तीन स्त्रिया

Submitted by भारती.. on 9 January, 2016 - 09:15

तीन स्त्रिया

तीन स्त्रिया भेटल्या रेल्वे कंपार्टमेंटमध्ये सुंदर सजलेल्या पण उदास तशा उतारवयीनच तरी तेजतर्रार तल्लख आणि होय मादकही जसं असलंच पाहिजे स्त्रियांनी नेहमीच काही विशेष प्रयत्न न करता किंवा केले असतील तर तसं न दर्शवता. तर तीन स्त्रिया सोबतच निघालेल्या शहरातून उपनगराकडे की उपनगरातून खेड्याकडे की त्याहीपलिकडे ते नव्हते कळत तरीही भाव दूरच्या प्रवासाचे ताण दिगंतराचे ओथंबलेले डोळ्यात मला तरी दिसले म्हणून मी विचारलं त्याना शिष्टाचार म्हणून जो दाखवण्यापुरताच उरला आहे आताशा शहरात की कुठे निघाल्या आहेत त्या या रेल्वे कंपार्टमेंटमध्ये कधीच दिसल्या नाहीत पूर्वी नवीनच आहेत का इथे आलेल्या किंवा इथून जाणाऱ्या पुढच्या प्रवासाला.यावर तिघीही रोखून पाहू लागल्या माझ्याकडे अशा की पुरती गडबडून गेले मी.ऐकले होते राजस्त्रियांबद्दल तशा तिखट वाटल्या बायका शिवाय भांडकुदळ तर नाहीत ना मला नाही जमत भांडायला जरी मनातल्या मनात खूप चिडत असते मी. तसे असेल तर हळूच सरकत पलिकडे गर्दीत लोपून जावे मी स्वत:लाच म्हटले तर काय आश्चर्य गर्दीच कुठे लोपून गेली तेव्हा कुणास ठाऊक आणि गाडीने भलतीच गती घेतलेली जणू स्थळकाळाच्या पलिकडचे स्थानक गाठायचे होते तिला. इकडे तीन चिडक्या बाया आणि मी एकटी अचानक दुर्बल वगैरे. आहेत की काय या कोपलेल्या देवींपैकी कंबख्ती माझी कशाला पडले यांच्या भानगडीत मी खरेच सांगते मला सवयच नाही चौकशा करायची यांनीच मोहिनी तर नाही घातली मला अशाही गोष्टी हल्ली ऐकू येतात कुठेकुठे. आज बरी नसावी माझी वेळ कुठे घेऊन चालली आहे गाडी मला की याच बाया अपहरण करताहेत माझं. तर तिघीही मला घेरून अगदी खेटून उभ्या राहिल्या आणि एकजण हसत म्हणाली आम्ही तिघीजणी जवळच्या मैत्रिणी नावं आमची प्रज्ञा करुणा आणि शांती. प्रवासात असतो दिगंत फिरतो आज तुझ्यां या बकाल महानगरात उद्या अजून कुठे या ग्रहावर आणि तिथून पुढे आम्ही तरळून जातो हवेच्या झोक्याप्रमाणे पुढच्या पुढच्या पुढच्या मुक्कामी.माझी बोबडी वळून गेली असली तरी नजर भिरभिरत राहिली तिघींवर कोणाचं नाव काय असेल कोणाचं काम काय असेल विचारू का पुढचा प्रश्न की निसटायचा शोधू मार्ग कुठे आहे ती साखळी गाडी थांबवायची आज वापर करायची वेळ आली तिची .यावर करुणा (कारण तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसली मला दया) म्हणाली बयो आम्हालाच की ग घाबरलीस कशी ग विपरीत तुझी रीत घाबरलं पाहिजे तुझ्याच जगातल्या या प्रवासाला इथल्या हवेचेच वार झेलताना विव्हळ घायाळ होतो आम्ही ही शांती बघ हिचा स्पर्श देतो नवं बळ आम्हाला एरवी या प्रज्ञाचे फार हाल झाले असते अशा विषम प्रवासात लाडाकोडाची आहे बाई कुणाचं ऐकून घेणारी नाही असू दे ते या रेल्वे कंपार्टमेंटमध्ये चढलो आम्ही तुलाच पाहून तुझ्या आत आम्हाला दिसतं आहे एक भग्न आवार जिथे भणाण वारा वाहतो आहे शीतल. आम्हाला आजची रात्र देशील तिथे रहायला ? तिथे विश्रांती घेऊन उद्या आम्ही एका युद्धग्रस्त वाळवंटात जाऊ उडून. तापलेल्या तव्यावर शिंपडून पाणी आम्ही निघून जाऊ गात आमची गाणी. तीन स्त्रिया भेटल्या रेल्वे कंपार्टमेंटमध्ये सुंदर सजलेल्या पण उदास तुम्हाला शपथ घेऊन सांगते तो नव्हता भास..
-भारती ..
(''नीलमवेळ ''सन्ग्रहातून )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशयघनआहेपरंतुवेगळेचकाहीसांगायचेआहेकिकायाशीशंकायेऊनप्रतिसादद्यावाकिनद्यावाआशयघनआहेपरंतुवेगळेचकाहीसांगायचेआहेकिकायाशीशंकायेऊनप्रतिसादद्यावाकिनद्यावाससेद्वंद्वमनातसुरूजाहले.

ही दिर्घ पण विचारप्रवण करणारी गद्य कविता पुन्हा पुन्हा वाचली . त्यातल्या वैचित्र्यपूर्ण आशयाने माझ्यासारख्या चित्राची भाषा वाचू पाहणारया व्यक्तीच्या मनात जो अर्थ ध्वनित झाला तो मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतेय
यातली घटना मला दिसली स्वप्नमायेतल्या जादुई रुळावरून धावणारया जिंदगीच्या रेलसारखी . यातली ती सुद्धा प्रवासी आहे मानवी लोंढ्या बरोबर चढणारया उतरणारया प्रवाहपतिता सारखी तिची अवस्था आहे मृत्यू हेच मानवी जीवनातले शेवटचे स्टेशन जे कधीही येऊ शकते इतरांप्रमाणेच तीही थोडीशी धास्तावल्या स्थितीत आहे …अशात प्रवासाच्या एका टप्प्या वर रेल्वे कंपार्टमेंटमध्ये तिला त्या तीन प्रौढा भेटतात ज्यांच्या आंतरिक राजस सौन्दर्याचे बिंब त्यांच्या चेहऱ्यावरती पडलेले दिसत असते त्यांना या सरळ मार्गी ,निष्कपट मनाच्या… सरस्वतीची आराधना करणारया व जी बाह्यत : थोडी अस्वस्थ , असुरक्षित वाटल्याने असेल भयग्रस्त स्थितीत समुहात मिसळु पाहणारया मुलीत ,तिच्या निर्मळ अंत;करणात तात्पुरता आश्रय घ्यावासा वाटतो आहे. कारण बाहेर फारसं आशादायी वातावरण नाही . ग्लोबलायझेशनचे वारे शहरांच्या सोबतच त्यांचे अंधानुकरण करणारया खेड्यांचा देखील वेगाने कायापालट करीत आहेत . विज्ञानाच्या अफाट प्रगतीच्या मुळाशी प्रखर बुद्धिमान मानवी मेंदू आहे ज्यामुळे काही चांगल्या उपयुक्त गोष्टी बरोबर काही मानवसंहार करणारया हिंसक अस्त्रांचीही निर्मिती झाली आहे व त्याच बरोबर वाढत्या यांत्रिकीकरणाच्या जोरदार रेट्यामुळे शहरातली मूळ सभ्यता , संस्कृती नी मानवता हरपत चाललीय .अशा बुद्धिमत्तेला प्रज्ञा म्हणता यॆत नाही प्रज्ञा जी आता फक्त दूर कुठेतरी भग्न गुम्फेतल्या शांतीचे निधान गवसल्या ,कमालीच्या कारुण्यमयी अशा बुद्धमूर्तीच्या चेहऱ्यावरून ओसंडताना दिसते जिची फारतर कल्पना करता येते. यातल्या त्या तिघी जेथे जेथे दहशतवाद असंतोष उफाळुन येतो तिथे अल्पशा उरलेल्या या मानवतेच्या सहाय्याने बिकट अवस्थेतल्या तगमगत्या जिवांवर आशेचं प्रेमसिंचन करू पाहतात...
असो ,काव्यसमीक्षा हा माझा प्रांत नाहीये तरी पण माझ्यासाठी ही कविता उकलणे म्हणजे एका नव्या अनुभवाचा प्रवास आहे.

भुईकमळ, चांगला प्रयत्न.
कवयित्रीने कुठेही विरामचिन्हे, अवतरणचिन्हे वापरलेली नाहीत, परिच्छेद पाडलेले नाहीत याचे कारण सांगू शकाल का ? भारतीतैंच्या कवितांचा उच्च दर्जा पाहता ही चूक अजाणता नाही झालेली एव्हढे तरी सांगता येऊ शकेल.

शंकर महादेवनच्या ब्रेथलेस सारखा एक उत्कट सलग विचार शब्दांत मांडण्याचा प्रयत्न वाटला, डिफरन्ट !!

मनापासून आभार लोक्स !
भुईकमळ , जणू कवितेच्या अंतरंगात शिरून विवरलेले तिचे रंग ! खूप तरल .अमेयचं निरीक्षणही बरोबरच.

मित्रांनो , prose-poetry या संज्ञाप्रवाही शैलीत मी दोनच रचना आजवर केल्या आहेत. ही सुंदर संज्ञाप्रवाही शैली स्वप्न-वास्तवाच्या क्षितीजरेषेवर आशयाशी खेळत त्याच्या गाभ्याला स्पर्शू पाहते ..
प्रज्ञा , करुणा, शांती - जणू तीन स्त्रिया, स्वतंत्र अस्तित्वविशेषांनी नटलेल्या, त्यांच्यावर काही लिहावं अशी इच्छा मला ओढतच या आकृतीबंधाकडे घेऊन गेली .

एक महत्वाचा विचार अलीकडे वाचनात आला - जे परिचित आहे त्याला अपरिचित करून विचारांना दचकवून जागं करणं हे कवितेचं काम..

काही कारणास्तव गेला सप्ताह जालीय घडामोडीपासून काहीसा दूरच होतो. काल रात्री भारतीच्या तीन स्त्रिया त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वविशेषांनी भेटल्या. वाचताना डोक्यात त्यांच्याविषयी सहप्रवासी या नामाशिवाय अन्य ओळख येत नव्हती....प्रवास संपता संपता भारती म्हणते तसे त्या तिघीनींही दचकवून सोडले खरे....ही किमया त्यांची नसून कवयित्री भारतीचीच.....वाचकाला वेडे करून सोडणारी.

कर बाई...अजून जितके करू वाटते तितके....तुझ्यामुळे वेडे झालो हे सांगण्यात खरेतर शहाणपणाच आहे.

सर्वश्री कापोचे, अमेय, भुईकमळ....यांच्या प्रभावी प्रतिसादांनी त्या वेडेपणाच्या प्रतिक्रियेला खतपाणीच घातले आहे.

काल लिहायचं राहिलेलं - जिज्ञासा , तुझं inside out अलिकडेच छोट्या भाचरांमुळे पाहण्यात आलं होतं, त्याचा संदर्भ मस्त वाटला.
अशोक, कविता हे एक प्रकारचं शहाणं वेडच , मान्य.