कशाला आपली चिंता उभी दारात माझ्या

Submitted by जयदीप. on 29 January, 2016 - 14:31

कशाला आपली चिंता उभी दारात माझ्या
तसेही काय आहे राहिले हातात माझ्या

कसे सगळेच रस्ते सारखे दिसतात इथले
कसा राहील हा रस्ता पुढे लक्षात माझ्या

नको उघडून पाहू सर्व दारे तू कधीही
नसावा एकही कप्पा तुझा हृदयात माझ्या

पुन्हा शब्दात आहे मांडले मी तेच सगळे
कधीही वाचले नाहीस जे डोळ्यात माझ्या

कधीपासून माझे काम आहे रखडलेले
पुरे ढवळाढवळ आता तुझी कामात माझ्या

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>पुन्हा शब्दात आहे मांडले मी तेच सगळे
कधीही वाचले नाहीस जे डोळ्यात माझ्या>>> व्वा...मस्त!

लक्षात आणि कामात...हे शेरही आवडले!