फुसके बार – १३ जानेवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 12 January, 2016 - 13:25

फुसके बार – १३ जानेवारी २०१६

१) 'लाजाळू' की ‘स्पर्श करू नकोस’

प्रत्येक जण एखाद्या घटनेकडे कसा पाहतो, त्यावरून काढलेले निष्कर्ष वेगळे असू शकतात.

आता हेच पहाना, लाजाळूच्या झुडपाला आपण तसे नाव देण्यामगे कदाचित कवीकल्पना असावी. हिन्दीतही त्याला छुईमुई किवा लाजवंती असे नाव अहे. मात्र या नावांपेक्षा इंग्रजीतील ‘Touch me not’ हे नाव अधिक समर्पक वाटते. त्याची परवानगी न घेता आपण त्याला हात लावणार आणि वर त्याने आपले अंग आक्रसून घेतल्यावर ते ‘लाजले’ असे आपणच सोयीस्करपणे समजणार. हा कोणता न्याय? म्हणूनच म्हटले, Touch me not हे नाव अधिक समर्पक वाटते. की ते सांगते अहे, की तुझे मला असे हात लावणे मला आवडलेले नाही. येथून गेलास/गेलीस तर थोड्या वेळाने मी पुन्हा उमलेन.

एखाद्या व्यक्तीला वा मुलीला हात लावला व परिस्थितीप्रमाणे ती बावरली व तिने अंग आक्रसून घेतले तरी आपण ती व्यक्ती वा मुलगी लाजली, अशी समजुत करून घेणार का? उलट तो तर विनयभंग ठरू शकेल.

हे म्हणजे वर उल्लेख केलेल्या कवीकल्पनेऐवजी त्याकडे थोडे कायद्याच्या दृष्टीकोनातून पाहण्यासारखे झाले.

यामध्ये मला एका कवितेचे किंवा शेराचे बीज दिसते आहे. कोणी मनावर घेईल काय?

२) आज विवेकानंदांची जयंती. त्यांनी अमेरिकेत जाऊन केलेल्या ‘ब्रदर्स व सिस्टर्स’ या ऐतिहासिक भाषणाची नक्कीच आठवण होणार. ती परिषद विविध धर्मांमधली होती. पण त्या काळात आपल्या धर्मात तरी एकमेकांना ब्रदर्स व सिस्टर्स म्हणण्यासारखी समानता होती का? त्यानंतर शंभरापेक्षा अधिक काळ उलटून गेल्यानंतर आज तरी तशी परिस्थिती आहे का?

अर्थात दोष विवेकानंदांचा नाही, आपला आहे.

३) आजच जिजाबाईंचीही जयंती.

माहेर व सासरच्या दोन घराण्यामध्ये हाडवैर असल्यामुळे लग्नानंतर त्यांच्या मनाची जी तगमग झाली असेल, त्यावर कोणी सविस्तार भाष्य केल्याचे पाहण्यात आहे का?

ते सगळे पचवून अस्थिर राजकीय वातावरणात धीराने राहणे व एवढेच नाही तर त्यातून ‘पुढचा मोठा’ विचार करणे हे खरोखरच थोर काम आहे.

४) महात्मा फुलेंच्या चौथ्या व पाचव्या वंशजांपैकी काही जण संघाच्या शिवशक्तीसंगमात सहभागी झाले होते. याचीही बातमी झाली आहे. तीही तशी व्हायला नको होती. ते कुठल्या समाजवादाचा उद्घोष करणा-या पक्षाशी संबंधित असते, तर त्यांचे कौतुक केले गेले असते. मग भलेही त्या पक्षाचा प्रत्यक्ष समाजवादाशी काही संबंध नसेना का! किंवा काही विशेष करत नसते तरी कोणाला त्यांच्यात रस वाटला नसता.

मात्र तसे न होता ते संघात असल्याचे दिसल्यामुळे काही जणांचा मुड गेला आहे. अर्थातच त्यांना हे आवडलेले नाही.

आता कोणी म्हणत आहेत, की ते महात्मा फुले यांचे थेट वंशज नाहीत. कारण त्यांच्या दत्तक पुत्राला एक मुलगी होती, त्यामुळे त्यांचे थेट वंशज आता होले या नावाचे आहेत. तरी ‘ले’ सामायिक आहे हे विशेष.

शिवछत्रपतींच्या आजच्या वंशजांपैकी एकजण जवळजवळ सदैव तारेत असतात, तर दुस-यांना बळेबळे घोड्यावर बसवून त्यांच्या नावाने राजकारण केले जाते. हा आणखी एक प्रकार.

चार पिढ्यांमध्ये एवढा गोंधळ, तर इतर वंशावळींमध्ये काय होत असेल? एकूण ही ‘वंशज’ वगैरे भानगड मोठी किचकट आहे.

५) 'दहशतवादी' अफझल गुरू आणि त्याचा हुशार मुलगा

दहशतवादी कारवायांच्या आरोपांखाली फाशी दिला गेलेला अफझल गुरू याच्या मुलाला दहावीच्या परीक्षेत ९५% गुण मिळाल्याची बातमी वाचली.

वडलांना झालेल्या शिक्षेमुळे त्याच्याकडे समाजाचे डोळे नेहमी वेगळ्या नजरेने रोखलेले असणार. त्यातून अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हे काही साधे काम नाही.

तेव्हा दहशतवाद्याचा मुलगा म्हणून त्याची टिंगल करण्यापेक्षा त्याला या कामगिरीत साथ देणा-या त्याच्या कुटुंबियांचे स्वागत करू या. एक कुटुंब चांगल्या मार्गाला लागल्याचा चांगलाच परिणाम समाजावर होईल.

६) स्टार गोल्ड एचडी हे भलतेच धाडसी चॅनल आहे. सिनेमा चालू असताना मधूनमधून दाखवल्या जाणा-या जाहिरातींमध्ये ’थर्टी मुव्हीज टू वॉच बिफोर यू डाय’ मध्ये चक्क सिंघमचे नाव होते.

आता हा सिनेमा पाहिलाच नाही म्हणजे भरपूर जगायला मोकळे. अन्यथा इतका विनोदी सिनेमा पाहतानाच हसून हसूनच जीव जायचा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"याचीही बातमी झाली आहे"

झाली की पद्धतशीरपणे केली गेली? की बघा हेसुद्धा आमच्या वळचणीला आले. आम्ही आता त्यांचे नाव घेऊ लागलो. त्यांचे वंशज आमच्याकडे आले. म्हणजे फुले दांपत्याची विचारसरणी आणि आमची विचारसरणी एकच नाही का?

मनमोहनसिंग यांच्या ज्या (सावत्र)भावाचं नावही कधी ऐकलं नव्हतं त्यांचा भाजपप्रवेश चक्क भावी पंतप्रधानांच्य उपस्थितीत मोठा गाजावाजा करून झालेला ते आठवलं.