,
उद्या येशील,
थोडसं हसू,थोडी उब देऊन जाशील...
उद्याही नसलास की
सर्व थंड वाटतं... अजूनच...

मागच्या वर्षी सोबत घालवलेले क्षण
आठवत राहतात
त्यांचीच काय ती साथ आता
तू पुन्हा येईपर्यंत.....
कदाचित मार्च, कदाचित एप्रिलपर्य़ंत??

-विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्फाचा पाऊस.. अनुभव नाही काही पण कदाचित हिच भावना माझीपन असेल अस वाटतयं..
आम्हाला काय फक्त गारा दिसतात अन त्याही फारश्या प्रेमळ नाही.. तेवढ्यातही त्या गोळा करुन माणसी एक तरी तोंडात टाकायला मिळावी याची धडपड असते..
बाकी बाहेर पाऊस अन आत हाती वाफाळता चहा आणि नव कोर पुस्तक हि माझी सुखी आयुष्याची व्याख्या.. यापेक्षा जास्त रोमान्स मला कशातच आढळणार नाही Wink .. आता पावसासाठी झुरण आलं Sad

विद्या जी
थोडक्याच, मोजक्याच सुंदर शब्दात भावना व्यक्त केल्यात. स्वतः अनुभवल्याची जाणिव झाली.

>>वाटतं आज नाही आलास,
उद्या येशील,
थोडसं हसू,थोडी उब देऊन जाशील...
उद्याही नसलास की
सर्व थंड वाटतं... अजूनच...>>
असेच सुंदर लिहित रहा. माझ्या १९८५ सालच्या मिशिगन वास्तव्याची , तिही डिसेम्बर मधील हिमपातातील गणित आठ्वड्यांची आठवण करून दिलीत. माझ्या भावना तुम्ही शब्दात अलगद पकडल्यात . सुंदरच !!!!!

वाचल्याबद्दल धन्यवाद आणि कमेन्ट्बद्दलही. Happy प्रत्येकवेळी स्नो पडला की हे लिहावस वाटत. आज लिहिल गेल. Happy

विद्या.