सायकल राईड - तापोळा - भाग २ (समाप्त)

Submitted by मनोज. on 23 January, 2016 - 08:00

...नंतर एका शेकोटीजवळ शेकत शेकत जेवण आवरले व रात्री तिथल्या सगळ्या टूरिस्ट सोबत १२ वाजेपर्यंत अंताक्षरी खेळत दिवस संपला

सकाळी कडाक्याच्या थंडीत जाग आली. सगळा परिसर धुक्याची दुलई पांघरून झोपी गेला होता. सुर्योदय होण्याआधी मी आवरले. थोड्या वेळात अमित आणि किरणही उठले व आवरू लागले.

काल जेवताना व नंतरही आमचे बरेच वेगवेगळे प्लॅन्स ठरत होते व रद्द होते. तापोळा-बामणोली-सातारा-पुणे असे जायचे की पुन्हा महाबळेश्वर-पुणे करायचे वगैरे चर्चा झाल्या होत्या. शेवटी सकाळी महाबळेश्वर-पुणे या रूटवर शिक्कामोर्तब झाले.

थंडीमुळे तेथील सगळे लोक्स आणि यच्चयावत श्वानमहोदयही कोवळ्या उन्हामध्ये बसून थंडीचा सामना करत होते.

.

पोहे, उपमा वगैरे नाष्टा आवरला आणि सायकलींच्या तयारीला लागलो. बॅगा सायकलींना अडकवणे, हवा भरणे, आणि सहप्रवाशांनी उत्साहाने सायकलशी खेळ करून बिघडवलेले सेटींग सरळ करण्यात थोडा वेळ गेला. नंतर आमचे एक फोटो सेशन झाले व आम्ही बाहेर पडलो.

आज निघायला बराच उशीर झाला होता आणि उन्हाचा तडाखाही जाणवत होता. काल रात्री किर्रर्र अंधारात पार केलेला रस्ता किती खराब होता आणि रस्त्याशेजारी असलेले ओहोळ, खोल खड्डे आज बघून "आपण हा रस्ता काल इतक्या बिन्धास्तपणे कसा काय पार केला?" असेही प्रश्न पडत होते.

ही घ्या त्या रस्त्याची झलक..

..

थोड्या वेळात मागून येणार्‍या अमितच्या हाका ऐकू यायला लागल्या.

.

हाका ऐकून मी आणि किरण थांबलो, अमित आमच्यापर्यंत पोहोचला आणि म्हणाला की पुढचे टायर जड जात आहे. मग सायकलचे इन्स्पेक्शन सुरू झाले. लगेचच लक्षात आले की पुढचा ब्रेक आवळला गेला आहे आणि त्यामुळे ब्रेक लागूनच सायकल चालवली जात होती. बॅगांमधून स्क्रू ड्रायव्हर, अ‍ॅलन की वगैरे हत्यारे काढली व (अमितची शाळा घेत!) तिघांनी मिळून ब्रेक दुरूस्त केले. आता चढ सुरू झाला होता.

शेवटी एकदाचे ५/६ किमी चढ चढवून महाबळेश्वर रस्त्याला पोहोचलो. चढ + घाट + खराब रस्ता + ऊन असे टॉर्चर सुरू झाले होते.

पुन्हा थोडे अंतर चढून एका झाडाच्या आश्रयाला गेलो. आजच पुण्याला पोहोचूया असाही निर्णय झाला. घड्याळ १२ ची वेळ दाखवत होते, निघण्यात झालेला उशीर आणि सायकलची दुरूस्ती यामुळे आजचे वेळापत्रक कोलमडले होते. आता २० किमी चढ चढायचा होता.

कितीही विचार केला तरी आज पुणे गाठणे एकंदर अवघडच दिसत होते. मला १०/१२ किमी चढ चढवून खूप कंटाळा आला होता. याच गतीने महाबळेश्वर गाठू शकत होतो आणि पुण्यातही रात्री पोहोचलो असतो. लाईट्सची जय्यत तयारी होतीच मात्र कंटाळाही आला होता. मग सरळ मागून येणारी एक हौद्याची जीप थांबवली, तिनही सायकली त्यात टाकल्या व महाबळेश्वर गाठले.

हे जीपवाले मामा फुल्ल धतिंग होते. सर्वप्रथम पैसे घ्यायला नाही म्हणाले. मग "किती पैशे देणार हायसा.. द्या पाच हजार रूपये!!" असे डायलॉग टाकायला लागले. आम्ही बघू बघू करत ३०० रूपये ठरवले. तर महाबळेश्वरला पोहोचल्यानंतरही पैसे घेण्यास नकार दिला. आम्ही बळजबरीने पैसे त्यांच्या हातात कोंबले तर सायकली काढेपर्यंत एक मोठ्ठे फुटाण्यांचे पाकीट घेवून आमच्या हातात ठेवले, "न्ह्या खायाला" असेही सुनावले.

महाबळेश्वर रस्त्यावर मी त्या जीमपधून थोडा क्लिकक्लिकाट केला.

हिरव्या बोगद्यात..

...

त्या मामांना टाटा करून आंम्ही किरकोळ खरेदीकडे मोर्चा वळवला.

ड्रायफ्रूट लोणचे, वेगवेगळ्या जेली, चॉकलेट्सची खरेदी केली व पांचगणीमध्ये जेवूया असा निर्णय घेवून पांचगणीकडे कूच केले.

महाबळेश्वर पांचगणी रस्ताही निवांत आहे. थोडे चढ, थोडे उतार आणि हिरवाई. झक्कास मजा येते त्या रूटवरही.

यथावकाश पांचगणीला पोहोचलो. तेथे टोल वसूल करतात तेथे एक गुजराथी थाळीवाले हॉटेल आहे त्यांच्याकडे यथेच्छ थाळी चापली आणि थोडा वेळ विश्रांती घेतली.

विश्रांती आवरल्यानंतर पुढच्या प्रवासाच्या तयारीला लागलो असतानाच माझ्या सॅकने दगा दिला. सॅकचा पट्टा तुटून हातात आला आणि पुन्हा त्यामध्ये थोडा वेळ गेला. सॅक पुण्यापर्यंत कशी वागवत नेणार? त्यामुळे मी आता टेम्पो पकडतो आणि पुण्याला जातो असा विचार मांडताच अमित आणि किरणने भरपूर चेष्टा करत चल आता.. आम्ही सॅक घेतो.. तुला घरी जायचे आहे ते सांग.. तू सायकलीस्टच नाहीस वैग्रै वैग्रै इमोशनल ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली पण मे निर्णय बदलण्याचा विचारही केला नाही. Happy

मी सॅक कशीबशी पाठीला बांधली आणि आम्ही पसरणी घाट उतरण्यास सुरूवात केली. पांचगणी ते वाई फक्त उतार आहे.. ..आणि सायकलवर उतार उतरण्यास भन्नाट मजा येते.

वाईला उतरलो आणि न थांबता सुरूर फाट्याकडे कूच केले. मला सॅकचा भरोवसा वाटत नव्हता. "तात्पुरता बांधलेला पट्टा कधी सुटेल आणि कधी सॅक पाठीवरून पडेल" अशा अवस्थेत मी सायकल चालवत होतो.

शेवटी सुरूर फाटा दोन/तीन किमी राहिला असताना मी एक टेम्पो थांबवला व (अमित किरणला टाटा करून!!) पुणे गाठले. Happy

मी राईड निम्मी सोडली असली तरी किरण आणि अमित सायकल चालवतच होते.. पुढचा वृत्तांत किरणच्याच शब्दात..

कालच्या रात्रीची पुर्ण झोप आणि पाचगणीला हादडलेली गुजराती थाळी यामुळे आम्ही अजूनही ताजेतवाने होतो, वाई ते सुरुर रस्ता सायकलींगसाठी खरंच खूप छान आहे, रस्त्याच्या दुतर्फा असणारी गर्द झाडी, एकूणच रस्ता रुंदीला पुरेसा असल्याने ये जा करणारी वाहनेही शिस्तीत जात असतात. ऊसाचा रस उपलब्ध करुन देणारी दूकाने आणि मुळातच घराकडे परतायची असलेली ओढ यामुळे वाई ते सुरुर फाटा हे ११ किमीचे अंतर आम्ही आमच्या सरासरी वेगाने ४० मिनीटात कापले. हायवे लागताच पाण्याच्या बाटल्या पुन्हा भरल्या आणि पुढचा प्रवास सुरु केला सूरुर पर्यंत याआधीही काही सायकल राईड केल्या होत्या त्यामुळे तेथून पुण्यापर्यंतचा रस्ता हा अगदी घराजवळचा वाटू लागला. एव्हाना संध्याकाळचे ५ वाजत आले होते. "अंधाराच्या आत जास्तीत जास्त अंतर कापायचे" असे ठरवून जरा पायावर जोर वाढविला.
सुरुर च्या पुढे आलो, खंबाटकी बोगद्यात लाईट्स होत्या त्यामुळे बरे वाटले नाहीतर तेवढ्यासाठी बॅगेतून हेडलाईट काढून बसवाव्या लागल्या असत्या. सीट्खालचा ब्लींकर चालू करुन बोगदा ओलांडला आणि मग निवांत पॅडेल न मारताच खंडाळा गाठले. खंबाटकीचा उतार.. नेहमी हवाहवासा वाटणारा. वार्‍याचा प्रवाह विरुद्ध दिशेने असल्याने घामेजलेल्या अंगाचा भार हलका होत गेला पुढे आम्हीही आमचा वेग वाढविला आणि चालता बोलता शिरवळही पार पडले व कापूरहोळ गाठले. सुर्यनारायणाने रजा घेतल्याने हेडलाईट्स चढविल्या आणि माझ्या लक्षात आले कि हेडलाईट अडकावयाचा रबर बँड हरवला आहे. आता अंधारात कुठे शोधायचा, रस्त्यावर पडलेल्या एका दोरीने बांधण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ, मग शेवटी डोकं चालविले, मोबाईल स्टँडमधला मोबाईल काढून खिशात ठेवला आणि त्या स्टँडमध्ये हेडलाईट बसविला. बस काम झाले मस्त उजेड दिसू लागला. खरे तर आता पाय बोलू लागले होते, कालचे जवळपास १५० किमी आणि आजचे हे १०० किमी झाले होते, त्यात हायवेवरचे ट्रॅफीक वाढू लागले होते. आता सायकलींग थांबवून टेंपो थांबवावा एखादा असा विचार मध्येच डोकावून जात होता पण दुस-या दिवशी रविवार असल्याने पुरेसा आराम होणारच आहे मग सायकल चालवायला काय हरकत आहे असे वाटून आमचे पाय पुन्हा पॅडेलवर भार टाकायचे. पुढचे साधारण ३० किमी आम्ही हायवेच्या अंधारातून हेडलाईटने वाट कापत कापत कात्रज बोगद्याजवळ पोहचलो. हा बोगदा आला म्हणजे आपले घर आले अशी आमची समजूत आहे कारण यानंतर येणारा उतार घराच्या जवळ नेवून ठेवतो. सायकल हार्ड गिअरवर टाकून दिली झोकून आणि रात्री साडेदहालाच वडगाव पुलही ओलांडला. माझी थांबायची किंवा अमितला बाय करण्याचीही इच्छा राहिली नव्हती, स्पीड कमी न करता मी दूरुन हात करुनच अमितला निघतो म्हणून इशारा केला आणि सरळ घर गाठले. घरी पोहोचल्यावर पिंपातल्या पाण्याचा एक घोट घशाखाली उतरवला...........अहाहा... काय सुख होते ते..!!

एक झकास राईड संपली होती. खूप मजा आली..!!!!

भेटू पुन्हा.. अशाच एका राईडनंतर..!!

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो हो.. तोच . किकु. Happy

आपल्या पहिल्या लोणावळा राईडला (जेथे बहुदा तू देहू रोडपर्यंत आला होतास) त्या राईडला तो हिंजवडीपासून परतला होता.

वर्णन अन प्रवास खासच....
ते वर्णन वाचले, ते रस्ते आठवले की आत्ता उठुन तिथेच असावे असे वाटते..... पण अशी दिवास्वप्ने कशी शक्य होतिल?
तेव्हा कधीना कधी तरी या रस्त्यांवरुन सायकलने जायचेच असा निश्चय मात्र वरील वर्णन वाचुन केला जातोय.
(फदी, वाचतोहेस ना रे हे? ..... )

@ पराग

Happy

आम्ही अजून उगवते सायकलिस्ट आहोत, इथे बरेच लोक्स सूपर Super Randonneurs झाले आहेत. बाकी आपली क्षमता अजून १००-१५० पेक्षा जास्त वाटत नाही. राईड मात्र मस्त झाली . मागच्या एका राईडला आम्ही दोन तंबू आणि एक कोंबडा सायकलवर नेला होता. डोंगरवाडीला जावून मस्त शिजवून खाल्ला आणि शेतात टेंट मारुन मुक्काम केला , असे बरेच रिकामटेकडे उद्योग चालू असतात आम्हा पामरांचे Happy

>>>>> मागच्या एका राईडला आम्ही दोन तंबू आणि एक कोंबडा सायकलवर नेला होता. डोंगरवाडीला जावून मस्त शिजवून खाल्ला आणि शेतात टेंट मारुन मुक्काम केला , <<<<<< लय भारी.........
साला तुमचा हेवा वाटतो रे....