सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

Submitted by मार्गी on 25 December, 2015 - 12:10

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

तिसरे शतक- जीएमआरटी राईड

मार्च २०१४ मध्ये पुण्याजवळ चाकण परिसरात अनेक राईड्स झाल्या. काही दिवस जवळजवळ रोज सायकलिंग केलं- दररोज तीस- चाळीस किलोमीटर. आता परत मोठ्या राईडचा प्लॅन ठरला- ह्या वेळी नारायणगावजवळ जीएमआरटीअर्थात् Giant Meterwave Radio Telescope बघायला जायचं आहे. ही एक रेडिओ दुर्बीण आहे आणि कित्येक वर्षांपासून तिथे भेट द्यायची इच्छा होती. आता विचार केला की, सायकलवरच तिथे जाईन. चाकणमध्ये सध्या जिथे राहतो आहे, तिथून ते सुमारे बावन किलोमीटर असेल.

सकाळी सूर्य उगवत असताना बाहेर पडलो. नाशिक रोडवर वाहतुक कमी आहे. सकाळची ताजी प्रसन्न हवा आणि रमणीय परिसर! भामा आणि भीमा नद्या ओलांडून राजगुरूनगरला पोहचलो. इथून आता हा हायवे सिंगल लेन होईल आणि हेवी ट्रॅफिक असेल. थोडा वेळ काळजी वाटली, पण नंतर अडचण आली नाही. राजगुरूनगरमध्ये हॉटेल शोधले, पण ते अद्याप बंद आहेत. अनेकदा असं होतं की, आपण हॉटेल निवडायला वेळ लावतो आणि सगळे हॉटेल मागे निघून जातात. गाव संपत आलं‌ तरी 'चांगलं' हॉटेल मिळालं नाही. नंतर हायवेवर एक बरं हॉटेल मिळालं. नाश्ता करून पुढे निघालो. इथे एक छोटा घाट आहे.

सायकल चालवायची चांगली सवय झाल्यामुळे घाट चढताना काही अडचण आली नाही. सुंदर दृश्यांमधून सायकल चालवत राहिलो. पुढे एका ठिकाणी मोठा उतार मिळाला. हळु हळू ऊन वाढत आहे. मध्ये मध्ये चहाचे ब्रेक घेत पुढे जात राहिलो. पुढे कळंब नावाच्या गावापासून मला हायवे सोडून आतल्या रस्त्याने जीएमआरटीकडे जायचं आहे. हायवे सोडल्यानंतर ट्रॅफिकचा त्रास थांबला.

गावांमधील आंतर- रस्ते! अशा निर्जन रस्त्यांवर सायकल चालवण्याची मजा वेगळी! मध्ये मध्ये पुढचा रस्ता विचारावा लागत आहे. रस्त्यावर हलके चढ- उतार लागत आहेत. ग्रामीण जीवनाची झलक बघायला मिळाली! सुमारे चार तासांनंतर जीएमआरटीजवळ पोहचलो. एका छोट्या गावात परत एकदा नाश्ता केला आणि जीएमआरटीकडे निघालो. जीएमआरटी- जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप! हा एक मीटर वेव्हलेंथचा बहुतेक जगातला सगळ्यात मोठा रेडिओ टेलिस्कोप आहे. बेसिक सायन्समध्ये संशोधन करणारी भारताची ही महत्त्वाची रेडिओ दुर्बीण. पुढे गेल्यावर लवकरच दूरवर शेताजवळ पहली डिश दिसली! मोठी ताकडी! इथे पंचवीस किलोमीटरच्या परिसरात ४५ मीटर व्यासाच्या अशा ३० डिश इथे आहेत. जवळच डिश जवळ दिसायला लागल्या. एक डिश तर रस्त्याला लागूनच आहे. तिथे जाऊन फोटो घेतला. एक जुनी इच्छा पूर्ण झाली.

जीएमआरटीचं गेट बंद आहे. तसंही आतमध्ये जाण्यासाठी परमिशन लागते आणि काही ठराविक दिवशीच ही दुर्बीण सामान्य जनतेसाठी खुली असते. पण आज डिश अगदी जवळून बघायला मिळाली! आता परतीचा प्रवास. परतताना थोडं पुढे जाऊन नारायणगावावरून जाईन, कारण येताना गावांमधल्या रस्त्यांवरून जाताना जशी मजा आली, तसा जास्त वेळही लागला. त्याऐवजी हायवे बरा राहील. तसंही आता पन्नास किलोमीटर पूर्ण झाले आहेत, पुढे पाय थकत जातील.

नारायणगावामध्ये जेवण केलं आणि एनएच ५० वरून पुढे निघालो. वेग अगदीच कमी झाला आहे. एकदा तर निराश वाटलं की, इतकं थकलोय आणि उरलेले पन्नास किलोमीटर कसे जाऊ? पण न थांबता निघालो. रस्ता तसा समतलच आहे. पण दुपारचं कडक ऊन आणि पाच तासांच्या सायकलिंगमुळे थकलेलं शरीर. . त्यामुळे पुढे एक मोठा चढ पायी पायी‌ चढावा लागला. परत परत थांबावं लागलं. वेग प्रति तास दहा किलोमीटर इतका कमी झाला आहे. पण मोठे ब्रेक न घेता जात राहिलो.


खून. .

थकवा वाढतच गेला आणि किरकोळ चढावरही नंतर पायी जाण्याची वेळ आली. पण घरही जवळ येत गेलं. शंभर किलोमीटर पूर्ण झाले! अंधार पडण्याच्या बरंच आधी घरी पोहचलो. एकूण अंतर ११० किलोमीटर झालं. म्हणजे माझं तिसरं शतक! आता वाटतंय की, सायकलिंगमध्ये आणखी पुढे जाता येईल.

पुढील भाग १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट...... बराच फिरला की.... ते देखिल माहितीत नसलेल्या वाटांवरुन...
शेवटुन दुसर्‍या फोटोतील पाटी पुणे ७५ बघुनच माझ्या अंगावर काटा आला... की अरे बापरे... अजुन किति अंतर जायचे आहे... Proud
मस्त लिखाण, छान फोटो.
इथे मायबोलीवर देत असल्याबद्दल धन्यवाद.