निद्रिस्त मनाच्या काठी..

Submitted by माउ on 3 January, 2016 - 11:58

ह्या हळव्या चांदणराती संदिग्ध धुक्याच्या वाटा
पानातून झरते चांदी ..निळ्यासावळा लाटा..
मी बावरते सावरते अलवार उमलण्यासाठी
ही कुठली जाग येते निद्रिस्त मनाच्या काठी..?

जुन्या नव्या स्वप्नांची नशा अशी साकळते
आठवण येता हरते..ही साथ कुणाची मिळते?
पापणी जरा थरथरते थेंबांची अलगद दाटी
ही कुठली जाग येते निद्रिस्त मनाच्या काठी..?

गंधीत साद झंकार नाद.. चंद्र जरा ओघळतो
पांघरते चांदणशेला मी.. हा जीव कसा दरवळतो?
सूर विसरले अवचित येती धुंदल्या प्राजक्त ओठी
ही कुठली जाग येते निद्रिस्त मनाच्या काठी..?

तो येऊन बरसून जातो, स्वप्नांच्या सांद्र किनारी
मी ता-यांचा गहिवर होते शुभ्र जरा जरतारी..
हे कुठले अपुले नाते, ह्या कुठल्या रेशीमगाठी?
ही कुठली जाग येते निद्रिस्त मनाच्या काठी..?

-रसिका

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पापणी जरा थरथरते थेंबांची अलगद दाटी
ही कुठली जाग येते निद्रिस्त मनाच्या काठी..?>>>अशा काही सुरेख ओळी वाह.म्हणायला भाग पाडतात .