फणा ...

Submitted by कविता क्षीरसागर on 16 January, 2016 - 13:30

फणा ....

उपटला प्रश्न हा मी तणासारखा
जन्म का रे दिला सरपणासारखा

का तुझा माजला रे अहम् मानवा
जाण विश्वात या तू कणासारखा

तिष्ठते मी किती , वेळ तू पाळ ना
का असा वागतो साजणा सारखा

वाटते नेहमी शरण यावे तुला
आडवा येतसे मीपणा सारखा

तोडले बंध अन् हायसे वाटले
पाळते दिवस तो मी सणासारखा

तत्व जी पाळली … तोडली जर कधी
उकळतो जीव हा आधणासारखा

दंशते जीभ ही गरळ ओके अशी
छाट ना ... काढते ती फणा सारखा

कविता क्षीरसागर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>तिष्ठते मी किती , वेळ तू पाळ ना
का असा वागतो साजणा सारखा

वाटते नेहमी शरण यावे तुला
आडवा येतसे मीपणा सारखा

तोडले बंध अन् हायसे वाटले
पाळते दिवस तो मी सणासारखा <<<

व्वा व्वा

(मतल्यात ठरलेली जमीन पाळली जाणे अपेक्षित असते. उच्चारांनुसार सर्व ठीक, तंत्रानुसार दोन शेर झालेले नाहीत!)

खुप खुप आभार बेफीजी ...

पण गझलेत नवीन असल्यामुळे मला आपला मुद्दा समजला नाही ... कृपया समजावून सांगाल का ? ... म्हणजे नक्की तशी सुधारणा करेन ...

लाभला जर पती रावणासारखा
होइ संसार मग लक्ष्मणासारखा >>>.
...... भरत, शत्रुघ्न,बिभीषण आदी असताना लक्ष्मंण निवडण्याचे प्रयोजन कळले नाही.

ऊर्मिला आणि लक्ष्मणासारखा .... संसाराचाच वनवास होतो .... हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे ... म्हणून लक्ष्मणाच्या प्रतिकाचे प्रयोजन , पाटीलजी ...

ऊर्मिला आणि लक्ष्मणासारखा .... संसाराचाच वनवास होतो .... हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे ... म्हणून लक्ष्मणाच्या प्रतिकाचे प्रयोजन , पाटीलजी ... >>>>>
........ वास्तवात रावण पती असूनदेखील मंदोदरीचा संसार ऊर्मिला आणि लक्ष्मणासारखा नव्हता.ऐतिहासिक्,पौराणिक प्रतिके उपयोगात आणताना त्यांची वास्तवाशी विसंगती असायला नको असे वाट्ते.

बाळ पाटीलजी ,
आपल्या मताचा पूर्ण आदर आहे , पण मला या शेरातून म्हणायचे आहे
ते खूपच वेगळे आहे . रावण हे प्रतिक मी त्याच्या स्त्री लंपट पणामुळे वापरले .
आणि असा जर कुणाचा पती असेल तर त्यांचा संसार हा एक प्रकारे वनवासच असू शकतो ….
पण बहुधा हे सारे नेमकेपणाने पोचत नाहीये असे दिसते ….

त्यामुळे एक नवीन मतला सुचला आहे तो देत आहे

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ….

क्या बात है!

अभिनंदन कविताजी!
गझल प्रभावी झाली आहे!(संपादना नंतर अधिकच!)
तुमचे खयाल सशक्त आहेत,ते तितक्याच सशक्तपणे व्यक्त व्हावेत असं वाटतं,म्हणून एक सूचना करावीशी वाटते आहे.(ल.तो.मो.घा.)
(सहसा) वृत्तपूर्तीसाठी वापरले जाणारे,'रे,मी,हा/ही' ई.शब्द टाळता आले तर पहाच!
खूप शुभेच्छा!