व्यथा

Submitted by बेफ़िकीर on 6 January, 2016 - 06:30

"नमस्कार मित्रमैत्रिणिंनो! मी स्नेहल निगडे, एस वाय बी एस सी! व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय प्राचार्य सर, आदरणीय उपप्राचार्य सर, आपल्या भागाचे आदरणीय तहसीलदार सर, सर्व गुरूजन आणि सर्व कर्मचारीवर्गाला अभिवादन करून मी आपले चार शब्द मांडते."

"स्नेहसंमेलनात घेतल्या जाणार्‍या ह्या भाषणाच्या स्पर्धेसाठी विषय आहे माझे कॉलेज! गेले दहा दिवस मी माझे भाषण लिहून पाठ करून ठेवले आहे. आदरणीय नाईक मॅडमनी ते वाचून स्पर्धेसाठी ओकेपण केलेले आहे. आत्ताच पार पडलेली इतर चार स्पर्धकांची भाषणेदेखील खूप आवडली. आपले सगळ्यांचेच आपल्या कॉलेजवर खूप प्रेम आहे. हे आनंदाचे दिवस कधी संपू नयेत असे सगळ्यांनाच वाटते. मीही तयार केलेले भाषण असेच कॉलेजवरील प्रेमाने ओथंबलेले आहे. माझे बी एस सी चे अजून एक वर्ष राहिलेले आहे. मला खूप अभ्यास करायचा आहे. पण असे म्हणतात की अभ्यासाबरोबरच काही इतर उपक्रमांमध्येही सहभागी झाल्याने आपल्यातील आत्मविश्वास वाढीस लागतो. आपले व्यक्तिमत्त्व उजळते. आपल्यालाच आपल्यामधील काही सुप्त गुणांचा शोध लागू शकतो. म्हणून मी ठरवले आहे की दहा दिवसांपासून पाठ करून ठेवलेले भाषण सादर करायचे नाही. मला एक विनंती करायची आहे की कालपासून माझ्या मनात आपोआप तयार होत गेलेले एक भाषण मला आज सादर करू देण्यात यावे. ह्या अचानक केलेल्या बदलासाठी मी आधी आदरणीय नाईक मॅडमची व इतर सर्व आदरणीय गुरुजनांची क्षमा मागते. पण मला नक्कीच काहीतरी असे सांगायचे आहे जे आजच्या स्पर्धेतील भाषणांना शोभून दिसेल."

"माझे कॉलेज, त्यातील गुरूजन, कर्मचारी, मित्रमैत्रिणी, वास्तू, वर्ग, प्रयोगशाळा, मैदान, कॅन्टीन, वाहनतळ, सभागृह ह्या सगळ्याच गोष्टींवर आपले आपोआपच प्रेम बसत जाते. थिअरी, प्रॅक्टिकल्स, एक्झाम ह्याचा खूप ताण असतो मनावर. सकाळी बस वेळेवर येईल की नाही, नेहमीच्या मैत्रिणी सोबत असतील की नाही, नेहमीची जागा मिळेल की नाही, आपली कोणी टिंगल तर नाही ना करणार, शिक्षक काही बोलणार तर नाहीत ना, सगळे व्यवस्थित होईल ना, अश्या सतरा काळज्या असतात सकाळी उठल्यापासून! पण ह्याच काळज्यांमुळे कॉलेजवर आपला जीव जडतो. आपण ग्रॅज्युएट होऊन काय करणार आहोत हे अजून ठरलेले नसते. पण जीव तोडून मेहनत सगळेच घेत असतात. कोणी थोडा मागे पडतो तर कोणी चमकतो. कोणी खोडकर असतो तर कोणी शामळू! कोणी घोकंपट्टी करणारा तर कोणी स्कॉलर! पण सगळे हसतखेळत शिक्षण घेत असतात. घरापासून बारा किलोमीटरवर येऊन, मधली दोन गावे पार करून, कधीच वेळेवर नसणार्‍या बसची वाट पाहत पाहत मी आणि माझे काही मित्रमैत्रिणी कॉलेजला पोचतो. ही सगळी मेहनत आपली आणि पालकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सुरू असते."

"पण गेल्या महिन्यात मला माझे वडील खूप ओरडले. इतकेच काय, त्यांनी एक फटकाही लावला मला. ह्याचे कारण होते माझी सगळ्या तासांना हजेरी नसणे! कधी मी पहिल्या तासाला दांडी मारते तर कधी शेवटच्या दोन तासांना मी बसतच नाही. आदरणीय राठोड सरांना ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी मला खडसावले होते. पण तरी मी तिकडे दुर्लक्ष करून तेच करत राहिले. शेवटी राठोड सरांनी ही बाब आदरणीय प्राचार्य सरांना सांगितली. माझी मैत्रिण अक्षदापण प्राचार्यसरांच्या ऑफिसमध्ये बसली होती. आम्ही दोघी काय ते समजून चुकलो. आम्हाला दोघींनाही पालकांना घेऊन येण्यास सांगितले गेले."

"संध्याकाळी घरी घाबरत घाबरतच आम्ही हा प्रकार घरच्यांना सांगितला. मला माझे वडील खूप ओरडले. दुसर्‍या दिवशी ते आणि अक्षदाचे वडीलपण प्राचार्य सरांना भेटले. त्यावेळी तिथे आम्ही नव्हतो. संध्याकाळी घरी पोचल्यावर वडील मला खूप वेळ बोलले. शिक्षणाचा खर्च, त्यासाठी पेढीवरून घेतलेले कर्ज, त्यांचे शेतातले कष्ट, माझी बेपर्वा वृत्ती, संध्याकाळी आजूबाजूच्या मैत्रिणींशी गप्पा मारण्यात वेळ घालवणे ह्या सगळ्यावर वडिलांनी लेक्चर दिले. इतकेच काय एक फटकाही लगावला. आईने त्यांना आवरले. माझ्या लहान बहिणीही रडू लागल्या ते पाहून! मी तर खूपच घाबरलेले होते. मी वडिलांना शब्द दिला. ह्यापुढे असे करणार नाही. त्या दिवसापासून आजवर मी एकही तास बुडवलेला नाही. जर बसच उशीरा आली तर थोडा उशीर होतो इतकेच. पण मी तास बुडवत नाही. अक्षदालाही बोलणी बसली. तीही आता तास बुडवत नाही."

"मध्यंतरी मला डॉक्टरकडे न्यावे लागले. माझे पोट खूप दुखत होते म्हणून! टेस्ट केल्या तर डॉक्टर म्हणाले की मुतखडा झाला आहे. त्यांनी औषधे दिली. ती औषधे घेऊन जरा बरे वाटत आहे. ते म्हणाले भरपूर पाणी प्यायला हवे. तुमच्या घराबाजूच्या विहिरीतील पाण्यात क्षार जास्त असतील. तरीही भरपूर पाणी प्या. आई जाता येता मला आठवण करून देऊ लागली. मी तिचे ऐकल्यासारखे करू लागले आणि कॉलेजला येऊ लागले."

"पण मला, माझ्या काही मैत्रिणींना आणि कॉलेजमधील बर्‍याच मुलींना दिवसा मनसोक्त पाणी पिता येत नाही. घरीही नाही आणि कॉलेजमध्येही नाही. तृप्त होण्याइतके पाणी पिण्यासाठी संध्याकाळ उजाडावी लागते. ह्याचे कारण आहे कॉलेजमध्ये असलेले मुलींसाठीचे शौचालय! हा विषय ऐकून समोरच्या श्रोत्यांमध्ये खसखस पिकलेली ऐकलीत ना सगळ्यांनी? हीच नेमकी अडचण आहे. हे शौचालय असून नसल्यासारखे आहे. मुळात त्याची डागडुजी करायला हवी आहे. धड पाण्याची व्यवस्था नाही आहे. कोणा नालायकांनी कसे कोण जाणे पण आत शिरून भिंतींवर काहीबाही लिहून ठेवलेले आहे. शौचालयापासून थोड्या लांब अंतरावर सारखी कोणी ना कोणी मुले असतात आणि त्यांच्यात सारखी थट्टामस्करी चाललेली असते. सगळ्यांना माहीत आहे की पूर्वी एका मुलीला शौचालयात गेल्यानंतर मागच्या खिडकीतून कोणीतरी पाल आत टाकून घाबरवलेले होते. त्या मुलीने बाहेरून आलेले खिदळण्याचे आवाजही ऐकलेले होते. ह्याबाबत काही मुलींनी अर्ज केलेले होते. पण परिस्थिती विशेष बदललेली नाही. फक्त एक मोठा पाण्याचा ड्रम आणून ठेवला गेला. त्यातही अनेकदा पाणी नसतेच. आम्ही अनेकजणी सकाळी सात वाजता बस पकडतो आणि घरी पोचायला संध्याकाळचे सव्वा पाच वाजतात. आम्ही तास बुडवायचे नाहीत. कॉलेजमधील शौचालयात पाय ठेवावासा वाटत नाही. पुन्हा आमच्या घरी आमची तक्रार होणार. आमचे पालक आम्हाला ओरडणार. तास बुडल्यामुळे जो पोर्शन बुडला तो न समजल्यामुळे काहीजणी नापास होणार. हळूहळू काहीजणींचा शिकण्यातला इन्टरेस्ट जाणार. मग लग्नाचे वय झाले म्हणून लग्न उरकून घेतले जाणार. अजूनही त्या कोपर्‍यात काही टवाळखोर हसत आहेत असे दिसत आहे. पण त्यांची टवाळखोरी कधी प्राचार्यसरांपर्यंत पोचते की नाही कोण जाणे! उद्यापासून मी कॉलेजमध्ये पाय टाकला की हीच टवाळखोर मुले एकमेकांकडे डोळे मिचकावून पाहत टाळ्या देतील. जिभेला हाड नसल्याप्रमाणे बोलणारी मुलगी म्हणून मी बदनाम होईन. पुन्हा माझ्या पालकांना बोलावून घेतले जाऊ शकेल. अभ्यासात माझे लक्ष लागणार नाही इतके मला त्रस्त करण्यात येईल काही मवाली मुलांकडून! कदाचित मला सहानुभुतीही मिळेल. कदाचित माझ्यासारख्या अनेकींना ही सहानुभुती मिळेल. कदाचित मी मुलींच्या समस्येला वाचा फोडली म्हणून मुलींना माझा अभिमान वाटेल. कदाचित भाषण संपल्यानंतर टाळ्या वाजतील आणि कदाचित मला उत्तेजनार्थ किंवा कसलेतरी प्रशस्तीपत्रक मिळेल. कदाचित मी मांडलेली समस्या खरोखरच गहन आहे असे स्त्री शिक्षिका आपापसात बोलतील आणि इतर शिक्षकही मनात मान्य करतील. कदाचित त्याबाबतीत काही पावले उचलण्याचे नियोजनही होईल. पण हे सगळे 'कदाचित'मध्ये येते. माझे बुडलेले तास परत येणार नाहीत. माझी आणि माझ्यासारख्या अनेकींची कुचंबणा होण्याची भरपाई होणार नाही. मुतखड्याचे रुग्ण किती आहेत व का आहेत ह्यावर कोणी कधी अभ्यास करणार नाही. आणि हा विषय निघाला की असेच काहीजण चोरून खिदळत राहतील. तेही थांबणार नाही."

"माझे कॉलेज मला अतिशय आवडते. माझे प्रेम आहे ह्या कॉलेजवर. पण ह्या कॉलेजमधील ज्या गोष्टीत मुलींना शिक्षणाला रामराम ठोकायची वेळ आणण्याची क्षमता आहे, त्या गोष्टीवर येथे कोणीच काही करताना दिसत नाही. त्यामुळे 'मला माझे कॉलेज फार आवडते' हे वाक्य जेव्हा मी बोलते तेव्हा ते मी फार मनापासून बोलत असते असे मुळीच समजू नका"

"धन्यवाद"

========================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्‍याच गोष्टी रिलेट झाल्या.
मी ज्या डिग्री कॉलेज ला होते तिथेही या बायकांच्या वॉशरुम ला प्रायव्हसी नसणे, पाण्याने भरलेला एक ड्रम, आत भयंकर मजकूर खरडलेला असणे, समोर तिन्ही मजल्यावर कट्ट्याला टेकून उभ्या मुलांन ते दिसणे इ. इ. गोष्टी होत्या. अ‍ॅडमिशन च्या दिवशी एकदा सोडून परत चार वर्षात कधीही त्या वॉशरुम मध्ये गेल्याचे आठवत नाही.कसं माहिती नाही पण निभावून जायचं त्या वेळी. पाणी पिणं नाहीच. कँटीन मधला चहा हा एकमेव लिक्विड इनटेक.
आता वाटतंय अगदी सर्वांसमोर तर सर्वांसमोर, निदान नीट स्वच्छता आणि कुलुपं किल्ली वगैरे काही व्यवस्था असती तर गेलोही असतो.

बापरे.. असे खरेच असतेही.. दिवसभराचा कंट्रोल..
म्हणजे सार्वजनिक जागी अपेक्षाच नसते. ती सोय हॉटेल किंवा मॉलमध्येच बघावी लागते. पण कॉलेज जिथे मुलांबरोबर मुलीही असणारच तिथेही अशी हालत असते हे कठीण आहे खरेच.

हो, आता सान्गायला लाज वाटत नाही की केवळ याच कारणामुळे मला खरच किडनी स्टोन झाला होता. घाणेरडे टॉयलेट, त्यापेक्षा कॉलेजमधल्या मुलान्चा पाचकळपणा. १- २ वेळा काही मुली गेल्या होत्या पण टेरेसवरुन मुले बघायला आलीत हे पाहुन घाबरुन मागे फिरल्या. त्या नन्तर कोणीही तिथे गेले नाही. आज काय स्थिती आहे माहीत नाही. शेवटचा भूगोलाचा पीरीएड मी बर्‍याच वेळा बुडवुन घरी पळाले होते. पाणी कमी प्यायल्याने पार वाट लागली होती.

किडनी स्टोनच्या वेदना काय असतात हे ते झालेल्याना विचारा. पाठीत खाली कुणीतरी सुरी खुपसतय अशा वेदना असतात त्या.:अरेरे:

अवान्तराबद्दल क्षमस्व. बेफिकीर तुम्ही थोडक्यात पण चान्गली व्यथा मान्डलीत. परदेशात जागोजागी खरच उत्तम सोय असते यात वाद नाहीच. कधी आपला देश याबाबतीत सुधरेल देव जाणे.

निदान वॉशरुम अगदी डायरेक्ट कट्टेकुमारांच्या बसण्याच्या जागेच्या समोर नसावे, त्याला कुलुप/एखादी लेडी इनचार्ज असावी म्हणजे गैरवापर, त्यात लिहीणे वगैरे प्रकार होणार नाहीत, पाणी असावे इतल्या माफक अपेक्षा असतात.
पुण्यात किंवा मोठ्या शहरांत बर्‍याच कॉलेजांमध्ये ही व्यवस्था चांगली आहे.

आम्ही आता मोठे झालो, थोडे निर्लज्ज व्हायला शिकलो,कोणीही समोर असले तरी व्यवस्था नीट असलेल्या ठिकाणी गरज पडल्यावर जायला शिकलो, नीट व्यवस्था कुठे आहे ते बरोबर लक्षात ठेवायला शिकलो, पण लहान मुलींच्या बाबतीत अजून तेच प्रश्न येतात.घरी/मॉल मध्ये अनेकदा 'जाऊन ये' समजावूनही त्यांना कुठेतरी जिथे हे सर्व मॉल/इतर व्यवस्था प्रचंड दूर आहेत अशाच ठिकाणी हटकून नेचर्स कॉल येतो आणि मग आमिर खान ची अतिथी देवो भव ची एक जाहीरात आहे त्याप्रमाणे रस्त्यावर गाडी उभी करुन त्यांचा कार्यक्रम उरकावा लागतो.येणारे जाणारे प्रचंड वैतागून लुक्स देत असतात.

नी चा स्वच्छतेच्या आईचा घो लेख यासंदर्भात आठवला.

नी चा स्वच्छतेच्या आईचा घो लेख यासंदर्भात आठवला.
>>>
येस्स मलाही हा लेख आठवला होता, पण नक्की कोणाचा होता ते आठवत नव्हते.

स्वारगेट चा बस स्टँड (झाडाखालचा) इथे सार्वजनिक मध्ये मुलीला नेऊन आणल्यावर ती 'मला लागली होती पण आता नाही लागली, चल बस मध्ये बसू' म्हणाली.नंतर बसमधून मंगलूरला जाताना मध्ये एका स्टॉप वर पहाटे चांगली व्यवस्था होती त्या रेस्टरुम्स मध्ये गेलो होतो. या विषयावर बोलण्यासारखे खूप आहे पण इथे काही जणांना यक्क होईल त्यामुळे जरा आवरते घेते.

महत्वाचा विषय.
यावर एक चळवळ सुरु आहे मात्र सरकारी कामकाजात या चळवळीच्या लोकांकरता पुरेसा वेळ / इच्छा नाही असे मधे वाचनात आले होते.
https://www.facebook.com/groups/righttopee/

सकाळ मधे बातमी आलि होति कोणितरि पुण्यातिल सार्वजनिक शौचालय बद्द्ल (location) माहिति देनार app (location) बनवल आहे.

गरवारे कॉलेजमधे एक वेगळी लेडीज रूम होती, मुलींना ऑफ पिरियडमधे किंवा मधल्या सुटटीत डबा खाण्यासाठी वा विश्रांती घेण्यासाठी. लेडीज टॉयलेट त्या खोलीला आतून लागूनच होतं त्यामुळे कुठल्याही मुलाचा तिथे वावर असायची शक्यता नसायचीच आणि त्यामुळे कुचंबणा व्हायची नाही. टॉयलेट बांधताना हा मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे.

चांगला लेख!
आत्ता मी या विषयावर आरामात दहा पंधरा मिनीटे व्याख्यान देऊ शकेन पण कॉलेजात असताना आपल्याच कॉलेजच्या मुलांसमोर हे बोलून दाखवायची हिंमत झाली नसती.
स्नेहल निगडेंचं याबद्दल अभिनंदन!
अतिशय महत्त्वाच्या विषयावर लेख लिहिल्याबद्दल बेफिकीर यांना धन्यवाद!

थोडे निर्लज्ज व्हायला शिकलो >>>> निर्लज्ज व्हायला शिकलो असे नाही तर यात लाज वाटण्यासारखे काही नाही ही अक्कल आली.

स्वच्छतेच्या आईचा घो >>> Biggrin

चांगला लेख.
शाळेत मुलांची बाथरूमही अत्यंत गचाळ आठवते. त्यात शिशुवर्गापासून चौथी पर्यंत पायातील चपला वर्गाबाहेर काढून अनवाणी पायाने इतरत्र पाणी सांडलेल्या, फरशा फुटलेल्या जागेतून शू करायला जाणे. शी करायला संडासात जाणे अती दिव्य.
इंजिनिअरीग कॉलेजात मात्र अत्यंत स्वच्छ स्वच्छतागृहे होती.

बापरे Sad
नशिबाने आमच्या शाळेत बाथरुम खुप स्वच्छ आणि १० ते १२ होती. ( मोठ्या हॉल मधे १० ते १२ खोल्या आणि दारे ).

कॉलेज मधे मात्र फक्त २, पण ति लेडिज रुम च्या आत. रुम मधे मधोमध मोठे टेबल , खुर्च्या, २ आरसे. आणि लागुनच एक लहान रुन जिथे २ बाथरुम्स. शेजारी स्टाफ रुम ... त्यामुळे मुले जवळ पास पण फिरकु शकायची नाहीत.

अशा सोयी सर्व शाळा कॉलेजातुन असायला हव्यात.

उत्तम लेख. प्रत्येक शाळा कॉलेज यांनी शिक्षणाबरोबर याकडे कळकळीने लक्ष द्यायला हवे. >>>>+११११११

बेफिकीर जी खूप मोठ्या प्रश्नाला वाचा फोडली आहे तुम्ही.
आमच्या sgm college मध्ये अशी दुरावस्था नाहीये. इथे प्रत्येक मजल्यावर मुलांसाठी शौचालयाची आणि एकाड एक मजल्यावर मुलींसाठी लेडीज रूम आणि त्याला जोडून शौचालयाची व्यवस्था आहे.

आजही स्थिती बदललेली नाही. माझी मुलगी मुंबईतल्या सरकारी कॉलेजमध्ये जाते. तिथलि लेडीज रूम या वर्षीपासून प्रिन्सिपॉलच्या आदेशानुसार बंद आहे. का? मुलींना माहीत नाही, कोणी सांगत नाही. वॉशरूम अतिशय घाणेरड्या स्थितीत, पण नाईलाजाने जावेच लागते. नाईलाजाने का होईना, पण वॉश रूम वापरता येते यात मुली आनंद मानतात. लेडीज रूम बंद असल्याने एखादे लेक्चर नसेल तर कुठे बसावे हा प्रश्न मुलींसमोर उभा राहतो. वर्गात बसता येत नाही. माझी मुलगी कित्येक वेळा दुपारी घरी परतताना ट्रेन मध्ये डबा खाते. कॉलेजमध्ये सोयच नाही आणि कॅन्टीन शेजारच्या सेशन कोर्टाचे वकील पण वापरतात त्यामुळे दुपारी तिथेही जागा नसते. एकूणच कॉलेज मध्ये जाणे अजिबात आनंददायी नाही. एखादेच लेक्चर असेल तर कित्येकदा मीच तिला नको जाउस म्हणून सांगते.

रहावत नाही म्हणुन लिहिते आहे. पण महाबळेश्वर ला जाताना एक अतिशय प्रसिद्ध रेस्टॉरंट आहे. आता नाव लक्शात नाही पण खुप गर्दि असते. बाथरूम मात्र एकदम घाण. लहान मुल, सिनिअर सिटीझनची प्रचंड गैरसोय! त्या मालकाशी भांड्ण झाल माझे. त्याला म्हणाले मी की पाहिजे तर पैसे घे पण बाथरूम साफ ठेव पण नाही. आतासुध्धा अंगावर काटा आला आठवून पण सुधारणा नसेलच! सामाजिक जबाबदारी कशी वाटत नाही कोण जाणे? साधनाताई, कठीण आहे.

खड़क वासला डोंगरावर अमारा व्हिला म्हणून बालीनीज होम्स ची स्किम आहे तिथे मोबाइल टॉयलेट होते, स्वच्छ होते.बहुतेक कमोड सीट ला सेन्सर आणि ऑटो फ्लश होता.वॉशरूम घाण असलेली होटेल्स पहिल्यांदा गेल्यावर आपोआप नंतर टाळली जातात.

Very sensitive topic. I faced the similar problem in college. There was a ladies rest room and a toilet inside it. But no light and no cleanliness. Did written complains for the same but no change.

COEP तलं E&TC dept चं मुलींचं स्वच्छतागृह तर चक्क वरून बरंचसं open होतं, त्यामुळे आत गेल्यावर कायम वर एक डोळा ठेवावा लागायचा. सध्या परिस्थिती माहित नाही.

आपल्या इथे कॉमन सेन्स मिसिंग आहे. वॉशरुम ना ब्लाईंड्स नसलेल्या डायरेक्ट उघड्या खिडक्या असणं, कमोड असला तर कमोड वॉशर आणि टॉयलेट पेपर दोन्ही नसणं, लेडीज वॉशरुम मध्ये कचर्‍याचा डबा नसणं,डबडं गळकं असणं इ.इ. कुठे हॉटेल च्या बाथरुम मध्ये गेल्यास तिथे पाल्/सरडा/बेडूक्/साप नाही, आणि ब्लाइंड नसल्यास याचि खिडकी कशासमोर आहे ती सावध पाहणी आधी करावी लागते.
टेमघर धरणाच्या आधी एक रेझॉर्ट आहे.हल्ली स्वतःची एक बाग असली की जेवणाची व्यवस्था आणि एक दोन झोपाळे लावून त्याला 'रेझॉर्ट' म्हणण्याची फॅशन आहे.त्या तिथे पूर्ण २५ च्या टिम साठी दोन वॉशरुम्/बाथरुम होत्या.लोक लवासाला धबधब्यात वगैरे भिजून आलेले. मग त्याने एक रुम्स मधलं बाथरुम उघडून दिलं ते भयंकर होतं. त्यात अक्षरशः बेसिन मध्ये दाढीचे केस पसरलेले होते.
एकदा विरार लोकल प्रवासात विरार स्टेशनेमकं मला 'जायला' लागलं आणि ते लोकल च्या जेन्ट्स डब्याच्या समोर आणि आत तृतीय पंथी बसले होते. Sad आणि मला विरार मध्ये 'चांगली' जाणेबल ठिकाणं स्टेशन जवळ माहिती नव्हती.
हे सगळं इतक्या डिटेलवार आज बोलू शकते. त्याकाळी या गोष्टींची घाबरवणारी स्वप्नं पडाय्ची इतका मेंटल इम्पॅक्ट होता.
मुंबई पुणे रुट सोडल्यास बाकी सगळीकडे एस टी प्रवासात जीव मुठीत धरुनच वावरावं लागतं.
आग लागल्याशिवाय विहीर खणायची नाही ही आपली रित आहे.