फुसके बार – ११ जानेवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 10 January, 2016 - 14:39

फुसके बार – ११ जानेवारी २०१६

आजच्या फुसक्या बारांमध्ये शिक्षण क्षेत्रातले काही अनुभव

प्रसिद्ध शिक्षणाधिकारी व शिक्षणतज्ज्ञ व्ही. व्ही. चिपळूणकर पंढरपूरच्या विठ्ठलदर्शनाला गेलेले असतानाची गोष्ट.

विठ्ठलदर्शन झाल्यावर पंढरपुरातील शाळांमध्ये कोणते उपक्रम चालू आहेत याची त्यांनी चौकशी केली. तेथील विवेकवर्धिनी या शाळेत एक विज्ञानप्रदर्शन चालू असल्याचे त्यांना कळले. प्रदर्शन तर प्रदर्शन, ते तरी पाहू, म्हणून ते शाळेत दाखल झाले.

प्रत्येक वर्गात प्रदर्शन चालू असल्यामुळे शाळेतील वर्गांना सुट्टी. नवनवीन प्रयोग मांडलेले. प्रत्येक मुलाकडे स्वत: चौकशी करून त्यांना त्या प्रयोगाची खरोखरच माहिती आहे की नाही याची खात्री करून घेतली. मग प्रश्नांची गाडी आली शास्त्राच्या प्रयोगशाळेवर. साहेबांना प्रयोगशाळा पाहण्याची हुक्की आली. सगळी उपकरणे जागेवर. प्रयोगांची यादी तयार. मुलांच्या प्रयोगाच्या वह्याही तयार. पण त्यांचा विश्वास बसेना की हे प्रयोग खरोखर विद्यार्थ्यांनीच केले असावेत हा? झाले, मग विद्यार्थ्यांच्या एका वर्गाला पाचारण.

त्यांना हवा तो प्रयोग विद्यार्थ्यांनी करायचे ठरले. अट अशी की मुलांनी त्यांना हवे ते प्रयोग साहित्य प्रयोगशाळेतील सहाय्यकाकडून मागवून घ्यायचे. शिक्षकांनी त्यांना असे करा वा तसे करा वगैरे सांगायचे नाही. मुलांनी अगदी तसेच केले. प्रयोग व्यवस्थित पार पडले. साहेब खुश.

लपवण्यासारखे काही नसले तर ब-याच गोष्टी किती सोप्या होतात पहा.

मागे हेमलकसाला गेलो असता प्रकाश आमटेंनी सांगितलेला अनुभव. ते तेथे शाळा चालवतात. शाळातपासनीस येतात, तेव्हा त्यांच्या काही खास ‘अपेक्षा’ असतात. मात्र त्यांना स्वच्छपणे सांगितले जाते की तेदेखील मुलांसाठी शिजवलेले अन्नच खातात, त्यामुळे याबाबतीत कोणाची काही खास सरबराई केली जाणार नाही. तेव्हा तुमच्या शाळेला प्रतिकूल शेरा देऊ वगैरे धमक्यांचाही काहीच उपयोग होत नाही. जे आहे ते तुमच्यासमोर आहे, हवा तसा शेरा देऊ शकता असे हेच सांगतात. अशा कर्मदरिद्री लोकांमुळे तेथे शाळातपासणीसाठी जायलाच तपासनीस नाखुश असतात.

तर मग चिपळूणकरांनी शाळेतील इतर विज्ञानविषयक उपक्रमांची माहिती विचारली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून लिहिण्याची शाई तयार करून घेतली होती. चेह-याला लावण्याचा स्नो तयार केला होता. असे विविध उपक्रम होते. उदा. ती शाई विकून जो विद्यार्थी अधिकाधिक पैसे कमावेल त्याला त्या महिन्यात लागणारी सारी शाई मोफत. आजच्या काळात शाळेत तयार केलेला स्नो वगैरे विकण्याची परवानगीही कदाचित मिळणार नाही. पण अशा उपक्रमांमुळे व एकूणच शिक्षणाधिकारी खुश झाले.

त्यांनी सदर शिक्षकांचा आपल्या धडपडमंडळात समावेश केला.

त्या मंडळातील काही शिक्षकांनी कशाकशावर संशोधन केले होते ते पाहता त्यांचा एकूण हुरूप वाढला.

एका शिक्षकाने संशोधन केले होते ते मुले शाळेत उशीरा का येतात या विषयावर. अनेकदा शिस्तीचा बडगा दाखवून मुलांना अशा बाबतीत विविध प्रकारच्या शिक्षा सुनावल्या जातात. पण त्यामागे मुलांच्या खरोखर काही अडचणी आहेत का हे विचारले जात नाही. एका गावातील खाटकाचा मुलगा मधूनमधून शाळेला दांडी मारे. त्याबाबत त्याच्या वडलांना विचारले असता त्यांनी सांगितले की आठवड्यातल्या दोन दिवशी जवळच्या बाजारांच्या ठिकाणी जावे लागते. त्या दिवशी मुलाला शाळेत पाठवले तर आम्ही खायचे काय? अशा बाबतीत काय कारवाई करावी? कारवाई करण्याऐवजी शिक्षकांनी त्या मुलाला दोन दिवस अनुपस्थित राहण्याची मुभा दिली. मात्र त्या दोन दिवसात त्याचा बुडालेला अभ्यासक्रम वर्गातील मित्रांच्या सहाय्याने पूर्ण करण्यास त्याला सांगितले गेले. शाळा एवढी मुभा देते आहे, हे पाहिल्यावर एखाद्याच्या बेशिस्तीने वागण्याला आणखी पंख फुटायला हवे होते. पण येथे ती बेशिस्त नव्हती, तर गरज होती. या सवलतीचा परिणाम म्हणून तो मुलगा पुढे एम.पी.एस.सी परीक्षा पास झाला.

कित्येक शाळांमध्ये शाळेचेच काय, परीक्षाशुल्कही भरू न शकणारी मुले असतात. अशा मुलांना वा त्यांच्या पालकांना पैसे भरण्याची सोय करा अशी नोटीस काढली किंवा उद्या पैसे आणा असे सांगितले तर ती मुले दुस-या दिवशी शाळेत येतच नाहीत. तेव्हा अशा नोटिसा पाठवून आपण मुलांचे नुकसानच करत आहोत हे पाहून एका शिक्षकांनी त्यावरचा उपाय शोधला. मुलांच्या पालकसभेत त्यांनी सर्वच सधन पालकांना याबाबतची कल्पना दिली. तुमच्या पाल्याची शैक्षणिक स्थिती चांगली असली तरी शाळेतली काही मुले याबाबतीत तुमच्या पाल्याएवढी नशीबवान नाहीत. त्यांना तुम्ही मदत करू शकलात तर त्या मुलांचे भले होईल. अशा प्रकारचे आवाहन केल्यानंतर अनेक पालक इतर मुलांना आर्थिक मदत करण्यास तयार हातात याबाबतचा अनुभव त्यांनी सांगितला.

झोपडपट्ठीतली मुले म्हणजे वाईट संगत सोडण्याची इच्छा नसलेली मुले असेच समीकरण नसते असे एका शिक्षकांनी सांगितले. त्यातल्या अनेक मुलांचीही तेथील अशैक्षणिक वातावरणातून बाहेर पडण्याची इच्छा असते. त्यासाठी ती मुले दिव्याच्या खांबाखाली बसून, पावसाळ्याच्या दिवसात तर रात्री बंद असलेल्या बसेसमध्ये झोपण्याचा आसरा शोधत आपली प्रगती करून घेण्याच्या ध्येयाने प्रेरीत झालेली असतात, असेही त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी या मुलांना अभ्यासासाठी अभ्यासिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.

याबाबतीत झोपडपट्टीतलीच मुले जाऊ देत, काही शाळा एकूणातच कशी बनवाबनवी करतात हेदेखील त्या शिक्षकाच्या लक्षात आले. वडलांची बदली निमशहरी भागात झाल्यामुळे एक मुलगा दहावी झाल्यावर मुंबई सोडून तेथे पुढील शिक्षणासाठी गेला. दहावीत उत्तम गुण मिळालेले. नवीन शाळेतील वातावरण असे की अनेक शिक्षक काही वर्गांवर जाण्यासही घाबरत. कारण काही विद्यार्थी हातात सुरा घेत ‘तू फार बडबड करतोस, वर्गावर यायचेच नाही’ अशी थेट धमकीच शिक्षकांना देत. दुर्दैवाने हा मुलगाही अशाच वर्गात. तेव्हा शाळेत वर्ग होत नाहीत, तर मग करायचे काय या विवंचनेत सापडलेला. त्याची ही अडचण गावातील दुस-या शाळेतील एका शिक्षकांच्या कानावर गेली. त्यांनी विविध विषयांच्या शिक्षकांना गाठून त्या मुलाला शाळेच्या वेळानंतर दररोज मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली. पण हे करायचे तरी कोठे, गावातल्या एका वकिलाने त्याच्या ऑफिसमधील एक खोली यासाठी उपलब्ध करून दिली. वडील दारू पिणारे. मुलगा या खास शिकवणीवरून घरी परतताना वडील रस्त्यात कोठे तरी दारु पित बसलेले दिसायचे. त्याने ही बाबही शिक्षकांच्या कानावर घातली. शिक्षकांचा मोर्चा त्याच्या घरी. तुमचा मुलगा हुशार आहे, पण तुमच्या अशा पिण्यामुळे व एकूणच वागण्यामुळे त्याच्या अभ्यासावर परिणाम होतो. तेव्हा तुम्ही त्याची बारावी होईपर्यंत तरी दारू पिणे सोडून द्या. अन्यथा आम्ही सगळे व तुमचा मुलगा घेत असलेली मेहनत वाया जाईल. खरे तर हे दुस-या शाळांमधले शिक्षक व तो वकील हे लोक या मुलाचे कोण? पण चमत्कार झाला. वडलांनी शिक्षकांचे म्हणणे मानले. अशी दोन वर्षे भरपूर मेहनत घेणारा हा मुलगा बारावीत सगळ्या महाराष्ट्रात पहिला आला. चमत्कार झाला. पण झाले काय. की त्याच्याकडून फी वसूल करण्याशिवाय त्याच्यासाठी दोन वर्षे इतर काहीही न करणा-या शाळेला निकालानंतर मात्र आठवले, की हा मुलगा त्यांच्या शाळेत होता. की त्यांची भली मोठी जाहिरात सुरू. की आमच्या शाळेचा विद्यार्थी संपूर्ण राज्यात पहिला आला. तो मुलगा दहावीला मुंबईत ज्या क्लासमध्ये जाई, त्या क्लासची जाहिरात की ‘त्यांचा विद्यार्थी’ बारावीला पूर्ण राज्यात सर्वप्रथम आला.

चिपळूणकर शिक्षकांना उद्देशून याबाबतीत नेहमी एक उदाहरण देत.

रेसचा घोडा असतो. तो जिंकण्यामध्ये सर्वात मोठा सहभाग कोणाचा असतो? कोणी म्हणे त्याच्यावरील जॉकीचा, कारण तोच त्याला जिंकण्यासाठी मोटिव्हेट करतो, प्रेक्षकांचा, कारण त्यांच्या पाठिंब्यामुळे, उत्साहाने घोड्याला धावण्याची स्फूर्ती मिळते, घोड्याच्या मालकाचा, कारण त्याने अशा घोड्याची पारख केली. पण ही कारणे देत असताना कोणाच्याच लक्षात हे येत नाही की त्या घोड्याला स्वत:लाच जोपर्यंत वाटत नाही की आपण पहिले यावे, तोपर्यंत कोणी काही करू शकत नाही. अर्थात या युक्तिवादात घोडा म्हणजे स्वत: विद्यार्थी; त्यालाच जोपर्यंत स्वत:हून वाटत नाही की आपल्याला आयुष्यात काही करून दाखवायचे आहे. तोपर्यंत काही होऊ शकत नाही, तोपर्यंत काही होणे अवघड असते.

बाकी घोडे सगळीकडेच आहेत. कोणाला कोण पारखी मिळतो, कोण जॉकी मिळतो, पाठिंबा देणारे प्रेक्षक मिळतात यावर त्यांच्यातल्या ब-याच जणांचे नशीब ठरते. कारण सगळेच घोडे स्वयंभू नसतात.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users