समजायला पाहिजे

Submitted by जयदीप. on 6 January, 2016 - 08:02

आहे काय मनामधे लपवले, समजायला पाहिजे
मी चोरूनच डायरी मग तुझी वाचायला पाहिजे

वादानंतर शांतता पसरली आहे किती वादळी
नाही समजत कोणता विषय मी काढायला पाहिजे

आहे चालत संभ्रमात बहुधा, प्रत्येक रस्ता इथे
आता आपण पायवाट नवखी बनवायला पाहिजे

कुठले उत्तर द्यायचे समजले आहे मला नेमके
सामोरे बहुधा स्वतः च अपुल्या मी जायला पाहिजे

आले सर्वच सावकार समजा एकत्र मागायला....
कोणाचे ऋण फेडशील पहिले ठरवायला पाहिजे

ठोठावून उगाच दार लपते जाऊन कोठेतरी
मिळते काय सहज? नशीब म्हणते - शोधायला पाहिजे

चित्रे सर्वच कागदी हरवली आहेत जय आपली
अाता आपण एक भिंत इथली कोरायला पाहिजे

जयदीप

Group content visibility: 
Public - accessible to all site users