अन् मी झाडावर न चढण्याचा संकल्प सोडला.

Submitted by आवारा on 10 January, 2016 - 04:57

तसं मला झाडावर चढायला लय आवडतं. म्हणजे कसं समजा कालेजात जातांन्ना सोबत्या बोल्ला की, ती पोट्टी बघ तुह्याकडे पायतीय तरं मी लगेच पटकण झाडावर.... मग पायणारचं ना भाऊ मी दिसतोच तसा ह्यँन्डसम, पाय तु तिला दोनच दिवसात पटावतो का नाही ते! आणि तिसरा दिवस उजाडता-उजाडता मी झाडाच्या खाली आणि तो सोबत्या मला खिजावण्याच्या नादांत झाडावर पायतो तव्हा पण लगेच आपलं उत्तर तय्यार आसतं. आरे ती आपल्याला परवडणार आहे का.. तिचा किती खर्च रायतो दिवसाचा ... (मग हळूच खिशात हात घालून चिल्लर आहे का नाही ते पाहत) ते बी करू रे आपून पण ती लयच लफडेखोर आहे असं म्हणत्या. म्हणजे झाडावर चढणं मला तसं आवडतं असलं तरि बी आपले काही नियम हाय, उगाच लोकांसमोर आपण कधीबी झाडावर चढत नाही आणि चढलोच तर त्यांना कळू देत नाही...
एकदा आसच घरि पाहूणे आले होते. तर तात्यानी त्यांना सागीतलं की मी कालेजात जातो आणि मला इंग्रजी चांगलं येतं.. ते पाहुणे माझ्या तोंडाकडे पाहू लागले.(कदाचित तोंड पाहून वाटत नसेल त्यांना) पण मी बी लगेच झाडावर चढून तेवढ्याच आततमइशवास का काय म्हणत्या त्यानं तात्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. पण मला काय माहित त्यातल्या पाहूण्याला इंग्रजी येतं अन् आली तरि त्ये ब्येनं मला इचारन म्हणून... त्ये लगीच मला इंग्रजीतुन काहीतरि इचारू लागलं. मला वाटलं होतं त्ये इचारून इचारून काय इचारन "वाट इज युवर नेम" पण त्ये जरा जास्तच शानं निघालं. आस काहीतरि इचारलं की मला बी कळ्ळ नाही. मग मी काही आयकालाच आलं नाही आशा भावातं इकडे तिकडे पाहू लागलो... मला वाटलं त्ये मला काय परत इच्चारणार नाही, तस मी मनातल्या मनात देवाचा नावाचा जप चालू केला व्हता की, याची वाचा आजच्या दिवस घालवं पण देवाला बी माझी दया आली नाही आणि त्ये ब्येनं पुन्हा बोललं. पण ह्या वेळेला कायतरि करायला पायजे व्हतं कारण सागळ्याची नजर माझ्यावर होती आणि त्यात तात्यापण होतेच. पण तेवढ्यात साक्षात् देवच माझ्या मदतीला आला तसा माझ्या सोबत्यानं मला दाराबाहेरून आवाज देला अन् मी पळतचं घराबाहेर पडलो. नंतर मात्र पार रात्र झाली तवाच घरि गेलो. तात्यांनी तसं मला इच्चरलं पण त्यांना इग्लीश येत नसल्यानं मी त्यांना सांभाळून घेतलं... म्हणजे झाडावर चढल्यावर खाली कसं उतरायचं हे मला आत्ता बरचं समजलं होतं पण यानंतर मी सावध होऊनच झाडावर चढायचं ठरवलं....
एकादा कालेजात सोबत्यांनं मला परत झाडावर चढवलं ते एका कार्यक्रमामध्ये भाषण देण्यासाठी मी पण तेवढ्याच जोमानं भाषणाला तय्यार झालो. आणि स्टेजवर गेलो... विषत होता "आपलं कालेज"

सन्माननीय व्यासपीठ आन् इथे जमलेल्या माझ्या मित्र आणि एक सोडून बाकीच्या मैत्रिनींनो... (असा उच्चार करताच बरोबर सगळे पोट्टे पार टाळ्याच्या कडकडाटात हासायला लागले...कोप-यात बसलेली "ती" मात्र लाजत होती... मी स्टेजवर पाह्यलं तर कालेजाचा तो म्हतारा प्रिसिपलं मला इचित्रच, रागट नजरेनं पाहत होता पण मी त्याच्याकडे न पाहण्याचं ठरवून भाषणाला सुरूवात केली कारण आता मी झाडाच्या पार शेंड्यावर होतो) तर मित्रानो माझ्या भाषणाच्या विषय हा माझा पण आवडता विषय आहे, "माझं कालेज" म्हणजे दोन वर्षा पुरवी मी या कालेजात आलो. अन मला इथले गुपितं कळतं गेले आणि तेच मी तुमाला पण सांगणार आहे . कारण त्याची उघड चर्चा आजपर्यन्त झालेली नाही.... तर आयका मग... जेव्हा जेव्हा शेजारच्या वर्गावर काळे मँडमांचा तास आसायचा तेव्हा तेव्हा आमच्या वर्गात देसले सर आसल्यावर सगळा तास होइस तोवर आमाला गप्पा माराला भेटायच्या कारण आजही माहित नाही पण या दोन शिक्षकांमुळे आम्हाला खुप एनजॉय करायला मिळला चालू तासात गप्पा मारायला. या कालेजानं आम्हाला असले उत्तम शिक्षक दिले..( बोलतांना देसले सरांकडे नजर गेली अन त्ये काळ्या-निळ्या डोळ्यांनी माला पाहत असल्याचं जाणवलं, मँडमकडे वळून पायलं तर त्या खाली पाहत होत्या पण मला आज भाषण करायचंच होतं मी पुढे बोलू लागलो) या कालजच्या प्रिसिपल सरांनीही आम्हांला खुप जिव लावलाय जसा ते आपल्या कालेजातील शिपायी बाईला लावतात तसा................... आणि काय झालं काय माहित एकदमच त्यानी माझ्या हातातून माईक हिसकावला आन् ओढतच मला त्याच्या कँबीन मधे घेउन गेला. मला काही कळत नव्हतं मी काय केलं ते मी तर प्रामाणिकपणे कालेज विषयी सांगत होतो पण त्या दिवशी त्यानी मला लैच झापला..... आन् १ जानेवारीला मी पण संकल्प सोडला की यानंर झाडावर चढायचं नाही....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या कालजच्या प्रिसिपल सरांनीही आम्हांला खुप जिव लावलाय जसा ते आपल्या कालेजातील शिपायी बाईला लावतात तसा >>> Lol

अजून वाढवता आलं असतं.