घनचक्कर पे आठ घनचक्कर........ (एका नव्या वाटेने घनचक्कर ट्रेक)

Submitted by जय@ on 14 January, 2016 - 04:29

IMG_20151213_130707.jpg20151212_133914_1.jpg20151212_135149.jpg<20151212_182235_0.jpg घनचक्कर पे आठ घनचक्कर........
(एका नव्या वाटेने घनचक्कर ट्रेक)
आमचा १८ डॉल्फिन ग्रुप पावसाळ्यात सिद्धगड सर करून आला होता. मात्र पावसाळा संपून आता बराच अवधी झाला होता. ट्रेकिंगचा किडा ज्याच्या अंगात घुसला तो फार काळ काही शांत बसु शकत नाही. मग आम्ही तरी या निसर्ग नियमाला कसे अपवाद ठरणार? वास्तविक फार पूर्वीच डिसेंबर महिन्यात आमची mp बाईक टूर ठरली होती. मात्र बऱ्याच चर्चे नंतर mp बाईक टूरसाठी हातात कमीत कमी १२ दिवस असायलाच हवेत असे लक्षात आले. वर्षाच्या अखेरी डिसेंबर मध्ये १२ दिवस रजा हवी म्हटले तर फार कमी लोकांना हे शक्य होते आणि म्हणून ही योजना बारगळली. ही योजना असफल ठरली तरी ट्रेकिंगचा किडा काही शांत बसु देत नव्हताच. whatsapp वर अनेक चर्चा सत्र घडल्या नंतर घनचक्कर ट्रेक म्हणजेच महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर ही जागा आमच्या गुरुजींच्या (अमोल) म्हणण्या नुसार फायनल झाली. शुक्रवारी म्हणजे ४ डिसेंबर संध्याकाळी ४/५ पर्यंत दहिसर मधून निघायचे, भंडारदऱ्या जवळ कुठे तरी राहायचे, शनिवारी लवकर उठून घनचक्कर माथा गाठायचा, ती रात्र तिथेच तंबूत घालवून रविवारी सकाळी परतीच्या प्रवासाला लागायचे एकूण असा कार्यक्रम सर्वानुमते ठरला.
नेहमी प्रमाणेच किती जण येणार हे शेवटच्या क्षणा पर्यंत फायनल होत नव्हते. Sensex चा आकडा वर खाली होत-होता शेवटी तो ८ वर स्थिरावला. अमोलच्या पजेरो गाडीने निघायचे हे आधीच ठरले होते.
अमोल दहिसरवरून निघणार आणि धर्मेंद्र सानेचे ऑफिस ही त्याच्याच शेजारी असल्या कारणाने सर्वांनी सानेच्या ऑफिस मध्ये जमायचे असे ठरले. ठरल्या प्रमाणे साने,स्वप्नील,धीरु,जग्गू,अभय,सत्येन,अमोल आणि मी असे ८ घनचक्कर निघालो घनचक्कर ट्रेकला.....
सत्येन ने डब्यात चिकन-भाकरी आणली होती मुंबई-नाशिक हायवेवर एका धाब्यावर गाडी थांबवत चिकन-भाकरी फस्त केली. आता मस्त पोटोबा झाला होता. जास्त वेळ न दवडता आम्ही पुढील प्रवासाला लागलो. जसे जसे आम्ही मुंबईच्या बाहेर पडत गेलो तस तस हवेत गारवा ही जाणवू लागला. त्यात सोबत music system वर
८०-९०च्या दशकातील सुरेल गाणी लागली होती. अमोलचे गाण्यांचे कलेक्शन एकदम भन्नाट होते. अश्या या मस्ताना माहोल मध्ये आम्ही घोटी कधी गाठले कळलेच नाही. आम्ही आता घोटीवरून हायवे सोडून भंडारदऱ्यासाठी उजवी कडे वळलो. घोटी ते भंडारदरा रस्ता खराब असल्याने तासाभरात आम्ही भंडारदऱ्यात पोहोचलो.
पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा म्हणजेच बालाघाट या पर्वतरांगांमधून सरासरी साडेचार हजार फूट उंचीच्या पर्वतराईच्या खोबणीत वसलेला जलाशय म्हणजेच विल्सन डॅम. भंडारदरा येथे अनेक नयनरम्य स्थळे आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक असे म्हटले जाते. हे प्रवरा नदीवर ब्रिटिशांच्या काळात बांधलेले धरण आहे. अश्या या निसर्ग संपन्न भंडारदऱ्यात आज आमचे वास्तव्य होते. भंडारदऱ्यात MTDC resort पाठी एक मोकळी जागा आहे म्हणजे भंडारदरा डॅमच्या अगदी कडेला.
आम्ही आमचे तंबू लावण्या साठी गाडी उभी केली. सामान उतरवत होतोच इतक्यात अभयचे लक्ष गाडीच्या टायर कडे गेले. गाडीच्या मागच्या टायर मध्ये भला मोठा खिळा गेला होता. टायर पंचर झाला होता. स्टेपनीत ही मुबलक हवा नव्हती. आता स्टेपनी लावून सकाळी लवकर उठून गाडीचे पंचर काढावे लागणार होते. सकाळी लवकर उठायचे असल्याने भराभर तंबू (tent) लावून विल्सन डॅम किनारी आम्ही झोपी गेलो.
सकाळी लकरच उठून झटपट गाडीत सामान भरले. अमोल गाडी घेवून तर आम्ही चालत शेंडी गावात टायरवाल्याच्या दुकानात पोहोचलो. त्याला पंचर काढायला सांगून आम्ही चहा-मिसळच्या शोधात निघालो. हा शोध संपला तो हॉटेल जय हिंद मध्ये विसावूनच. वडे,भजी,मिसळ त्यावर एक एक स्पेशल कटिंग असा भरपेट नास्ता करून आम्ही हॉटेल जय हिंदचा निरोप घेतला. दुपारचे जेवण मिळेल याचा काही भरवसा नव्हताच म्हणून म्हणा पण मिसळ जोरदार हादडली होती आणि हॉटेल जय हिंदची मिसळ म्हणजे एक नंबर ना राव.....
आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता आधीच खूप उशीर झाला होता. लवकर पंचरवाल्याचे दुकान गाठून आम्ही निघालो विल्सन डॅमच्या दुसऱ्या किनाऱ्याला म्हणजे कोळटेंभे गावाकडे.......कोळटेंभे गाव म्हणजे एक छोटेसे खेडेगाव आहे. रतनगडला जाणाऱ्या रस्त्यात हे गाव लागते. साधारण अर्ध्या एक तासात आम्ही कोळटेंभे गावात काकूंच्या दारात गाडी उभी केली. गेल्यावर्षी अमोल,साने व इतर काही ग्रुप मेंबर कात्राबाई ट्रेक साठी कोळटेंभेला आले होते. त्यावेळी त्यांनी याच घरी विसावा घेतला होता.
अमोल गाडीतून उतरताच काकूंनी एका क्षणात अमोलला ओळखले आणि विचारपूस करतच थंडगार पाण्याची कळशी-तांब्या आमच्या समोर ठेवला. जसे काही काकूंच्या माहेरची मंडळीच आली आहेत की काय? अश्या आविर्भावात काकूंची विचारपूस चालू झाली. हा माणुसकीतला ओलावा आता अश्या खेडेगावातच अनुभवण्यास मिळतो.
घनचक्करची उंची ५०२८ फुट इतकी असून हे महाराष्ट्रातला तिसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे. ह्याच पर्वत रांगेत पुढे गेले की कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्य शिखर ही लागते. (दोन-तीन वर्षापूर्वीच आम्ही कळसुबाईला ही दंडवत घालून आलो होतो.) घनचक्करला फारच कमी ट्रेकर्स येणे पसंत करतात. कारण येथे पावसाळया शिवाय पाणी साठा सापडत नाही. आणि पाहण्यासाठी गड-किल्ला किंवा कोणती ही वास्तू देखील येथे नाही. बहुतेक ट्रेकर्स घनचक्करला येण्याची रुळलेली वाट राजूर वरून शिरपुंजे गावातून जाणे पसंत करतात. म्हणजे आम्ही उभे असलेल्या कोळटेंभे गावाच्या अगदी विरुद्ध बाजूस हे शिरपुंजे गाव आहे. तिथून अगदी सोप्पा रस्ता आहे. नव्या वाटा शोधण्यात आम्हाला मोठी मौज वाटते आणि म्हणूनच पूर्ण कल्पना असून देखील आम्ही कोळटेंभे गावाची अवघड वाट निवडली होती. आम्ही हा नवा मार्ग शोधण्याचा अट्टहास चालविला होता. 20151212_184741.jpg20151212_184905.jpg20151213_072250.jpg20151213_072250.jpg
आता हळू हळू आजू बाजूची पुरुष मंडळी ही जमली होती. आमची सामानाची बांधाबांध चालू होती सोबत गावकऱ्यांशी घनचक्कर माथ्यावर जाण्याच्या मार्गाची शहानिशा ही करत होतो. आम्ही निवडलेली वाट अवघड आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. मात्र आमचा अलिखित सरदार म्हणजेच अमोल.... हा नेहमी वेगळ्या वाटा शोधत असतो आणि आम्ही त्याच्यावर पूर्ण विश्वासाने तो नेईल त्या वाटेने त्याच्या पाठी चालत असतो.
मी एका गावकरयाला विचारले हा समोर आहे तोच घनचक्कर का? हो पन आम्ही त्याला नाकटा म्हनतो....... अन बाजूला आहे तो आमचा देव गावल देव......पाणी हाय का रे वरती? तस नाही आहे…. पन आम्हाला ठाव हाय पाणी कुठ मिळल… जर शोधल तर तुम्हाला बी सापडल.... डोंगरावर पाण्याचा कोणता ही साठा नसल्या मुळे प्रत्येकाने ५ लिटर पाणी सोबत घेतले होते.
घनचक्कर हा कोणताही गड नसल्यामुळे विसाव्यासाठी कोणतेही छप्पर मिळणार नव्हते म्हणूनच आम्ही सोबत तंबू घेतले होते. आजची रात्र गडावर घालवायची असल्या कारणे रात्रीचे जेवण भात,कांदे, बटाटे,टोमेटो,पोहे असा सर्व लवाजमा सत्येन ने बॅगेत घेतला होता. शेवटी निघता निघता काकूंकडून एक टोप हि घेतले. आता सर्व सामानाची बांधाबांध पूर्ण झाली होती. घनचक्कर सर करण्यासाठी आम्ही सज्ज झालो होतो. समोर घनचक्कर दिसत होता. घनचक्कर डोंगरावरून उतरणारया दोन घळी आम्हाला दिसत होत्या उजव्या बाजूच्या घळी खाली एक छोटा डोंगर दिसत होता. आणि तो डोंगर पार करूनच गावकरी त्यांच्या गावलदेवाच्या दर्शनाला जात असत. अमोलला मात्र तो रस्ता मान्य नव्हता. त्याला डाव्या बाजूला असलेल्या घळीतूनच घनचक्कर माथा गाठायचा होता. आणि म्हणून आम्ही डाव्या बाजूच्या घळीच्या दिशेने निघालो. एव्हाना शेत तुडवत आम्ही त्या दगडी घळीच्या मुखापाशी येऊन पोहोचलो. हि घळ म्हणजे पावसाळ्यात डोंगर माथ्यावरून पाणी खाली आणणारा एक ओढा होता. हि वाट नेमकी डोंगर माथ्यावर पोहचते कि नाही याची आम्हाला कल्पना नव्हती किंवा पुढे जाऊन एखाद्या विशाल दगडाने हा मार्ग बंद झाला असेल तर? म्हणून आम्ही हार्नेस आणी दोर सोबत घेतला होता. भरउन्हात म्हणजे बरोबर १२ वाजता आम्ही डोंगर चढायला सुरवात केली. उन्हाचे चटके आता जाणवत होते. उभी चढण लागायला सुरवात झाली होती. एक एक करत आम्ही काळा पथ्थर पार करत पुढे सरकत होतो. जस जसे आम्ही वर चढ होतो तस तसे घळ निमुळती होत होती आणि घळीची दोन्ही बाजूची कातळ भिंत उंच उंच होत होती. या कातळ भिंती मुळे आम्हाला सावली मिळत होती.
या कातळात आता AC प्रमाणे गारवा वाटत होता. दुपारच्या उन्हाची जाणीव देखील होत नव्हती. साधारण आम्ही चालायला सुरवात करून आता दोन तास झाले होते. भूक ही लागली होती म्हणून थोडा ब्रेक घेत. मी आणलेला केकचा फडश्या पाडत आम्ही पुढील मार्गाला लागलो. मार्ग म्हणजे काय तर दगडातील उभी रेष....एक एक दगडी टप्पा पार करत आम्ही पुढे सरकत होतो आता धीरु, सत्येन आणि स्वप्नील थोडे मागे पडले होते. स्वप्नील तसा कणखर पण तो नेहमी ग्रुप मधील कमजोर गड्यांना घेऊनच चालणारा, प्रत्येकाला मदतीचा हात देणारा आणि म्हनून तोही थोडा मागेच होता. इतक्यात खालून स्वप्नीलने मोठयाने आवाज दिला अमोल...अमोल लवकर खाली ये…. अमोल आणि मी बॅगा तेथेच टाकून खाली धाव घेतली. बघतो तर काय आम्ही आलो त्याच मार्गात एका दगडाच्या फटीत एक साप (green pit viper) गारव्यात मस्त पहुडला होता. नकळत आमच्या पैकी कुणाचा पाय ह्याच्यावर पडला असता तर आमचे राम नाम सत्य नक्की झाले असते. अमोल साप पकडण्यात तरबेज म्हणून मामा (स्वप्नील) त्याला हाका मारत होता. या निर्जन स्थळी कोणताही धोका पत्करायला नको म्हणून अमोलने सावध पवित्रा घेत वायपरला तो बसलेल्या फांदी सोबतच उचलले. आम्ही हि भरभर मोबाईल मध्ये फोटो काढत होतो. हा साप खूप विषारी असतो अशी अमोलने माहिती दिली. या अश्या निर्जन स्थळी विषाशी खेळ नको म्हणत आम्ही हि तेथून लवकरच काढता पाय घेतला. मजल दर मजल करत आम्ही एक एक टप्पा पार करत होतो. आता घळ आणखीनच निमुळती होत होती. मोठ मोठे दगडी कातळ कडे लागत होते. मात्र अजूनही आम्ही दोराचा सहारा घेतला नव्हता.
त्या दगडातून आम्ही मार्ग काढत हळू हळू पुढे सरकत होतो. मात्र आता आमचा वेग मंदावला होता. घळीत गारवा असला तरी पाण्याची तहान लागत होतीच. अश्या ट्रेक्सना भरपूर पाणी पीत रहावे नाहीतर माणूस Dehydrate होण्याची गाढ शक्यता असते. आणि अश्यातच आमच्या जवळील पाणी संपत होते. प्रत्येका जवळील अर्धे अधिक पाणी संपले होते. घळीत थोडाफार ओलावा दिसत होता मात्र पिण्याजोगे पाणी असे काही दिसत नव्हते. त्यातच सत्येनच्या पायाला cramp आले. असे कमी पाण्या मुळे होऊ शकते. त्याच्या खांद्यावरील बॅग उतरवत पायाला थोडे मालिश केले. भरपूर पाणी पाजले. त्याला पुढच्या प्रवासाला पुन्हा तयार करत आम्ही निघालो. एक टप्पा ओलांडला आणि आमचा रस्ता एका अजस्त्र अश्या दगडाने रोखला. आता दोरीचा वापर करावा लागतो कि काय? असे वाटत आम्ही दगडा जवळ पोहोचत होतो आणि दगडाच्या एका कपारीत थंड पाण्याची पातळ धार लागलेली दिसली. आपल्या बाथरूम मध्ये धो धो पाणी सांडणारे आपण इथे मात्र पाण्याच्या एक एक थेंबासाठी झगडत असतो. अश्या ठिकाणी पाण्याचे महत्व काय? ह्याची प्रचीती आपल्याला येते. जे शाळा, कॉलेज मध्ये शिकवून ही आपल्याला कळले नसते ते निसर्ग येथे सहज शिकवून जातो. तो छोटासा पाण्याचा झरा आम्हाला अमृता समान भासत होता. थेंब थेंब पडणारे पाणी आम्ही वेचण्याचा प्रयत्न करत होतो. जसे तसे आम्ही आमच्या पाण्याच्या पिशव्या (water bladder) भरून घेतल्या. त्या थंड पाण्याने तृप्त होत आम्ही पुढे सरकलो. आम्ही दगडा जवळ पोहोचलो. तिथेही पाणी पडत होतेच पण त्या महाकाय दगडाच्या एका कोपऱ्यातून वरती जाण्यासाठी छोटीसी फट दिसत होती.
पण बॅगा घेऊन त्यात शिरणे शक्य नव्हते. म्हणून बॅगा (trekking sack) खांदया वरून उतरवत आम्ही एक एक करून वरती चढलो. आमच्या पाठोपाठ बॅगा ही वरती चढवत पुढे निघालो. आता मार्ग सहज सापडत नव्हता. जस जसे वरती चढत होतो तस तसे कारवीच्या झाडांचे जंगल घनदाट होत होते. डोंगर माथा समीप येत आहे याचा अंदाज येत होता मात्र ही घळ संपायचे नाव घेत नव्हती. मागे असलेले पुढे गेलेल्याना विचारत होते पोहोचलो का रे???? हि वाट चढताना हरिश्चंद्र गडाच्या नळीच्या वाटेची आठवण ट्रेकर्सना झाल्याशिवाय राहणार नाही. आणखीन एक रॉक प्याच पार करत आम्ही वरती सरकलो. आता दुपार ढळून गेली होती साधारण ४ वाजले होते. सुर्य मावळायच्या आता आम्हाला माथा गाठायचा होता. आता कारवीचे अगदी घनदाट जंगल लागले. वाट अशी काही दिसतच नव्हती. काटेरी झुडपे आणि कारवीचे जंगलातून वाट करत पुढे सरकत होतो. आता आमचे लक्ष जवळ आल्याची जाणीव होत होती मात्र या कारवीच्या वनात कमरेतून वाकूनच डोंगर चढावा लागत होता. काटे टोचत होते, अंगावर ओरखडे उमटत होते पण आता एकच लक्ष दिसत होते. घनचक्कर माथा गाठायचाय एकाच वेडा पाई आम्ही वर चढत होतो. कारवीच्या जंगलातून वाट काढतच आम्ही सपाट मैदानात पोहोचलो. आजू बाजूला सफेद रान फुले फुलली होती अंगावर उठलेल्या ओरखद्यांना थंडगार वारा झोंबत होता. डोंगराच्या आडून मावळता सूर्य डोकावत होता. त्याची सोनेरी किरणे आम्हाला नाहू घालत होती. हे स्वर्गीय सुख आम्ही जिवंत पणे अनुभवत होतो.मेल्या शिवाय स्वर्ग दिसू शकत नाही अन गड सर केल्याशिवाय हा स्वर्गीय आनंद मिळवता येत नाही. आणि अश्या प्रकारे आम्ही घनचक्कर सर केला होता.
20151212_182235.jpg20151212_184905.jpg20151212_184741_1.jpg20151213_072417.jpg
आता आम्ही एका छोट्या पठारावर होतो.आमच्या डाव्या बाजूला शेरपुंजे गावाकडून येणारी वाट असावी आणि उजवी कडे एक चढाव दिसत होता म्हणजे आम्हाल अद्याप हि एक छोटीसी टेकडी चढून घनचक्करच्या मूळ पठारावर जायचे होते. या पठारावर छोटी छोटी झुडपे दिसत होती आत्ताच पावसाळा सरल्या कारणे आजू बाजूला हिरवळ दिसत होती. मात्र फार मोठी झाडे काही दिसत नव्हती. एक छोटेसे झाड समोरचा दिसत होते. त्याचा आसरा घेत. आम्ही त्याच्या बुंध्यापाशी आमच्या मणभर जड बॅगा टाकल्या. समोर सृष्टीने आमच्या साठी हिरवा गालिचाच पसरविला होता त्यावर आम्ही अंग झोकून दिले. किती हि नाही म्हणले तरी दिवस भराच्या शारीरिक श्रमाने आमचे शरीर थकले होते. प्रत्येकाने आप आपल्या बॅगेतून काहीना काही खाऊ काढला. सफरचंद,पेरू, कुरूमुरयाची भेळ,चणे शेंगदाणे,काजू बदाम असा अल्पोपहार, त्यावर थंडगार पाणी पीत आम्ही थकलेल्या शरीराला थोडा आराम दिला. सोबत दिवस भराच्या गप्पा, मजामस्ती चालू होतीच. तुम्हाला सांगू हे सुख अवर्णीय असते. ते मी तुम्हाला सांगूनही समजणार नाही. असो काळोख पडायच्या आता आम्हाला तंबूची जागा शोधून, तंबू लावायचे होते. म्हणून जास्त वेळ न काढता आम्ही पुन्हा पाठीवर बॅगा चढवल्या. उजव्या बाजूची टेकडी चढत आम्ही घनचक्करच्या मुख्य पठारावर आलो हे एक मोठ्ठे मैदान होते. या मैदानात गवत पसलेले होते आणि त्यावर असंख्य दगडी शिळा दिसत होत्या. जणू काही कधी काळी या पठारावर माणसाची वस्ती असावी. या पठाराच्या एका बाजूला म्हणजे भंडार दऱ्या बाजूला एक टेकडीची रांग होती. ही टेकडी म्हणजे घनचक्करचे सर्वोच टोक. तर दुसऱ्या बाजूला हरीश्चंद्रगडाचे दर्शन घडत होते. सुर्य अस्ताला जात होता, आभाळात लाल तांबडी अशी छटा पसरली होती, त्यात ढगांची गर्दी झाली होती असे सह्याद्रीचे विहंग दृश्य आम्ही याची देही याची डोळा अनुभवत होतो. या मैदानात साधारण सपाट अशी जागा पाहून आम्ही आमचे टेंट लावले. प्रत्येक ट्रेकला अभय हा आमचा मुख्य आचारी असतो. त्याच्या सूचने नुसार त्याला इतरांनी मदत करावयाची असते. हा आमचा अलिखित नियम बनलेला आहे. दगडाची चूल मांडून होत नाही तो वर अभयला चहा बनवण्याची ऑर्डर सर्वानु मते देण्यात आली. चहा पिऊन ताजे तवाने होत सर्व पुढील कामाला लागले होते. कुणी लाकडे गोळा करत होते. कुणी भाजी कापत होते, तर कुणी तांदूळ धुवत होते. आमच्या कडे पाणी फारच थोडे असल्याने ते फार जपून वापरत होतो. आजू बाजूला पाण्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तो असफल झाल. या सगळ्या गडबडीत काळोख कधी झाल कळलेच नाही आता संपूर्ण पठारावर काळोखाचे साम्राज्य पसरले होते. प्रत्येकाने आप आपले हेडल्याम्प बाहेर काढले होते. एका बाजूला जेवण तयार होत होते आणि आमच्या गप्पा नाही रंग चढत होता. थोड्याच वेळात कांदा-बटाट रस्सा भाजी आणि सोबत भात असा मस्त मेनू आमच्या पुढयात होता. भूक तर सपाटून लागली होती. अगदी अधाश्या प्रमाणे आम्ही त्यावर तुटून पडलो. अन्न दाता सुखी भवो म्हणत आम्ही टिशूला हात पुसत उठलो. जस जशी रात्र होत होती. थंडीचा कडाकाही वाढत होता. तस तसे एक एक करून आप आपल्या टेंट मध्ये शिरत होते. पण मी, मामा आणि धीरज शेकोटी जवळील दगडांवर बसून शेवट पर्यंत गप्पा मारत होतो. धीरजला अश्या डोंगरावरील काळोख्या रात्री आभाळातून पडणाऱ्या उलका बघण्यात फार मौज वाटते. पण फार वेळ बसण्यात काही अर्थ नव्हता. उदया लवकर उठणे गरजेचे होते. आणि शरीरालाही विश्रांतीची गरज होती. आम्ही तिघे हि टेंट मध्ये शिरून निद्रा देवीच्या कुशीत स्वाधीन झालो.
नेमकी पहाट कधी झाली कळले नाही पण मी टेंट मधून बाहेर येईस्तोवर आमच्यातील अर्धी मंडळी घनचक्करच्या सर्वोच्य टोकावर म्हणजेच त्या टेकडीवर पोहोचली होती. काल बरचसे पाणी संपले होते. त्यामुळे दात घासण्याचा तर काही प्रश्नच नव्हता. थोड्या पाण्याने चुळ भरली. दातावरून हात फिरवला. आणि दोन घोट पाणी पिऊन घेतले. पण पुढचा प्रश्न टाळण्या जोगा नव्हता. मग अभयने त्याच्या मुला साठी आणलेले Johnson's baby tissues / Fresh- Wet Wipes माझ्या मदतीला धावून (धुवून) आले. असो हे सर्व कार्यक्रम आटपे पर्यंत बाकी मंडळी पूर्ण पठाराला चक्कर मारून आली होती. सत्येन आणि धीरुने पोहे आणि चहा बनवायची जवाबदारी घेतली. आणि तो पर्यंत आम्ही भैरव गड पाहण्यास निघालो. भैरव गड हा शेरपुंजे गावातून येणाऱ्या वाटेतच आहे. पण थोडे खाली उतरल्यावर ध्यानात आले कि आपण भैरव गडापर्यंत गेलो तर दुपार होईस्तोवर आपण पुन्हा टेंट पाशी पोहोचू शकणार नाही. आणि आज रात्री पर्यंत आम्हाल कोणत्या ही परीस्थितीत घर गाठायचे होते. उद्या सकाळी उठून सगळ्यांनाच ऑफिसला जायचे होते. म्हणून आम्ही माघारी फिरत टेंटच्या दिशेने निघालो. या मार्गात अनेक स्फटिक,गारगोटी समान दगड आपल्याला जागो जागी आढळतात. सानेने तर अख्खी बॅगच या दगडाने भरून घेतली होती. ‘हे एवढे वजन तू खाली नाही नेऊ शकणार’ असा समजावण्याचा निर्थक प्रयत्न आम्ही केला. पण त्याने एक अन एक दगड घरापर्यंत अगदी सुखरूप नेला.
आम्ही टेंट जवळ पोहोचताच गरम पोह्यांचा वास नाकात शिरला. गरमा गरम चहा ही उकळी घेत होता. मग काय पोह्यांचा टोप रिकामी होईस्तोवर एकही माणूस जागचा हलला नाही. चहा पोहे खाऊन तृप्त होत आम्ही सामानाची आवरा आवर केली, टेंट प्याक केले, बॅगा खांद्यावर टाकल्या आणि निघालो.
आज लवकरात लवकर पायथा गाठून आम्हाला घराकडे निघायचे होते. पण आम्ही ज्या घळीच्या मार्गाने वरती आलो त्या मार्गाने खाली न उतरता आम्ही गावकरी ज्या मार्गाने गावल देवाला येतात त्या मार्गाने खाली उतरू या असे आमचे ठरले.
आम्ही गावल देवाच्या डोंगराच्या दिशेने निघालो. घनचक्करच्या डोंगराला वळसा घेत आम्ही पश्चिम दिशेला खाली उतरायला लागलो. उतरत असतानाच समोर आम्हाला एका छोटासा पण स्वच्छ पाण्याचा ओढा दिसला. आम्ही धावतच पाण्याकडे गेलो. बऱ्याच काळाने आम्हाला स्वच्छ पाणी अनुभवायला मिळत होते. सर्प्रथम पाणी पिऊन मन तृप्त करून घेतले मग पिण्यासाठी पाण्याचा बाटल्या भरून घेतल्या, हातपाय तोंड स्वच्छ धुऊन घेतले. ‘पाणी म्हणजे जीवन’ या वाक्याचा अर्थ अनेक वेळा आपल्याला समजवून ही समजत नाही पण निसर्ग मात्र याचा नेमका अर्थ बरोबर समजावतो. त्या गार पाण्याची गोडी काही औरच.... हे पाणी जास्तत जास्त अद्याप एक-दोन महिने टिकू शकते. म्हणून मार्च एप्रिल मध्ये घनचक्करला तरी कुणी येऊ नये. पाण्याशिवाय जीव जाण्याची वेळ येऊ शकते.
आम्ही पुढील वाटेवर निघालो. वरून चालत असताना उजव्या बाजूस भंडारदरा डॅमचे सुंदर दृश्य दिसत होते. पण या वर्षी पाऊस फारच कमी पडला असल्याने डॅम अर्धा-अधिक रिकामीच दिसत होता. मजल दरमजल करत आम्ही गावल देवाचा डोंगराला ही आम्ही संपूर्ण वळसा मारला. पण नेमकी वाट काही आम्हाला सापडत नव्हती. आम्ही घनचक्कर वरून निघून जवळ जवळ दोन तास होऊन गेले. तरी आम्हाला उतरण्याची घळ, पाऊलवाट असे काही ही सापडत नव्हते. आम्ही फक्त सरळच चालत होतो. आम्ही डोंगरावर डोंगराना चकरा मारत होतो. मात्र एवढी चाल करून ही आम्ही दहा वीस मीटर देखील खाली उतरलो नव्हतो. गावलदेवाचा डोंगर ही आता मागे पडला होता. आता आम्हाला समोर कात्राबाईचा डोंगर दिसू लागला होता. अद्याप दोन टेकडी वजा डोंगरांना चकरा मारल्या तर आम्ही कात्राबाई पास पर्यंत पोहोचणार होता. अमोल आणि बाकी टीम गेल्याच वर्षी त्याच मार्गाने कात्राबाईला येऊन गेले असल्याने आता कात्राबाई पासने खाली उतरू या असे ठरले. एका झाडाखाली थोडे पाणी पीत, उरलेले थेपले खाल्ले. ते थेपले आता अगदीच रुक्ष झाले होते. पाण्या सोबत ते नुसते ढकलले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मला माझी आजी लहान पणी नेहमी म्हणायची “भुकेला कोंडा अन निजेला धोंडा मिळाले कि झाले” तसेच काही से आमचे गेले दोन दिवस चालू होते. असो आता सूर्य माथ्यावर तळपत होता. एक वाजून गेला होता. आम्ही पुढील वाटेवर निघालो या संपूर्ण वाटेवर एक प्रकारची काटेरी फुलांची असंख्य झाडे होती आणि त्याच झाडांतून आम्ही वाट काढत पुढे सरकत होतो. मी हाफ टी- शर्ट अन हाफ पॅट घातले असल्याने माझे हात पाय तर अगदी सोलून निघाले होते. कात्राबाई पासच्या दिशेने आम्ही एक एक पाउल पुढे सरकत होतो. मध्ये मध्ये कारवीचे जंगल लागत होते. काटेरी झुडपांनी तर जीव नकोसा केला होता. मधेच थांबत, चालत आता आम्ही कात्राबाईच्या अगदी जवळ पोहोचलो. अमोल,सानेला ही नेमका रस्त्याची ओळख पटली. आणि आमच्या मनाला हायसे वाटले. थोडे थांबून फळे खाऊन चोक्कोलेट चघळत आम्ही उतरायला सुरवात केले. डोंगराला वळसे घेत घेत साधारण ४.०० ला आम्ही खाली उतरलो. डोंगरा खाली एक छोटासी नदी वाहत होती. आजूबाजूला झाडे असल्याने मुबलक सावली ही होती, थंड गार वारा वाहत होता. सकाळी ९ ते ४ असे अविरत चालल्याने आमची शरीरे ही आता थकली होती. नदीच्या कडेला असलेल्या सपाट दगडावर बॅगा फेकल्या आणि आडवे झालो. नेमका किती वेळ गेला माहित नाही पण आमच्या अंगावरील संपूर्ण घाम आता सुकला होता. नदीच्या थंडगार पाणी तोंडावर मारुन, हातपाय स्वच्छ धून आम्ही ताजे तवाने झालो. थोडावेळ तसेच नदीच्या पाण्यात पाय बुडवून गप्पा करत बसलो. पण जास्त वेळ बसण्यात काही अर्थ नव्हता लगेचच बॅगा सावरत आम्ही काकुंच्या घराकडे चाल मारली. साधारण १५ मिनिटात आम्ही मूळ रस्त्यावर पोहोचलो. येथून काकुंचे घर १ ते १.५ किलोमीटर असावे. काकुंच्या घरी पोहोचताच काकुनी थंडगार पाणी अन गरमा गरम चहा देऊन आम्हाला खुश केले.
आज घनचक्कर रूपाने अजून एक शिखर आम्ही पादाक्रांत केले होते. आपल्या रोजच्या सुखकर जीवनातून आपण जेव्हा अश्या जंगलातील खडतर जीवनात प्रवेश करतो तेव्हा या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यासाठी निद्रावस्थेत असलेला आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव नि अवयव जागृत होतो. आयुष्यातील नव्या संकटाना सामोरे जाण्यासाठी निसर्गाने दिलेली उर्जा घेऊन आम्ही घराकडच्या वाटेला निघालो.
-जय
20151212_155301.jpg20151212_155533.jpg20151212_130942.jpg20151212_131603.jpg20151212_131701.jpgIMG_20151212_131452.jpgIMG_20151212_135304.jpgIMG_20151212_144902.jpgIMG_20151212_150253.jpgIMG_20151212_150740_0.jpgIMG_20151212_152854.jpgIMG_20151212_162947.jpgIMG_20151212_160402.jpgIMG_20151212_160337.jpgIMG_20151212_161737.jpgIMG_20151212_162616.jpgIMG_20151212_165041.jpgIMG_20151212_173207.jpgIMG_20151212_173636.jpgIMG_20151212_180612.jpgIMG_20151213_070709.jpgIMG_20151213_070840.jpgIMG_20151213_072645.jpgIMG_20151213_072652.jpgIMG_20151213_072720.jpgIMG_20151213_083337.jpgIMG_20151213_092940.jpgIMG_20151213_093017.jpgIMG_20151213_072645.jpgIMG_20151213_072248.jpgIMG_20151213_072244.jpgIMG_20151212_135304.jpg12485816_1062104390486965_7228712924707715954_o_0.jpg12471908_1062104417153629_8452924889219380094_o_0.jpg12491794_1062104433820294_7991197764561575298_o_0.jpg12514057_1062104370486967_7070492005664386575_o_0.jpg
<20151213_072250.jpg20151213_072250.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The selected file IMG_20151213_072724.jpg could not be uploaded. The file is 1.33 MB exceeding the maximum file size of 153.6 KB.
१५३KB पेक्षा जास्त साईजचे फोटो अपलोड होत नाहीत आणि साईज छोटी केली कि फोटो लहान दिसतात. मला हे फोटो लेखात टाकण्यासाठी पण फार कष्ट पडलेत. फोटो अपलोड करताना मायबोलीची साइड पण खूप स्लो होते. मला मार्गदर्शन करा