'दिनमान'

Submitted by अमेय२८०८०७ on 25 December, 2015 - 11:31

उठताना वाटे झोपच झाली नाही
दैनंदिन लगबग घरात भरुनी राही
वेळेच्या तालावरचे नर्तन अवघे
जणु समयसारणी झरुनी वेगे वाही

केसांशी बांधत अपुली दुखरी स्वप्ने
कर्तव्यासाठी उत्साहाला जपणे
ती ब्रीद-उसासा घोकत उरके कामे
भिरकावत नजरेआड स्वतःचे असणे

घरदार चालते नित्यक्रमाला होई
भिंतीवरचीही थांबे अवखळ घाई
जाताना कोणी 'येतो' क्वचितच म्हणते
ना वळणावरती कोणी मागे पाही

तुकड्यांना सांधत क्षणभर खाली बसते
पाण्याच्या घोटासोबत गढूळ हसते
पाहता आरसा दिसे निनावी छाया
प्रतिबिंबामधली छबी निराळी असते

मग कपाट उघडत चाचपता कपड्यांत
गाठोडे प्रमाणपत्रांचे हातात
सोडत बंधाच्या अडव्यातिडव्या दोऱ्या
साकळते फिरुनी स्वप्न उगा डोळ्यांत

-- अमेय

Group content visibility: 
Public - accessible to all site users

" मग कपाट उघडत चाचपता कपड्यांत
गाठोडे प्रमाणपत्रांचे हातात
सोडत बंधाच्या अडव्यातिडव्या दोऱ्या
साकळते फिरुनी स्वप्न उगा डोळ्यांत"....अप्रतिम लिहिलंय.

उठताना वाटे झोपच झाली नाही >>> असे चित्रदर्शी वर्णन वाचतानाच
केसांशी बांधत अपुली दुखरी स्वप्ने
कर्तव्यासाठी उत्साहाला जपणे >>> या ओळी एकदम मनातली रुखरुख दाखवतात आणि शेवटची दोन कडवी
त्या रुखरुखीला अजून अधोरेखीत करतात..

सुरेख मांडणी... कविता आवडलीच ...