फुसके बार - २९ डिसेंबर २०१५ - हुरडा स्पेशल

Submitted by Rajesh Kulkarni on 28 December, 2015 - 13:26

फुसके बार - २९ डिसेंबर २०१५
हुरडा स्पेशल
.
१) हुरड्याबरोबर उसाचा रस हे कॉंबिनेशन फार छान असते. उसाच्या रसामध्ये लिंबाचा रस पिळणे जसे सामान्य समजले जाते, तसे आंबटपणाकडे झुकणारे दही घालून रस पिणे यातदेखील मजा असते.

तसा दही घातलेला उसाचा रस कोणी ऑफर केला तर त्याची चव घेण्याची भल्याभल्यांची हिंमत होत नाही. पण हे अतिशय सुरेख कॉंबिनेशन आहे.

२) मागे परळी वैजनाथला असताना गव्हाचा हुरडा खाल्ला होता. त्याला कोणास ठाऊक का पण ज्वारीच्या हुरड्याची सर येत नाही.

ज्वारीच्या हुरड्यासाठी सुरती, गुळभेंडी, कुचकुची अशा काही खास जाती विकसित केलेल्या आहेत हे त्यामागचे कारण असावे.

३) पोटभर हुरडा खाऊन झाल्यावर पुन्हा जेवायला भूक कशी राहील अशे अनेकांना वाटते. मात्र हुरडा खाऊन झाल्यावर थोडीशी विश्रांती घेऊन शेतामध्ये थोडा फेरफटका मारला की आपोआपच भूक लागते.

शिवाय एरवी नाजूक आहार असलेल्यांनाही शेतातील वातावरणामध्ये पोटावरचा हा थोडा अत्याचार बादत नाही असा अनुभव आहे.

४) हुरड्याबरोबर चवीला म्हणून भाजलेले खारे दाणे, शेंगदाण्याची चटणी, त्याच भट्टीत उकडलेली कोवळी वांगी, थोडासा गुळ असे पदार्थ वापरण्याची प्रथा आहे.

पण त्याबरोबर फरसाणासारखा पदार्थ ऑड मॅन आउटसारखा ठरतो. थोडक्यात, हुरड्याबरोबर चवीसाठी केवळ शेतातून मिळालेले पदार्थच वापरले जावेत असा संकेत आहे.

५) काही वेळा हुरडा भट्टीतून (आगटीतून) काढून चोळून देणारे खाणा-यांची गंमत करायची म्हणून त्यांच्या हातावर गरमागरम हुरडा ठेवून तो हात मुद्दाम दाबतात. तो माफक चटका बसला तरी तो मनुष्य आपल्यासाठी थेट आगटीतून काढलेले कणीस हातावर चोळून हुरडा काढण्यासाठी किती कष्ट घेत आहे याची आपल्याला जाणीव होते. ही अर्थात गंमत असते.

भाजलेल्या ज्वारीच्या कणसातून हुरडा काढण्याच्या या पद्धतीचेही यांत्रिकीकरण जरूर करता येईल, मात्र त्यामुळे यातला मानवी स्पर्श कमी होईल किंवा नाहीसा होईल.

६) हुरड्याच्या वेळी चोळून झालेल्या कणसांमध्येही ज्वारीचे अनेक दाणे राहिलेले असतात. ही कणसे वाळवून बडवली की हे दाणे सुटे होतात. अशा वाळलेल्या हुरड्याचे दाणे दळून त्याचे पीठ म्हणजे हुरड्याची भाजणी केली की मग तिचा आस्वाद वर्षभर घेता येतो.

या भाजणीच्या पिठापासून केलेल्या थालपिटाच्या चवीला अप्रतिम याखेरीज दुसरा शब्द नसतो.

७) हुरड्यासाठी काढलेली कणसे जर कोवळी असतील तर त्यातून दाणे सुटे होऊन पडत नाहीत. तर तेच ज्वारीचा दाणा थोडा तरी जून झाला असेल तर तो आगटीत भाजला तरी कोवळा वाटत नाही.

त्यामुळे हुरड्यासाठी बरोबर वेळ साधावी लागते.

अमुकअमुक कोणासाठी थांबत नाही हे सांगणारी अनेक वाक्ये आहेत. हुरड्याची अचूक वेळही कोणासाठी थांबत नाही, हे त्यात घालायला हवे.

८) नेहमीच्या ज्वारीच्या (म्हणजे खास हुरड्यासाठी न लावलेल्या हुरड्याला) हुरड्याला बामणी हुरडा म्हणतात. तो अर्थातच चावायला कडक असतो. खवय्यांचा कस जोखणयाकरता काही ठिकाणी सुरूवातीला अशी कणसे भाजतात व चोळून देतत. मग 'चावायला नको, पण हुरडा अावर' असे म्हणत पोट भरल्याचा दावा करू लागले की मग शेलका माल भाजला जातो व त्या अविस्मरणीय आनंदाची औळख होते.

९) हुरड्याच्या दिवसात शेतामध्ये बोरे, हरबरा (ढाळा), काकड्या (वाळके) असा रानमेवाही सहसा तेथल्या तेथेच चाखायला मिळतो. अलीकडे देशी बोरे फार पहायला मिळतही नाहीत. काही जणांकडे टोमेटोचा प्लॉट असला, लगडलेल्या टोमॅटोंचे वजन न पेलता येण्यामुळे त्यांना सपोर्ट द्यावा लागलेला पाहिला की लावणीमधल्या 'भार पेलवेना' या शब्दप्रयोगाची अनुभूती मिळते. अर्थात तो आणि हा भार वेगळा.

१०) हुरड्याचा खरा अनुभव हा प्रत्यक्ष शेतातल्या वातावरणामध्येच घ्यायला हवा.

तसे न करता शहरांमध्ये आजकाल मिळणा-या पाकिटातला हुरडा खाणे म्हणजे स्टुडिओमध्ये सादर केलेल्या भांगड्याची वाहवा करण्यासारखे व त्यावरच समाधान मानण्यासारखे आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो!