अंधार हा ….

Submitted by कविता क्षीरसागर on 21 January, 2016 - 09:58

अंधार हा ….

युगांचा साचला अंधार हा
घृणेने गोठला अंधार हा

नसे ना का मला माझे कुणी
उराशी कवळला अंधार हा

कशाला माळले तू चांदणे
तुझ्यावर भाळला अंधार हा

नको लाजू प्रिये दे ओठ दे
बरे की लाभला अंधार हा

सरावाने नजर मरतेच ना
तरी का लाजला अंधार हा

पुन्हा झाले रिकामे घर , तसे
छळाया लागला अंधार हा

सुरांनी एवढे केले खुळे
निळासा भासला अंधार हा

उगा नावे कुणी ठेवू नका
खरे तर चांगला अंधार हा

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुन्हा झाले रिकामे घर , तसे
छळाया लागला अंधार हा <<< वा वा

एकंदर गझल तरल आहे.

उगा नावे कुणी ठेवू नका - ह्या ओळीत टायपो झाला आहे. नावे चे नवे झाले आहे.

नसे ना का मला माझे कुणी
उराशी कवळला अंधार हा <<< दर्जेदार शेर!

शुभेच्छा कविता.

छान .

सरावाने नजर मरतेच ना
तरी का लाजला अंधार हा!

सुरेख ओळी! वा!

तलम आहे. वैविध्य आहे. फार छान !
शुभेच्छा !

कविता...
खूप छान....
अंधार माझाही खूप जवळचा त्यामुळे
जरा जास्तच आवडली गझ़ल..

युगांचा साचला अंधार हा
घृणेने गोठला अंधार हा >>> सुंदर

नको लाजू प्रिये दे ओठ दे
बरे की लाभला अंधार हा >>> आहाहा...

नसे ना का मला माझे कुणी
उराशी कवळला अंधार हा >>> अप्रतिम