फुसके बार – ०५ जानेवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 4 January, 2016 - 15:52

फुसके बार – ०५ जानेवारी २०१६

१) सुब्रमण्यम स्वामींच्या आवडत्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे कोणतीही महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण न होता, खरे तर नापास होऊनदेखील, नेहरूंना पंडित असे म्हटले जाते. मात्र डॉ. आंबेडकर स्वत:च्या हिंमतीवर शिकून, अनेक अडचणींना तोंड देत एवढे शिकले, त्यांचा तशा आदराच्या उपाधीने उल्लेख मात्र कॉंग्रेस विशेषत्वाने करत नाही. शिवाय कॉंग्रेसने जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांना राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्याचाच प्रयत्न केला होता.

या परिस्थितीत डॉ. आंबेडकरांना पंडित आंबेडकर म्हणायला सुरूवात केली तर किती भिंतींना तडे जातील? त्यांनी त्यांचे पांडित्य सिद्ध केलेले नाही असे म्हणायची कोणाची प्राज्ञा आहे काय?

२) फेसबुक आणखी लोकप्रिय करायचे असेल तर लोकांना मिळणा-या लाईक्सच्या संख्येप्रमाणे त्यांचे पृथक्करण करण्याची पद्धत फेसबुकने सुरूवात करावी. काही लोक एकवेळ नोक-या सोडून देतील व लाइक्सच्या मागे लागतील अशी परिस्थिती उद्भवेल.

एलआयसी एजंट्सना जसे करोडपती वगैरे म्हणून संबोधले जाते तसे फेबुकरांना संबोधण्याची पद्धत सुरू होईल. हो, तो ना, लखलाइकी आहे, वगैरे.

३) मागे मी उल्लेख केला होता की रातोरात श्रीमंत व्यायचे असेल तर पाण्यापासून हायड्रोजन निर्माण करण्याची अभिनव व फायदेशीर पद्धत शोधून काढणे (हे जगभरासाठी) अथवा महिलांची मासिक पाळी तपासण्याचे स्कॅनिंग मशिन शोधणे (हे कदाचित भारतापुरते) हे उपाय होऊ शकतील.

या शोधांच्या जोडीलाच अंधश्रद्धामीटर नावाचे यंत्र किंवा तंत्र; जे माणसाला पाहिल्या-पाहिल्या किंवा हे अगदीच अशक्य असेल तर रक्त तपासून म्हणा किंवा इतर कोणत्या पद्धतीने तो किती अंधश्रद्ध आहे व त्याच्यात कोणकोणत्या अंधश्रद्धा ठासून भरलेल्या आहेत, कोणत्या अंधश्रद्धांच्या बाबतीत तो काठावर आहे याचा रिपोर्ट देईल; शोधायला भरपूर वाव आहे.

त्यावरून त्या व्यक्तीचा अंधश्रद्धा कोशंट (superstition index or superstition quotient) काढून पुढे त्याचे काय करायचे कि्वा अगदीच गॉन केस आहे का ते ठरवता येईल.

याचेच पुढील स्वरूप म्हणजे पुरोगामीमीटर हे यंत्रही शोधता येईल. यातली गोची एवढीच की कोणतेही असे यंत्र शोधताना त्याचे कशाबरोबर तरी कॅलिब्रेशन करावे लागते. आज पुरोगामी या शब्दाचे इतके वेगवेगळे अर्थ सांगितले जातात की त्यामुळे एक तर या यंत्राचा काटा फारच हेलकावे खाईल व यंत्र पहिल्या तपासणीतच निकामी होऊन जाईल किंवा अगदी चुकीचे रिडिंग दाखवेल. त्यामुळे हा शोध लावण्यापूर्वी आधी या शब्दाचा खरा अर्थ शोधायला हवा.

बघा बसल्याबसल्या तुम्हाला करोडपतीच काय, एकावरची शुन्येही मोजता येणार नाहीत एवढ्या संपत्तीचा धनी होण्यासाठीच्या संधी, आयडिया देत आहे. आता तरी लागा कामाला.

मागे मी ओबेसिटी टॅक्स लावण्याची सूचनाही केली होती. अजूनही ती कल्पना अंमलात आलेली नाही. आगामी बजेटच्या आधी ती आपल्या अर्थमंत्र्यांकडे पोहोचवायला हवी.

४) माझ्या मावशीचे यजमान एकदम जॉली होते. मागे त्यांची एक आठवण सांगितली होती. एखादा स्वयंपाकातला पदार्थ अगदी चांगला झाला तर ते गंमतीने म्हणायचे, की आज आमची ही घाईत असल्याने तिला तो बिघडवायला सवडच झाली नाही.

मुंबईत ते रहात असलेल्या इमारतीतल्या माने नावाच्या एका गृहस्थांनी त्यांच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅट विकून त्याच इमारतीत तळमजल्यावरील फ्लॅट घेतला. त्यांना ते म्हणत, अहो माने हे काय केलेत तुम्ही? कोणी तुमच्या फ्लॅटचा पत्ता विचारला तर पूर्वी मी अभिमानाने मान वर करून सांगू शकायचो. आता मला तुमच्यामुळे मान खाली घालावी लागते.

५) काल पुण्याजवळ पार पडलेल्या संघाच्या शिवशक्तीसंगम या मेळाव्याबद्दल एक वेगळी पोस्ट टाकतच आहे. मात्र या मेळाव्याला लाखापेक्षा अधिक स्वयंसेवक व नागरिक आल्याचे सांगितले जाते.

गर्दीकडे नजर टाकून किती लोक आहेत याचा अंदाज सांगणा-या लोकांचे मला नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे.

आमची तीन-चारशे लोकांच्या समुहाचा अंदाज सांगण्याचीही मारामार, हे लोक मात्र खात्रीपूर्वक सांगतात दहा हजाराच्या खाली काही मरण नाही. हे साठेक हजार असणार बघ. केवढा हा आत्मविश्वास! कधीकधी वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अंदाज ऐकले की बिरबल व झाडावरील कावळ्यांच्या गोष्टीची आठवण हमखास येते.

६) साहित्यसंमेलनाध्यक्ष होण्याकरता आगामी संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी कोणकोणत्या हिकमती केल्या याची जंत्रीच चपराक या साप्ताहिकाचे संपादक घनश्याम पाटील यांनी दिली आहे.

हे लेखन काही दैनिकांमध्येही प्रसिद्ध झाल्याचे कळते. तेव्हा त्याच्या सत्यतेविषयी शंका नसावी. त्यातील तपशील पाहता हिकमती हा शब्दही अपुरा पडावा, असे तुम्हालाही वाटेल.

'कुत्र्याला खीर पचली नाही' अशा या लेखाच्या शीर्षकावर जाऊ नका. लेख वाचा.

http://dakhalpatra.blogspot.in/2016/01/blog-post.html

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users