पठाणकोटचे शहीद व आपण

Submitted by Rajesh Kulkarni on 6 January, 2016 - 12:32

पठाणकोटचे शहीद व आपण
.

पठाणकोटमधील घटनांमुळे संरक्षणमंत्र्यांना पत्रकारपरिषद घ्यावी लागावी यावरूनच सारे आलबेल नाही हे कळावे. अशा स्वरूपाचे दहशतवादी हल्ले थांबवणे हे लष्कराच्या आवाक्याबाहेरचे आहे. कारण कितीही नाही म्हटले तरी या दहशतवाद्यांना स्थानिक मदत मिळतेच. आताही पंजाबच्या एका उच्चपदस्थ पोलिस अधिका-याने दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले असे सांगितले. अतिरेकी अशा उच्चपदस्थ अधिका-याला जिवंत सोडतील यावर कोणाचा विश्वास बसावा?

टीव्हीवर मात्र पठाणकोट घटनेबद्दल बोलताना भाजप व कॉंग्रेसचे प्रवक्ते केवळ 'आमच्या वेळी आणि तुमच्या वेळी' असेच बोलत आहेत. हे पूर्ण राष्ट्रापुढचे आव्हान आहे हे त्यांच्या लक्षात तरी येते का असे कधीकधी वाटते. या चर्चा टीव्हीवाहिनीच्या स्टुडिओमध्ये होतात म्हणून; अन्यथा या प्रवक्त्यांची लायकी या जवानांची शब्दश: खेटरे खाण्याचीच.

बाकी या घटनेत शहीद झालेल्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे आपण ऐकायचे व म्हणायचे. पण याचा नक्की अर्थ काय? स्वातंत्र्याच्या वेळी जे फासावर गेले त्यांचे बलिदान नंतर स्वातंत्र्य मिळाल्यामुळे व्यर्थ गेले नाही, असे आपण म्हणू शकतो. मात्र येथे या बहाद्दरांच्या बलिदानामुळे ना आपल्यात राष्ट्रीयत्वाची भावना जागताना दिसते, ना या देशाचे नागरिक म्हणून आपल्यात एक प्रकारची शिस्त बाणवून घेण्याची इच्छा दिसते, ना भ्रष्टाचार थांबवण्याची इच्छा दिसते.

तो केरळचा निरंजन हकनाक मेला. त्याचे बाळ अजून त्याला म्हणजे त्याच्या बापाला ओळखण्याच्या वयाचेही नाही असे दिसते, त्याला काय पडली होती या देशातल्या बहुतांशी अप्पलपोट्या नागरिकांच्या हितासाठी; तेदेखील त्याच्या घरापासून दूर त्या पठाणकोटमध्ये जाऊन स्वत:चा जीव धोक्यात घालण्याची?

दुस-या एका शहिदाच्या मुलीने स्वत: आपल्या वडलांच्या पार्थिवाला खांदा दिल्याचे पाहिले. काही दिवसांनीच तिची कुतरओढ सुरू होईल. तिच्या गावचे लोक तिची जात काढण्यास कमी करणार नाहीत. आपण मात्र तिला केवळ शहिदाची मुलगी असे संबोधून आपले काम झाले असे समजू.

कमीत कमी ‘त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही’ वगैरे म्हणण्याचा भंपकपणा तरी बंद करू. त्यांचे कामच मरायचे आहे, ते त्यांनी केले असे सोयीस्करपणे म्हणून आपण आपल्या रोजच्या जमेल तशा विलासामध्ये व भोगवादी जीवनशैलीत हरवून जाऊ.

काही नालायक राजकारणी उघडपणे 'त्यांचे कामच मरायचे अाहे' हे बोलून दाखवतात. आपण स्वत:मध्ये काही बदल न घडवून आणता त्या राजकारण्यांना बेजबाबदार म्हणत स्वत:ही कळत-नकळत तेच करू.

जवानांनो, तुमच्या बलिदानाने मधूनमधून भरून येणारे आमचे डोळे म्हणजे मधूनमधून आम्हाला सर्दी-पडसे होते तशातलाच एक प्रकार आहे. त्यापेक्षा वेगळे काही नाही. तुम्ही सीमेवर असा की नसा, आमची झोप कोणी घालवू शकत नाही. तेव्हा तुमच्यामुळे आम्ही शांतपणे झोपतो या भ्रमात तुम्ही तरी राहू नका.

घरातल्या आवडत्या व्यक्तीच्या निधनानंतर आपली आवडती गोष्ट किंवा सवय सोडायची असे करताना मी काहींना पाहिलेले आहे. मग कोणी एअरकंडिशन्ड खोलीत राहण्याचे सोडतो, कोणी आपल्याला प्रिय गोड पदार्थ त्याजतो, कोणी आणखी काही. या जवानांच्या मृत्युच्या शोकाखातर आम जनतेपैकी कोणी कशाचा त्याग केल्याचे किंवा काही चांगला उपक्रम चालू केल्याचे कधी ऐकण्यात येते का आपल्या?

जाऊ दे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राग, द्वेश, संताप, शरम, चिड्चिड.... ई.. सर्वच व्यक्त झालय.

अरे पण संसद हल्ल्यापासून ते पठाणकोट पर्यंत सर्व तेच आहे की... फक्त शहीद जवानांची नाव, गाव ई. बदलतात.

या खेपेस मेणबत्त्यावालेही दिसले नाहीत, बहुदा एव्हाना त्या मेणबत्त्याही 'दगड' झाल्यात.

तरी आपल्याला कशी 'सवय' होत नाही...? आणि ईतक्या सहनशील राष्ट्राला intolerant म्हणणारे महाभाग आहेत. [काही गोष्टी नसतात आपल्या डीएनए मध्ये. हे मान्य करायलाच हवे, लहानपणी चार वात्रट पोरांनी आपल्याला त्रास दिला की आई वडील काय सांगायचे. अरे मग त्यांच्यात खेळायला कशाला जातोस...? ते करतात म्हणून तू तसा वागू नकोस.. वगैरे. 'जास्ती त्रास दिला तर एकदाच त्यांच्या कानाखाली जाळ काढ आणि मग जे काही फटके बसतील तेही खायला तयार रहा..' हे असं नाही संगितलं जात आपल्याला. ईतके अनेक पिढ्यांचे सहिष्णू संस्कार...!]

एकदाच 'आर या पार' ची किंमत मोजायची तयारी आहे का आमची. एक व्यक्ती, कुटुम्ब, समाज, राष्ट्र म्हणून.? छे छे! आपण टॅक्स भरतोय ना... अजून काय करायचे..? 'सरकार' काय ते बघून घेईल...! पेक्षा या विषयावरील जुन्या व नव्याने येऊ घातलेल्या चित्रपटांच्या पडद्यावरील आर या पार, डायालॉगबाजी, व सुपरहिरो चा तमाशा बघून दात, मुठी आवळून वरील सर्व भावनांना वाट करून द्या. फार तर २५० रु. फक्त मधे काम भागेल, not even a scratch!

चला पुरे झाले ईथे चकट्फू टाईप करणे. ऊद्या पासून मह्त्वाच्या कामांचा डोंगर आहे- डेड्लाईन्स, विकांत, नवीन चित्रपट, साहित्य संमेलाच्या सुरस चर्चा, क्रिकेट चे विक्रम, .... ई...

बाकी या खेपेस अमेरिकेने जामच दम भरलाय म्हणे. आता बघा कशी बोबडी वळते त्यांची. 'पुढील' खेपेस कानही पिळतील.. जरा वाट पहा......!

परखड लेख.
>>जवानांनो, तुमच्या बलिदानाने मधूनमधून भरून येणारे आमचे डोळे म्हणजे मधूनमधून आम्हाला सर्दी-पडसे होते तशातलाच एक प्रकार आहे. >>>
फार झोंबणारे वाक्य असले तरी दुर्दैवाने खरेच आहे ते. शहीदांच्या नातेवाईकांच्या दु:खाची, त्यांना हयातभर सोसाव्या लागणारया वेदनेची कल्पनासुद्धा करवत नाही. वारंवार ज्या प्रकारे जवानांचे हकनाक जीव जातात ते पाहिले की सद्धस्थितीत याला कुठे अंतच नाही या जाणीवेने मन गलबलते.

कळकळीने लिहिले आहे.
जवान अक्षरशः पटावरच्या सोंगट्याप्रमाणे कामी आले. खरे तर दोन्ही देशांचे पंतप्रधानही त्यापेक्षा फार वेगळे नाहीत. या दोन ( किंवा कुठल्याही दोन ) देशांना कायम लढत ठेवण्यातच अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत.

राकु, तुम्ही पोट्तिडकेने लिहिलेलं आवडलं. पण तुम्ही शेवट तुमच्याकडून काय केलत किंवा काय करणार किंवा काय करता येईल असा केला असतात तर जास्त appeal झालं असतं. जनता कशी आहे आणि काय करते ते तर आपल्याला दिसतच असतं.

माझ्याकडून माझा पैसा ज्या देशामुळे माझ्या जवानांना बलिदान द्यावं लागलं त्या देशाला जाणार नाही ह्याचा मी प्रयत्न करते आणि करत रहाणार.

१. त्या देशात तयार होणारा कुठचाही product मी वापरत नाही आणि वापरणार नाही.
२. त्या देशातल्या कलाकाराचा कार्यक्रम पहात नाही किंवा पहाणार नाही कारण त्याने मिळवलेला पैसा त्या देशातच जाणार. माझ्याकडून त्या देशाच्या economy ला हातभार लागणार नाही.
३. मला जवानाच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च करायला आवडेल पण त्याबाबतीत माहिती मिळवायचा प्रयत्न मी करते आहे. कोणाला माहिती असल्यास जरूर कळवावं.

राजेश कुलकर्णी -
आपला लेख आवडला... आठवण काढण्याशिवाय आणि चार भावनिक शब्द या व्यतिरिक्त आपण काही करु शकतो का ? मला नेहेमी गदिमान्च्या गाण्याची आठ्वण येते, आणि प्रत्येक शब्द मनापासुन एकतो. सवोच्च त्याग करणार्‍या जवान्नाना कडक सलाम.

https://www.youtube.com/watch?v=kRfWQ487k54

एकट्या शिपायासाठी, घास रोज अडतो ओठी...

१९९९ मधे कारगिलच्या युद्धात शहीद झालेल्यान्च्या कुटुम्बासाठी मुम्बैत आदर्श सोसायटि जशी झाली तशी आता मलबार हिलवर पण एक निघेल व त्यात अनेक जनरल, पवर, खोब्रगडे व चव्हाण यान्चे लोक flat विकत घेतिल. त्यापेक्षा या शहीदान्च्या कुटुम्बासाठी त्यान्च्याच गावी व्यवस्था झाली पाहिजे याची खबरदारी घेतली पाहिजे ती न घेतल्यास त्या पक्षाला मत देउ नये.

ओळ न ओळ भावली कुलकर्णी, विशेषतः.शेवटची ओळ.

आला दिवस बॉम्बस्फोटात मेलो नाही किंवा अतिरेक्याचा गोळीचा बळी ठरलो नाही किंवा कोण्या धनदांडग्यांच्या गाडीखाली चिरडलो गेलो नाही म्हणून देवाचे आभार मानत जगत रहावे. ह्याशिवाय आपण काय करू शकतो? Uhoh

जाऊ द्या.

सर्वांना धन्यवाद.

आशुचॅंप, जरूर शेअर करा.

आर्च,
पाकिस्तानशी संबंध म्हणजे पाकिस्तानी एजंटांकरवी हवालामध्ये अडकलेले बहुतेक मोठे कॉंग्रेसी नेते, सिनेमामध्ये ओतलेला माफियांचा पैसा (जो आपल्यातल्या बहुतेकांना सिनेमा पाहताना अजिबात आठवत नाही), आजुबाजुला दिसणारा बकालपणा व बेकायदेशीरपणा अशाानेक गोष्टींशी जोडलेला गेलेला आहे. अापल्या परीने आपण सार्वजनिक आयुष्यात शिस्त असावी याबाबत आग्रह धरू शकतो.
कोणाला वाटते की शिवसेनाही पाकिस्तानशी सडेतोड धोरण स्विकारा म्हणते, मग त्यांच्या व सामान्यांच्या भावनेत फरक तो काय? हे लक्षात घेतले पाहिजे की शिवसेना ही सामान्यांच्या भावनांचे भ़ांडवल करणारी व त्यातून मिळणा-या जनमताच्या पाठिंब्यावर प्रत्यक्षात गुंडगिरी करणारी आणि खा-खा करणारी संघटना आहे. तेव्हा सामान्य नागरिकांची भावना व त्यावर राजकारण करणा-यांपासून सावध राहिले पाहिजे. मी सभोवतालच्या बकालपणाबद्दलम्हणतो तेव्हा त्यात शिवसेना-राष्ट्रवादी यांचा फार मोठा हातभार आहे. हे समाजद्रोही व देशद्रोही वागणेच आहे. सगळेच पक्ष तसे आहेत असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा त्यातही फरक करावा अशी परिस्थिती आहे. जातीपातीच्या राजकारणामुळे या समाजद्रोह्यांना बाजुला सारता येत नाही किंवा तसे करणे अवघड होऊन बसलेले आहे हे मोठे दुखणे आहे. मला यात राजकारण आणायचे नाही, पण केवळ मुद्दा स्पष्ट व्हावा यासाठी हे मांडत आहे. यात भाजप/कॉंग्रेस हे पक्ष धुतल्या तांदळासारखे आहेत असे अजिबात नाही.
अण्णा हजारेंसारख्यांनी जनआंदोलन उभारून थोडा आशेचा किरण दाखवला होता. मात्र विविधकारणांनी तो फसला. एका पक्षाची सत्ता जाऊन दुस-याची आली. त्यात कोणीतरी काही चांगले करायचा प्रयत्न करत आहे, पण त्यांचेच लोक त्यांचे पाय ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. बाकी रोजच्या जगण्यात, राष्ट्रीयत्वाची भावनानिर्माण करण्यात या राजवटीचे यश शून्य.
तेव्हा जमेल तसे सैनिकांच्या मुलांना/कुटुंबांना आर्थिक मदत करणे हा मार्ग आहेच, पण आजुबाजुची बेशिस्त/बकालपणा मग ती वाहतुकीचे नियम तोडण्यापासून ते अनधिक्ृत गोष्टी थांबवण्यासाठी प्रयत्न करणे अशा कामांपैकी काहीही असू शकते. तिथे ते आपला जीव पणाला लावतात, तर सामान्य नागरिकांनी विरोध केल्यास हा बकालपणा पसरवणा-याकंडून आपले डोके फुटेल या भितीत जगणे हाही एक प्रकारचा अपराधच आहे. त्याबद्दल प्रत्येकाने जमेल तसा प्रयत्न केल्यास फार फरक पडू शकेल.

टोटली अ‍ॅग्री !

आणि ते त्यांचे फोटो फेसबुकवर टाकून "कितने लाईक दोगे" टाईप प्रश्न विचारणे म्हणजे केवळ महान. बडवायला पाहिजे अश्या लोकांना.

बाकी ती खांदा देणारी त्यांची मुलगी होती, पत्नी नाही. त्यांना कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मेडलही मिळाले होते. आणि त्यांचा मुलगा ही मिल्ट्री मध्ये ऑफिसर आहे.

आणि ते त्यांचे फोटो फेसबुकवर टाकून "कितने लाईक दोगे" टाईप प्रश्न विचारणे म्हणजे केवळ महान. बडवायला पाहिजे अश्या लोकांना.>>
---- सहमत, कारगिल युद्ध काळात "अमक्या खरेदी च्या % नफा ...मदत... चिड अणणारा प्रकार

चांगला लेख. आपले सैनिक ज्या भूमीचे प्रसंगी प्राण पणाला लावून रक्षण करतात त्या देशाची आपण सामान्य नागरिक किती हानी करत आहोत हे जरी आपल्या लक्षात आले तरी त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. जर सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी सैन्याची असेल तर सीमेच्या आतील भूमी सुजलाम सुफलाम (आणि स्वच्छ) ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. आपण सगळे तेवढे तरी नक्कीच करू शकतो.

फेबु वर शेयर करणार आहेच. (तुमच्या नावसाहित अर्थात)
परवानगी साठी धन्यवाद.
खरच भावना पोचल्या. आतून आणि सगळ्यांच्या मनातल् लिहिल आहे.

आवडले !
एकूणच प्रकरण फंद्फितुरीचे दिसत आहे. हा डाग अजुनही जात नाही ! आअण तेव्हढे लाईक देऊन मोकळे होतो. राजकारणी पोळी शेकुन घेतात.