पिंजारी - २

Submitted by श्रावण मोडक on 9 February, 2009 - 05:57

पावसाळा, दूरध्वनीवरून...
"तू पेवलीत कधी येतेस? स्वातंत्र्यदिनी जमव. पिंजारीला भेटलं पाहिजेस. हिरा सापडला आहे आपल्याला..."

स्वातंत्र्याचा वर्धापनदिन शक्य असेल तर नव्यानं जोडलेल्या एखाद्या गावातच करण्याचा एक शिरस्ता रजनीनं पाडून ठेवला होता. स्वाभाविकच त्या वर्षीच्या स्वातंत्र्यदिनासाठी पेवली. त्यासाठीचं मला निमंत्रण. त्या भागाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं अशा कार्यक्रमातून मला खूप काही मिळू शकतं असं रजनी नेहमी म्हणायची. त्यानुसारच आलेलं हे निमंत्रण.
स्वातंत्र्यदिनाच्या तयारीसाठी रजनी जाणीवपूर्वक गावात गेली. तयारी अशी मोठी नसते. तिरंगा खादी भांडारातून मिळतो, ध्वजस्तंभ उभा करण्याचं काम अर्ध्या तासाचं. मुलांसाठी जाता-जाता तालुक्याच्या गावातून खाऊ घेता येतो. तरीही बैठक. बैठक घेण्याचं कारण, गावकऱ्यांचा सहभाग. हा कार्यक्रम गावकऱ्यांनीच करावयाचा हा कटाक्ष. त्याच्या तयारीसाठी बैठक. अशी बैठक लावली की माणसांचं मोराल टिकून राहतं, ते वाढवता येतं हे रजनीला ठाऊक होतं.
गुलाबकाकांचं घर हेच आता गावातलं कार्यालय झाल्यासारखं होतं. या गावातली पहिली धान्यबँक स्थापन करून स्वातंत्र्याचा पुकारा करावयाचा असं कार्यक्रमाचं स्वरूप ठरलं. धान्यबँकेसाठी नावं नोंदवणं वगैरे प्रक्रिया सुरू झाली आणि काकांच्या पडवीत पिंजारीसह इतर काही बायकांसमवेत रजनी बसली. सुरू झाल्या एकमेकींना समजून घेणाऱ्या गप्पा. त्यातून पुढं आली पिंजारीची कहाणी.
---
पिंजारी. नावात काय आहे, असं कोणीही म्हणेल. विशेषतः पिंजारी या नावात तर हटकूनच. नुसत्या नावावरून काहीही बोध होणार नाही हे स्पष्ट आहे. वय वर्षं तीस-एकतीस. त्या गावात तिच्या पिढीतील कोणालाही आपलं वय नेमकं सांगता येत नाहीच. कधी-काळी सरकारच्या कृपेनं त्या गावात गेलेल्या डॉक्टरनं शरीरशास्त्राच्या त्याच्या ज्ञानाच्या जोरावर तिच्या पिढीतील प्रत्येकाचं वय अंदाजे काढलेलं असावं. त्या आधारे गावाचा कारभारी प्रत्येकाचं वय सांगतो, तसंच पिंजारीचंही वय रजनीला सांगितलं गेलं आणि म्हणूनच ते समजलं होतं. अन्यथा त्याची नोंद तशी वेगळी करण्यातही फारसं हशील नाही हेही खरंच.
आई पिंजारीच्या लहानपणीच गेली होती. ही एकटी. बाप मजुरीसाठी शहराकडं गेला. येताना आधी दमा घेऊन आला. मग पुढं त्याला झाला क्षय. अर्थात, त्यातही फारसं नवल नव्हतं. त्या परिसरातील अनेकांचा तो जिवाभावाचा साथीदारच होता. त्यामुळं पिंजारीच्या बापावर, म्हणजेच डोंगऱ्यावर, क्षयानं 'कृपाछत्र' धरलं तेव्हा त्याची त्या वंचित जगण्यातून सुटका होण्याचीच सुरवात झाली होती - अखेरीचा आरंभच म्हणायचा तो. अर्थात, ही सुटका काही सोपी नसते. जगण्यापासून सुटका करून घेण्याची माणसाची इच्छाशक्ती किती जबरदस्त आहे याचीही तिथं कसोटी पाहिली जाते. तशीच कसोटी डोंगऱ्याचीही पाहिली गेली. एक-दोन नाही; सहा वर्षं! त्याचीच एकट्याची नाही. त्या क्षयानं पिंजारीच्या जगण्याच्या इच्छाशक्तीचीही पुरेपूर कसोटी पाहिली. बापाची शुश्रुषा, आपलं वंचित जगणं सावरण्याचा प्रयत्न अशा दोन आघाड्यांवरच्या लढाईतून तरून राहण्याची तिची इच्छाशक्ती. त्या इच्छाशक्तीची कसोटी.
या सहा वर्षात डोंगऱ्या आणि पिंजारी हीच काय ती त्यांच्या उंबऱ्यात असणारी माणसं होती. बाकी गुलाबकाका, काकी येऊन-जाऊन असायचे. इतर मंडळी आपापल्या व्यापात. बापाचं दुखणं पिंजारीनं एकटीनं काढलं. शेत सांभाळून. त्याचं औषधपाणी करण्यासाठी दर महिन्याला ती पंधरा मैल चालत जायची तालुक्याच्या गावाला - रामपूरला. सकाळी निघायची आणि संध्याकाळी औषध घेऊन परतायची. शेतीचं काम करण्यासाठी गुलाबकाका आणि एक-दोन घरांची मदत. बाकी मात्र एकटीच्या बळावर. डोंगऱ्या अखेर त्या कसोटीला उतरला आणि क्षयानं त्याची सुटका केली. पिंजारीही सुटली एक प्रकारे. डोंगऱ्या गेला आणि पिंजारीला गुलाबसिंग हा एकमेव आधार राहिला.
---
पिंजारीसंबंधी आधीच्या काळात झालेल्या चर्चेत ती मध्यंतरी एक वर्ष गावात नव्हती याचा उल्लेख वारंवार होत असे. त्या काळात पिंजारी गावात नव्हती असंच गावकरी सांगायचे. पिंजारीही तसंच सांगायची. ती गेली होती मजुरीसाठी शहरात. पेवली किंवा त्या परिसरातील, खरं तर त्याच परिसरातील कशाला, देशातील कोणत्याही खेड्याच्या नशिबी असणारे भोग ज्यांना ठाऊक आहेत ते म्हणतील की, पिंजारी वर्षभर मजुरीसाठी शहरात गेली यात नवल काय? रजनीला त्यात नवल वाटलं होतं. त्याचं कारण होतं. पिंजारीची चौकशी तिनं सुरू केली तेव्हा प्रत्येकाकडून तिला, ती एक वर्ष गावात नव्हती, हे आवर्जून सांगितलं जात होतं. त्यामुळंच तिचं ते निसर्गदत्त, आणि स्वतःच्या स्वभावातून निर्माण झालेलं, कुतूहल अधिकच चाळवलं गेलं होतं.
ते एक वर्ष पिंजारीसाठी आणि पेवलीसाठीही खास होतं. पिंजारीसाठी त्या वर्षाचं खासपण अगदी वैयक्तिक स्वरूपाचं होतं. गावासाठी मात्र ती मिरवण्याची बाब होती.
पिंजारी गावातील एक प्रमुख कार्यकर्ती होती हे त्यामागचं कारण होतंच. शिवाय अलीकडं संस्थेच्या या कामाच्या निमित्तानं, तसंच इतरही कारणांमुळं वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी गावात अनेकांची ये-जा होऊ लागल्यानंतर संस्कृतीची जी काही चर्चा चालायची, त्यात पिंजारीच्या त्या एका वर्षाला एक वेगळं महत्त्व आहे, हेही गावकऱ्यांच्या ध्यानी येऊन चुकलं होतं.
आजच्या कहाणीत तो मुद्दा अनायासे आला तर... रजनी विचारात होतीच.
---
"मला जुवान्या आवडू लागला. जंगलात गेलो फुलं गोळा करायला की आम्ही भेटायचो. आम्ही लग्न करायचं ठरवलं. लग्नासाठी गावजेवण द्यायचं होतं. तेच अवघड होतं. जुवान्याकडं होते. पण माझ्या वाट्याचे नव्हते. त्यामुळं लग्न होईना..." स्वतः पिंजारीच सांगू लागली. अर्थातच, इतर बायकांनी केलेल्या आग्रहामुळंच तिची भीड चेपली होती, हेही खरं. प्रथेनुसार दोन्ही बाजूंनी सारख्याच प्रमाणात जे काय करायचं ते करायचं होतं आणि ते कमीतकमी करायचं असं ठरलं होतं.
दोघं एकमेकाच्या प्रेमात पडून एक वर्ष झालं तरी लग्नासाठीचे पैसे जमण्याचं चिन्ह नव्हतं.
जुवान्याला त्याच्या बापानं अद्याप शेत वेगळं काढून दिलं नव्हतं. मुळात त्याच्याकडंही पोराला वेगळं शेत काढून देण्याइतकी फार मोठी शेती होती असंही नव्हतं. त्यामुळं तोही प्रश्नच होता. त्याच्या बापाच्या पिढीसारखी स्थिती आता नव्हती. तेव्हा शेत काढून देणं आजच्या तुलनेत सोपं होतं. आपल्याकडं पुरेसं शेत नसेल तर गावाच्या संमतीनं जंगल काढून नवं शेत करता यायचं. ते आता शक्य नव्हतं.
डोंगऱ्या असता तर त्यानं जुवान्याकडं पिंजारी त्याला दिल्याबद्दल पैसे मागितले असतेच. ती प्रथाच होती. पण आता डोंगऱ्या नव्हता. पिंजारी तर एकटीच होती.
"माझं शेत होतं, पण तेही तोकडंच. त्यामुळं वरकड काहीच नाही. उन्हाळ्यात तर जंगलच कामाला येतं. त्यामुळं पैसे कसे उभे करायचे हा प्रश्न होता. शेवटी आम्ही तसंच एकत्र रहायचं ठरवलं आणि माझ्याच घरी संसार सुरू केला. लग्न झालेलं नव्हतंच. आणि ते करावं तर लागणार होतंच..."
दोन वर्षं अशी गेली. जुवान्या आणि पिंजारीला या काळात एक मूलदेखील झालं. पण लग्न झालेलं नव्हतं आणि लग्न झालं नाही म्हणजे गावात प्रतिष्ठा नाही.
"गावजेवणाला लागणार होते दोन हजार रुपये. इतके पैसे कसे आणायचे? मुलगा दीड वर्षाचा झाला तेव्हा मात्र मी ठरवून टाकलं, काहीही करून येत्या वर्षात पैसे उभे करायचे आणि गावजेवण घालून लग्न करायचं..."
पिंजारीनं एक धाडसी निर्णय केला. तिनं गाव सोडलं. वर्षभरासाठी. ती गेली मांडणगावाला. तिथं एक वर्ष एका शेतावर मजुरी करून तिनं दोन हजार रुपये कमावले आणि गावी परतल्यावर या दोघांनी गावजेवण दिलं.
साडेतीन वर्षांची प्रतीक्षा, वर्षभराचे उरस्फोड कष्ट आणि त्यानंतर लग्न. हा सारा मान्यतेसाठीचा संघर्ष. त्यात आणखी एक दडलेला पदर होताच. पिंजारीची जमीन. बाप गेल्यानंतर जमीन तीच करीत होती, पण ती किती काळ टिकेल याची खात्री नव्हती. तिच्यावरची मालकी स्थापित करावयाची झाली तर हे लग्नही आवश्यक होतं. म्हणजे मग ती जमीन पिंजारी-जुवान्या यांची झाली असती.
पोट भरलेल्या गावाची मान्यता मिळाली पिंजारी आणि जुवान्याच्या लग्नाला. आणि त्याच लग्नात हजर असलेल्या त्यांच्या मुलालाही.
पिंजारीच्या या निर्णयाचं धाडस बाहेरून येणाऱ्या मंडळींना भारावून टाकायचं. तिचा परिचय या कहाणीशिवाय होतच नसे. आणि मग ही कहाणी सांगितली जाऊ लागली.
---
गावात संघटना-संस्थेची शाखा स्थापन झाल्यापासून पिंजारीनं त्यासाठी वाहून घेतलं. धान्य बँकेसाठी नावनोंदणी करणं, त्यासाठी शेजारच्या गावात जाऊन तिथलं काम पाहून त्यातून शिकणं हे सारं तिनं एकहाती केलं होतं. आता आपल्या मोठ्या अक्षरात ती काळ्या फलकांवर बैठकीचा वगैरे मजकूर लिहूही लागली होती. बैठकीत बोलू लागली होती. झिंदाबादचा नारा देण्यासाठी, संघटनेचं गाणं गाण्यासाठी पुढं येऊ लागली होती. डोक्यावरून घट्ट घेतलेला पदर - गर्द रंगाचा, त्याविरुद्ध गर्द रंगाचं लुगडं, तजेलदार गोरापान चेहरा, मूठ करून उंचावलेला हात ही तिची मूर्ती आता डोळ्यांपुढं आणणं सोपं जात होतं. संस्थेच्या कार्यालयात वृत्तपत्रीय कात्रणातून तशी छायाचित्रं झळकत. त्यातून ती दिसायची.
स्वातंत्र्यदिनी गावात स्थापन झालेल्या धान्यबँकेची प्रमुख म्हणून पिंजारीची निवड झाली. कारण तिला लिहिता-वाचता येत होतं. दोनचार यत्ता शाळेत गेली होती ती. त्यापलीकडं तसा शिक्षणाशी संबंध नाही, पण अक्षरांशी झालेला परिचय कायम राहिला होता. रजनीच्या संपर्कात आल्यानंतर तो घट्ट होत चालला होता आणि तेवढं या कामासाठी पुरेसं होतं.
(क्रमशः)
याआधी पिंजारी - १

गुलमोहर: 

किती सुंदर कथा लिहिली आहे. धन्य झालो. शरद