फुसके बार – ०६ जानेवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 5 January, 2016 - 14:27

फुसके बार – ०६ जानेवारी २०१६

१) जुन्नरजवळील आंबेगावच्या ८६ वर्षाच्या आजींनी गेल्या ६० वर्षांपासून वर्तमानपत्रातली कात्रणे वह्यांमध्ये चिकटवून त्यांचा संग्रह केलेला आहे. विशेष म्हणजे विविध विषयांवरच्या या कात्रणांमध्ये त्यांनी अंधश्रद्धा हा विषयही ठेवला आहे. अशा कात्रणांच्या एक हजारहून अधिक वह्या त्यांनी जपून ठेवल्या आहेत. काय कमालीचा छंद म्हणायचा हा आणि त्याचबरोबर त्यांची चिकाटी विशेष वाखाणण्यासारखी.

२) काशीकापडी जमातीमध्ये पतीचे निधन झाल्यावर पत्नीला तेलाने आंघोळ घालून तीन दिवस अंधा-या खोलीत ठेवतात. या प्रथेविरूद्ध एका मुलीने तिच्या वडलांच्या मृत्युनंतर तिच्या आईवर ही वेळ येऊ नये म्हणून लढा उभारला व जमातीच्या जातपंचायतीच्या पंचांविरूद्ध पुणे पोलिसांमध्ये तक्रार केली. याशिवाय आंतरजातीय विवाहांना विरोध करणे असे आरोपही या पंचांविरूद्ध आहेत. अशा आठ पंचांना पुण्यात खडक पोलिसांनी अटक केली आहे.

३) स्पिलबर्गच्या सिनेमातील लियाम नीसनचा शिंडलर्स लिस्ट आठवतो? जर्मन व्यावसायिक असलेल्या ऑस्कर शिंडलरने सुरूवातीला त्याचा धंदा चालावा म्हणून आणि नंतर ज्युंबद्दल खरोखर कणव निर्माण होऊन जितक्यांना हत्याकांडापासून वाचवणे शक्य झाले तितक्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

अगदी तसा नाही तरी त्या धर्तीवरचा हॉटेल रूवांडा हा सिनेमा. आपण त्यांना विसरलो असलो तरी रूवांडा देशात (काय म्हणता, रुवांडा कोठे आहे?) हुतू ट्राइबच्या लोकांनी टुत्सी ट्राइबच्या लोकांची कत्तल नव्वदीच्या दशकात केली. तेथे ऑइल, सोने, हिरे वगैरे पाश्चिमात्य देशांना लागणारा काहीच माल नसल्यामुळे कोणाचाही फार हस्तक्षेप न कोता जवळजवळ दहा लाख टुत्सी लोकांची कत्तल झाली.

मुळचे हे हुतू व टुत्सी एकच म्हणे. पण तेथे राज्य केलेल्या बेल्जियन सत्तेने अक्षरश: उंचीच्या व नाकाच्या लांबीच्या आधारावर त्यांची अशी विभागणी केली.

त्यामुळे टुत्सींचा वंशविच्छेद करताना Cut the tall trees ही आज्ञा सगळ्यांना समजायला फार सोपी. टुत्सींना शोधून शोधून मारणारे हुतू त्यांचा उल्लेख कॉक्रोचेस म्हणजे झुरळे असा सर्रास करत.

या सर्व भीषण व मानवी प्रकारात हुतू असलेला एका फोर स्टार बेल्जियन हॉटेलचा मॅनेजर पॉल रूसेसाबागिना. त्याची बायको टुत्सी. तो त्याच्याकडे कोणतेही शस्त्र नसताना एक हजारापेक्षा अधिक टुत्सींना कसे वाचवतो याची चित्तथरारक कथा.

काहीही संबंध नसताना तिथल्या टुत्सी अनाथ मुलांना वाचवण्यासाठी जीव पणाला लावणारी रेडक्रॉसची गोरी बाई. इतक्या प्रचंड प्रमाणावर नरसंहार चालू असताना पूर्ण रूवांडा देशासाठी केवळ चारशे पीसकीपर्स नेमून काही तरी केले आहे यात खोटे समाधान मानणारे युनायटेड नेशन्स, व इच्छा असूनही या टुत्सींपैकी कोणालाही मदत करू शकत नाही या हतबलतेपोटी निराश होणारे युएनचे अधिकारी, पैशांसाठी टुत्सींना काही काळासाठी जीवदान देणारे हुतू आर्मीचे अधिकारी, परदेशी म्हणजे गो-या लोकांना देशाबाहेर जाता येईल म्हणून अनेक टुत्सींनाही आपल्याबरोबर नेता येईल अशा समजुतीने आलेले; पण मग सगळ्या काळ्यांना नाइलाजाने मागे ठेवून जाणारे गोरे फादर, अशा मानवतेला कलंक असलेल्या जनावरांचा आणि या हैवानांच्याच वातावरणात माणुसकीचा झरा दाखवणा-या सज्जनांचा हा पट. मृत्यु किती स्वस्त असू शकतो हे दाखवणारा पट.

ती रेडक्रॉसची बाई प्रथम दहा टुत्सी अनाथ लहान मुलांना जॉनच्या हवाली करते. राहिलेल्या दहांना आणायला परत जाते, तर ती मुले आधीच हुतू नराधमांच्या हाती लागलेली असतात. त्यांचे गळे चिरून त्यांना मारतात. हिला ते सारे पहायला लावतात. त्यातली एक लहान मुलगी तिचाही गळा चिरणार, त्याआधी जीवाच्या आकांताने ओरडते, मला मारू नका, मी पुन्हा टुत्सी नाही होणार. सगळेच नि:शब्द करणारे.

शिंडलर्स लिस्टमध्ये तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही हे ज्युंना सांगितले गेलेले दिसले, येथे टुत्सींना. बंदुका व तलवारी चालवणारे हात वेगळे एवढेच.

निक नोल्टे व डॉन चिडल ही त्यातल्या त्यात माहित असलेली नावे. पण अंगावर काटा आणणारा अनुभव देतात.

याआधी पाहिला नसेल तर जरूर पहा..... हॉटेल रूवांडा. हे हत्याकांड (जेनोसाइड) झाले ते नव्वदच्या दशकात. विश्वास बसतो?

४) काल मी अंधश्रद्धामीटरची कल्पना मांडली होती. मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदांसाठी होणा-या नेमणुकांसाठी असा प्रकारची चाचणी केली जाते. की न जाणो याच्या अंधश्रद्धांशी संबंधित समजुतींमुळे कंपनीच्या व्यवसायावर प्रतिकुल परिणाम झाला तर काय घ्या.

अशा चाचणीचे तपशील कोणी सांगू शकेल काय?

५) सत्यम शिवम सुंदरम हा सिनेमा आजच्या काळात प्रदर्शित होता, तर त्यातील गाण्याच्या वेळी झिन्नीबेबीची महादेवाच्या पिंडीजवळची वळवळ पाहून अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असत्या. अर्थात ती वळवळ पाहून झाल्यावर.

६) काल आयबीएन लोकमतवर गुंठामंत्री या नावाखाली एक कार्यक्रम सादर झाला. पुण्यामध्ये जमिनीच्या वाढत्या किंमती पाहता शेतक-यांवर धाकदपटशाचा वापर करून त्यांच्याकडून जमिनी बळकावण्याचा प्रकार झाला. त्यात अनेक खूनही झाले.

या प्रकारात आजवर पुण्यात अनेक खून पडले आहेत हे सांगितले जात होते, तेव्हा लक्षात आले की यातले बरेचसे लोक राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधित होते. काहीतर त्यांचे पदाधिकारी होते.

यातल्या एका गुंडाचा, ज्याचा नंतर खून झाला, त्याचा तडिपारीचा आदेश तर राष्ट्रवादी सरकारात असताना त्यांच्याच गृहखात्याने घेतलेला होता हेदेखील यावेळी लक्षात आले.

आणि आपण मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचा केवळ जलसंपदा खात्याशी संबधित भ्रष्टाचारापुरता संबंध जोडतो.

काल संघाचा मेळावा झाल्याच्या ठिकाणावरून एक जोक फिरत आहे. या मेळाव्यासाठी सलग चारशे-साडेचारशे एकर जमीन मोकळी कशी याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांना आश्चर्य वाटले असे त्यात म्हटले होते.

गुंठामंत्री संस्क्ृतीतून निर्माण झालेल्या सामाजिक प्रश्नांवर एक पुणेकर चक्क पीएचडी करत आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users