थोडंस मनातलं...

Submitted by लाडू on 24 January, 2016 - 21:51

प्रिय ‘तू’ ला,
आज म्हटलं चल एक पत्र लिहू तुला. कस वाटतंय पाहू. तशी मी फार obessed आहे प्रेमपत्र वैगरे बद्दल. पूर्वीच्या कथा, कादंबऱ्या, कोणाचे अनुभव, किंवा चित्रपटामधूनसुद्धा असे उल्लेख आले कि शहारून येत. कोणी कोणासाठी गुलाबी कागद वैगरे घेऊन, इतकं छान छान विशेषणे वापरून लिहित असेल तर ते आयुष्यभरासाठी कोणीही जपून ठेवेलच ना. (ते मग कोणाला सापडलं कि वाजलेच बारा.. अस काहीतरी सांगून माझा रोमांटिक मूड प्लीज खराब करू नकोस. मी प्रेमपत्र लिहायच्या सॉल्लीड मूड मध्ये आहे) तू मला हे असलं कधीही काहीही दिलेलं नाहीस याचा प्रचंड राग तर आहेच. पण आता मी लिहितेय ना, तर शांतपणे वाचायचं. (आणि जपूनही ठेवायचं, मी म्हातारी झाल्यावर विचारेनच). तर प्रेमपत्र लिहायचेच हे नक्की झाल्यावर प्रश्न येतो गुलाबी कागदाचा. हो आणि तो हवाच. ठीकाय त्याच नंतर बघेन मी. (गुलाबी कागदावर प्रिंट कुठे काढून मिळेल?) आता पुढचा मुद्दा. काय लिहू? म्हणजे हा बऱ्यापैकी महत्वाचा मुद्दा आहे. खरच काय लिहू? दिवसभर लिहित तर असते तुलाच. म्हणजे पत्र नाही. पण whatsapp असतच ना रे. काय वाटलं कि लिहील आणि केलं send. किती सोप्प. पण मग वाटल म्हणून लिहील love you किंवा miss you अस इतक्यांदा झालंय कि आता पत्रात काय वेगळ लिहू? गुगल बाबा कि जय. थांब आलेच जरा टिप्स घेवून. पण काय इथे फक्त साचे दिलेयत. ते काय करू? पत्र मी लिहतेय, त्यात माझ्या भावना हव्यात. आणि तुला वाचताना माझी आठवण आली पाहिजे. तीही रोमांटिक पद्धतीने, नाहीतर हे काय लिहिलंय, ROFL म्हणून हसत राहशील. आणि मला माहितेय या पत्राचा रिप्लाय (पत्र लिहून पूर्ण झालं आणि तुला मिळालं तर.) तू मला whatsapp वरच देणार आहेस. तोही प्रत्येक अक्षरावर खर्च कराव लागणार असल्याप्रमाणे चिंगूस. आवडलं, एवढचं. (तुला मी लिहिलेलं सगळचं आवडत? कि मी लिहिलंय म्हणून आवडत? काहीही असो. पण तू अस म्हटल्यावर चांगल वाटत एवढ खर. आणि तेवढच पुरेस असत आपल्या दोघांना.) तू पण लिही ना मला या पत्राच उत्तर. मग मी अजून एक लिहेन, मग तू. आणि मग खूप पत्र जमतील आपल्याकडे. आठवणींचा खजिना. म्हातारे झाल्यावर आठवायला. किती गमतीशीर आहे हि कल्पना. पण मला हव्या आहेत लिखित स्वरूपातल्या आठवणी (फक्त चॉकलेट्सचे कागद किती दिवस जमवू?). पूर्वीच्या पिढीच किती बर होत, पत्राशिवाय काही पर्यायच नव्हता भावना सुरक्षितपणे दुसऱ्यापर्यंत पोहचवायचा. म्हणजे तोंडावर प्रपोज करण्याची डेअरिंग केली तर कानाखाली तारे काढणार समोरची मुलगी, आणि हि भीती असूनही प्रपोज करायचं ते मुलानेच. आणि आता किती बदललय सगळ. भावना तुझ्यापर्यंत पोहचवायचा निर्णय माझा आणि तरीही त्या भावना सुरक्षितपणे पोहचवताना (संभाव्य कानाखाली तारे प्रकरणाचा धोका असल्याने) मी घेतलेला शॉर्ट मेसेज सर्वीसचा आधार. तुझ्या होकारानंतर तो SMS जपण्यासाठी केलेली धडपड, त्यासाठी चक्क दोन वर्ष न बदललेला मोबाईल, आणि तरीही तो बिघडला तेव्हा SMS कायमस्वरूपी नष्ट झाल्याने आलेला हताशपणा, मग मी रडून घातलेला धुमाकूळ आणि सावरणारा तू. कसली बावळट आहे मी (ए.. आठवत का तुला मी काय काय बावळट लिहील होत त्या SMS मध्ये ते? आठवत असेल तर प्लीज तुझ्या पत्रात येऊ दे ते. )

आता मुद्द्याचं, मी तुला पत्र का लिहितेय? असच. कारण लिहावसं वाटतय. खूप दिवस भांडलो नाही ना आपण? कसलं मस्त वाटतंय. सगळ पूर्वीसारखं. म्हणजे अगदी जेव्हा आपण नुकतंच प्रेमात पडलो होतो. कसले धमाल दिवस होते. पूर्ण धुंदीचे. फक्त कॉलेज आणि प्रेम. एका कॉलेजात नव्हतो म्हणून काय झालं? रोज भेटत नसलो म्हणून काय झालं? जेव्हा भेटायचो तेव्हा फार छान वाटायचं. आणि भेटून घरी गेल्यावर पुन्हा कधी भेटायचं त्याच कॅल्क्युलेशन सुरु. मधल्या उरलेल्या दिवसांत फोन आणि sms होतेच. तुझ्यापासून disconnected कधी वाटलच नाही मला. कधीही काहीही बोलावस वाटल कि तुला कॉल. मग अर्धा तासाची निश्चिंती. रोजचा संध्याकाळचा ठरलेला कॉल टायमिंग,रात्रीचा मेसेज टायमिंग. रात्र रात्र जागून मारलेल्या गप्पा, विषय नसताना उगाच मेसेजेस वर खेळलेल्या गाण्याच्या भेंड्या सगळच झकास. पण त्याचबरोबर दोघांच्याही परीक्षा किंवा सबमिशन्स असताना एकमेकांना डिस्टर्ब न करता अभ्यास करण आणि तरीही आपल्या बरोबर अजून कोणीतरी जागून अभ्यास करतंय हि छान फीलींग. किंवा कधी तू फक्त माझ्यासाठी जागा असायचास मी झोपेपर्यंत, उगाच. आणि मी झोपतेय असा मेसेज केल्यावरच good night म्हणून झोपायचास. मग आपल्यासाठी अजून कोणीतरी उगाच जाग आहे अस खूप स्पेशल वाटणारं काहीतरी मनाला गुदगुदल्या करून जायचं. (खरच का असायचास तू जागा? मी तुझ्यासाठी नसते करू शकले कदाचित एवढ.)

पुढच्या वर्षी कॉलेजच्या वेळा बदलल्या तसं संध्याकाळी भेटण अवघड होऊ लागलं. मग आपण चक्क सकाळी ६.३० ला अंधेरी स्टेशनला भेटायचो म्हणजे वेडेपणाची हद्द होती ती. पण कॉलेज न बुडवता भेटण फक्त तेव्हाच पॉसिबल होत यावर तू नेहमीच ठाम होतास. नाहीतर मी कधी कॉलेजला गेलेच नसते बहुधा. वर्षाच्या शेवटीही मला नाही येत ८०८५ ची programming अस म्हणत मी आता पासच नाही होणार वैगरे बोलायला सुरवात केली होती तेव्हा तू मला भेटण्याच्या वेळांमध्ये बाकी गप्पा बंद करून programmingचे धडे द्यायला सुरवात केलीस, ते हि इतकं सुंदर कि मी त्या विषयात highest येऊ शकले? तुला एक गम्मत सांगू का? आज मी इतरांना शिकवते ना हेच सगळ तेव्हा फक्त तू आठवत असतोस, तुझी सगळीच वाक्य, रिअल लाइफ एक्झाम्पल्स सगळच आठवत राहत आणि बऱ्याचदा तू दिलेलीच उदाहरण देते मी विद्यार्थ्यांना सुद्धा.

टीन एज रीलेशन जास्त काळ टिकत नाही अस ऐकलंय. जे बऱ्याचदा शारीरीक आकर्षणातून निर्माण होत असत. आपल अस कधीच नव्हत नाही का? पहिल्या दिवसापासून आपण एकमेकांकडे आयुष्याचा जोडीदार म्हणून पाहत होतो. प्रिसाईजली म्हणायचं झालं तर हे नात जपायला तू खूप मेहनत घेतलीस. नाहीतर माझं काय ? नात कधी टिकवाव लागत किंवा जाणीवपूर्वक जपाव लागत हेच मुळी मला कधी पटल नाही. तू माझा आहेस आणि घेशील मला सांभाळून हे खोल कुठेतरी माहित होत. आणि तू ते केलंसही. पण इतकं केअरफ्री राहताना तुला काय वाटत असेल किंवा मी तुला किती सांभाळून घ्याव याचा कधी विचारच नाही करावासा वाटला. मनात येईल तेव्हा शुल्लक गोष्टींवरून भांडत राहिले आणि तरीही भांडणाच्या शेवटी तू मला समजून घ्यावस हा माझा अधिकार असल्यासारखं जगत राहिले. खरच कसं सांभाळलस माझ्यातल्या छोट्या उनाड मुलीला? जॉब वैगरे आयुष्याच्या रहाटगाडग्यात अडकून गेल्यावरही आणि अगदी माझ्यापासून लांबच्या शहरात गेल्यावरही (आधी अगदी हाकेच्या अंतरावर राहायचास) मला शनिवारी भेटायला यायचं प्रॉमिस कायम पाळलस (जेव्हा नाही जमल तुला, तेव्हा तेव्हा मी भांडण केलीच आहेत तर ते settaled down)

आणि मग सगळ्यात वाईट होत ते गेलं वर्ष. कित्ती कित्ती भांडलेय मी गेल्या वर्षात? पण हा या वेळी भांडणाचे विषय बऱ्याचदा खूप गंभीर होते. आपण लग्नाच्या निर्णयापर्यंत आलो होतो आणि विचारांचा गुंता इथेच झाला होता. म्हणजे लग्न कराव कि करू नये हा प्रोब्लेमच नव्हता पण अचानक थोडी भीती वाटू लागली. अर्थातच ही भीती होती इतक्या जवळ येऊन तू कधी दुरावणार तर नाही ना याची. ही भीती होती इतका हवाहवासा वाटणारा तू पुढे जाऊन बदलणार तर नाही ना याची. ही भीती होती आपल्या नात्यामध्ये बाकीच्या नात्यांमुळे फरक तर नाही पडणार ना याची. आणि ही भीती होती लग्नामुळे निर्माण होणाऱ्या नवीन आणि अनोळखी नात्यांमुळे मीच माझ्यातून आणि तुझ्यापासून हरवणार नाही ना याचीही. पण यातलं काहीच बोलता न आल्याने आलेला ताण. नेमकं काय बोलू हे न कळल्याने गोंधळून जाऊन प्रत्यक्ष बोलले गेलेले आणि तुला बोचलेले शब्द. त्यातून झालेले निरर्थक वाद या सगळ्यातून माझी भीती खरी ठरत गेली आणि तुझ्यापासून आणखी दूर जात असल्याची जाणीव मात्र बळावत गेली उगाच. त्यातून होणारी चिडचिड, आतापर्यंत तुला सगळ सांगायची सवय असल्याने आणि यातलं काहीच सांगू न शकल्याने झालेली घुसमट सगळचं एका दु:स्वप्नासारखं वाटत राहिलं. पण या पूर्ण वर्षात हे नात इथे संपवावं अस बऱ्याचदा प्रकर्षाने वाटूनही सुदैवाने तसं काही झालं नाही. या सगळ्यातही कायम माझ्या बाजूने विचार करत होतास तू. मी अचानक का भांडतेय आणि तुझ नेमकं काय चुकतय याचा विचार करत स्वत:ला दोष देत राहिलास तू. कसला भारी आहेस तू. म्हणूनच आवडतोस. इतक्या सहज नाही सोडणार तुला. तू मला हवा आहेस कायमच. असाच माझ्यासोबत प्रत्येक क्षणाला. आणि तू असशीलच हा अति फाजील आत्मविश्वास आहेच माझ्याकडे.

तू तसा कायमच असतोस रे मला समजून घेत, मला समजावत, कसलीच अपेक्षा न करता. आणि मला हि तसाच आवडतोस. पण कधी कधी वाटत कि का करतोस तू? किंबहुना का करावस? ज्या हक्काने मी पाहते तुझ्याकडे, जसं डिमांड्स करते तसं तू का नाही करत? तुझ्या डिमांड्स नसतातच का? कि मला वाईट वाटेल म्हणून फक्त तू तुझ्या अपेक्षा कधी व्यक्तच नाही करत? पण खर सांगू का? त्यामुळे मग वाईट वाटत कधी कधी. मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नसल्याची जाणीव होते. किंवा मग तुझ्या अपेक्षा कधी माझ्यापर्यंत पोहचतच नसतील अशी वाटत राहत. आता अस जे वाटतय ते तुला स्पष्टपणे सांगण्यातही माझ्याच अपेक्षा आहेत अस वाटेल तुला कदाचित. पण जाणवत राहत कि तु माझ्याकडे पूर्ण व्यक्त होत नाहीस किंवा मी तुला समजून घेण्यात कमी पडते. पण जे काही असेल तरी तू बेस्टच आहेस. मी तुला तू असं का तसं का अस हजारो वेळा विचारूनही मला मी आहे तशी स्वीकारणारा तू फक्त माझा बेस्टी आहेस. जिवलग वैगरे म्हणतात ना अगदी तसा. प्रेमपत्र म्हणता म्हणता तक्रारपत्र नाही ना झालं?

बर आता डिमांड करतेच आहे तर अजून एक शेवटच (hope you don’t mind ); आपलं नात खूप जुन आणि परिपक्व वैगरे असलं ना तरी अति practical होण आणि गंभीरपणे विचार करण थोडं कमी करूया का आपण? बाकीच्या कपल्सकडे पाहून अस वाटत कि अस वागून आपण नात्यामधली एन्जॉयमेंटच संपवतो आहोत. आपल्या नात्याचा नवेपणा संपलाय का रे? सगळ रुटीन सेट होत चाललय का रे? लग्नाच्या नात्यात बांधले जाताना आपलं गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड असण संपून जाईल का? तस झालेलं नाही आवडणार ना मला. स्वप्नात जगू नये अस म्हणतोस तू पण तरीही स्वप्नात जगायचं नसलं तरी स्वप्न पाहायला कायमच आवडेल मला तुझ्यासोबत.

.आता या नवीन वर्षात आपण पुन्हा पूर्वीसारखे झालोय अस मला वाटतंय. होपफूली याच वर्षी लग्नही करतोय. (हो ना?). soo लग्नाआधीच्या तुझ्या शेवटच्या वाढदिवशी तुला आणि मला खूप खूप शुभेच्छा आणि गोड गोड पापा

कायम तुझीच असणारी,

मी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

khupch chan lihilel ahe....khupch majja ali vachtana....ajun nvin ashech katha kra na