फुसके बार – ०४ जानेवारी २०१६

Submitted by Rajesh Kulkarni on 3 January, 2016 - 15:10

फुसके बार – ०४ जानेवारी २०१६

१) राज्यात अनेकांना आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मद्याची गरज पडणार आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आधीच्या सरकारने एका वेळी जवळ बाळगायची मद्याची मर्याचा दोन युनिट्सवर आणली होती. ही मर्यादा आताच्या सरकारने बारावर नेली आहे. त्यासाठीची अट मात्र अशी आहे की त्या व्यक्तीला तिच्या आरोग्यासाठी देशी/विदेशी मद्य बाळगण्याची गरज आहे असे प्रमाणपत्र डॉक्टरांकडून मिळवावे लागणार आहे. केवढी अवघड अट आहे ना?

आपले हसतमुख मुख्यमंत्री फडणवीस याचे समर्थन कसे करतात पहावे लागेल. खडसेंकडून कसलीच अपेक्षा नाही.

त्या अण्णा हजारे व अभय बंग यांनी डोक्यावर हात मारून घेतला असेल. याचसाठी केला होता का हा अट्टाहास?

२) परस्युट ऑफ हॅपीनेस या सिनेमात विल स्मिथच्या मागे दारिद्र्याचे दशावतार लागलेले असतात. तो या दारिद्र्यातून येणा-या हतबलतेचा हिंमतीने मुकाबला करत असतो आणि तो ज्या कंपनीत हंगामी स्वरूपात काम करत असतो तेथेच त्याला नोकरीचा देकार मिळतो.

इतकी वर्षे दारिद्र्य सोसलेले आणि आता ही नोकरीची ऑफर त्याचे भविष्य कायमचे बदलणार असते. पण हे त्याला कंपनीकडून इतके अनपेक्षितपणे कळवले जाते की त्याला आनंदही व्यक्त करता येत नाही. शिवाय तो आनंद व्यक्त करण्याकरता त्याच्याजवळ त्याच्या छोट्या मुलाशिवाय कोणीच नसते. तो ऑफिसमधून बाहेर पडल्यावर त्याचा आनंद कसा व्यक्त करतो हे पाहण्यासाठी हा सिनेमा पाहणे आले.

एरवीही हा चित्रपट अतिशय सुंदर आहे. प्रामाणिक व धडपड्या माणूस.

३) दापोलीजवळ एका जोडप्याने पॅरासेलिंग करत हवेत असताना एकमेकांना अंगठ्या घातल्याची बातमी वाचली. माझ्या एका मित्राच्या अनुभवाची आठवण आली. हा अनुभव मात्र एकदम विपरित.
तो फुकेतमध्ये असताना तेथील समुद्रात पत्नीसह पॅरासेलिंग करायला गेला होता. समुद्रातील तरंगणा-या प्लॅटफोर्मवर उभे राहून आपल्या कमरेला बांधलेला दोर एका मोटरबोटीतून ओढतात. त्यामुळे आपणही त्या प्लॅटफॉर्मवरून पुढे ओढले जातो. प्लॅटफॉर्म सोडेपर्यंत पुरेसा वेग गाठलेला असल्यामुळे पॅराशूट आपल्याला हवेत नेते.

या दोघांच्या बाबतीत काय झाले कोणास ठाऊक, कदाचित दोघांचे मिळून वजन अधिक झाले असेल, पण प्लॅटफॉर्म सोडल्यावर त्यांचे पॅराशूट हवेत जाण्याऐवजी त्याच्यासह हे दोघेही पाण्यात म्हणजे समुद्रातच पडले. बायकोला पोहोता येत नव्हते, शिवाय पॅराशूटच्या दो-यांमध्ये हात पाय अडकल्याने याच्या हालचालीवर मर्यादा आल्या. त्यात बायकोने याला घट्ट पकडून ठेवले. बाका प्रसंग आला होता.

काय झाले ते कळल्यावर किना-यावरून दोन पाण्यातल्या स्कुटर्स लगेचच यांना वाचवण्यासाठी निघाल्या. पण हिने त्याला धरून ठेवलेले व आता आपल्या मुलांचे कसे होणार हाच कायम धोशा लावलेला. ते कोस्टगार्डस तिला काही सांगत होते, पण ही ऐकण्याच्या स्थितीत होती कोठे? अखेर एकाने तिच्या कानफाडीत एक जोरात मारली. तेव्हा कोठे ती भानावर आली. आधी तिला घेऊन ते किना-यावर गेले. नंतर यालाही नेले.

या अनुभवानंतर ती त्याला समुद्राच्या पाण्याजवळही जाऊ देत नाही. आणि अर्थातच स्वत:ही जात नाही.

४) मागे अबुधाबीमध्ये असताना तिथल्या महाराष्ट्र मंडळाची सत्यनारायणाची पूजा सांगणा-याने म्हणजे या किश्श्याच्या नायकाने अचानक असहकार पुकारला. त्याचे कारण काय, तर मंडळाच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्याचा कार्यक्रम होता. व आपल्या नायकाच्या पत्नीला त्या नृत्यात भाग घ्यायचा होता. पण नृत्यदिग्दर्शकाने सांगितले की तुम्हाला त्या नृत्यातल्या स्टेप्स जमणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला त्या कार्यक्रमात घेऊ शकणार नाही.

झाले. नायकाची पत्नी आधी नृत्यदिग्दर्शकावर रूसली. म्हणाली, हरकत नाही, मग मी नृत्यादरम्यान तशीच स्टेजवर उभी राहिन. दिग्दर्शकाने तेही साफ नाकारले. असे कसे नुसतेच स्टेजवर उभे राहणार? मग ती तिच्या नव-यावर म्हणजे नायकावर रूसली. मग नायकाने त्याच्याकडचा हुकुमाचा एक्का बाहेर काढला. दुस-या दिवशी पूजा होती. ह्याने अल्टिमॅटम दिला की माझ्या बायकोला नृत्यामध्ये घ्या, नाहीतर मी पूजा सांगणार नाही. तरीही नृत्यदिग्दर्शक बधेना.

मग ऐनवेळी दुसरे कोण पूजा सांगू शकेल याचा शोध सुरू झाला. मला विचारले. मी म्हटले की मी याआधी कधी केलेले नाही.पण पोथी असेल तर मी वाचून दाखवू शकेन. मला पोथी दिली. ती नेमकी संस्कृतमध्ये. ऐनवेळी पूजा सांगताना काही संस्कृत शब्द माहित नसतील तर पंचाईत नको, म्हणून आदल्या दिवशी रंगीत तालीम केली.

आपल्या नायकाची कल्पना अशी की त्याने अचानक नाही म्हटले म्हणून मंडळ नमेल. पण मी पूजा वाचून दाखवली. त्यामुळे नृत्याचा कार्यक्रमही अडथळ्यावाचून पार पडला.

काही दिवसांनी नायक मला भेटला व विचारले की मी यातले काही शिक्षण घेतले आहे का? त्याला म्हटले काळजी करू नकोस. फक्त पुढच्या वर्षी रूसून बसू नकोस, पोथी सांगण्याचा हक्क तुझा तुला परत मिळेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users